Home Dhyeya News Special मोतीबिंदूच्या रुग्णांसाठी पाचोरा-भडगावातून थेट जळगावची मोफत आरोग्यसेवा; किशोरआप्पा पाटील यांच्या पुढाकारातून आरोग्यसेवेचा...

मोतीबिंदूच्या रुग्णांसाठी पाचोरा-भडगावातून थेट जळगावची मोफत आरोग्यसेवा; किशोरआप्पा पाटील यांच्या पुढाकारातून आरोग्यसेवेचा नवा उपक्रम

0
104

Loading

पाचोरा : ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिकांना डोळ्यांच्या उपचारासाठी दूरवर जाण्याची वेळ येऊ नये, आर्थिक अडचणींमुळे उपचार रखडू नयेत आणि मोतीबिंदूमुळे दृष्टीवर परिणाम झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने शिवसेनेच्या माध्यमातून कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या पुढाकारातून एक महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रम राबविण्यात येत आहे. कांताई नेत्रालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच नेत्र तपासणीसाठी विनामूल्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाचोरा येथील शिवालय शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला प्राथमिक नेत्र तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे भडगाव येथील शिवतीर्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, आशीर्वाद प्लाझा येथे प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी नागरिकांना मोठ्या शहरात जाण्याची आवश्यकता नसून आपल्या परिसरातच प्राथमिक तपासणीची सुविधा मिळत आहे. शिबिरात तपासणीदरम्यान मोतीबिंदूचे निदान झाल्यास संबंधित रुग्णाला पुढील उपचारासाठी जळगाव येथील कांताई नेत्रालय येथे नेण्याची व्यवस्था केली जाते. पाचोरा येथून रुग्णाला घेऊन जाण्यापासून ते उपचार पूर्ण झाल्यानंतर परत आणण्यापर्यंतची ये-जा, रुग्णालयातील मुक्काम, चहा, नाश्ता आणि भोजनाची जबाबदारी कांताई नेत्रालयाकडून घेतली जाते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांनाही उपचार घेणे सुलभ झाले आहे. SICS पद्धतीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया विनामूल्य केली जाते. शस्त्रक्रिया अत्यंत कमी वेळेत पूर्ण होत असल्याने रुग्णांमध्ये असलेली भीतीही दूर करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. शस्त्रक्रियेनंतर आवश्यक असलेली आठ दिवसांची औषधे तसेच काळा चष्मा देखील रुग्णाला विनामूल्य देण्यात येतो. रुग्णांच्या उपचारानंतरच्या काळजीकडेही विशेष लक्ष दिले जात असल्याने हा उपक्रम केवळ शस्त्रक्रियेपुरता मर्यादित राहत नाही. या योजनेत रुग्णाने केवळ रक्त तपासणीसाठी 300 रुपये सोबत आणणे अपेक्षित असून आधार कार्ड आणि रेशन कार्डच्या छायांकित प्रती असणे बंधनकारक आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांच्या बाबतीतही वैद्यकीय स्थितीनुसार निर्णय घेतला जातो. रक्तातील साखरेची पातळी 200 च्या आत असल्यास शस्त्रक्रियेसाठी पात्रता तपासली जाते; त्यापेक्षा जास्त पातळी असल्यास संबंधित डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेतला जातो. ज्या रुग्णांना रक्त पातळ होण्याची औषधे सुरू आहेत किंवा अन्य वैद्यकीय अडचणी आहेत, अशा रुग्णांचीही परिस्थितीनुसार वैद्यकीय तपासणी करून योग्य उपचारपद्धतीबाबत मार्गदर्शन केले जाते. काही रुग्णांसाठी अत्याधुनिक फेको मशीनद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जाऊ शकतो. अशा वेळी संबंधित रुग्णासाठी 5300 रुपयांपासून पॅकेज उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची वैद्यकीय गरज लक्षात घेऊन उपचाराचा पर्याय निश्चित केला जातो. मोतीबिंदू नसलेल्या नागरिकांनाही या उपक्रमातून निराश परतावे लागत नाही. प्राथमिक तपासणीनंतर आवश्यक औषधोपचार, डोळ्यांची काळजी आणि पुढील उपचाराबाबत माहिती दिली जाते. परिणामी, नियमित नेत्र तपासणीची सवय लागण्यासोबतच डोळ्यांशी संबंधित समस्या वेळीच लक्षात येण्यास मदत होत आहे. या आरोग्य उपक्रमामागे शिवसेनेची जनसेवेची भूमिका असून, पाचोरा कार्यालयात आमदार किशोरआप्पा पाटील यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव राजपूत, संदीप पाटील, रमेश पवार, नाना वाघ, योगेश जाधव, किरण सूर्यवंशी, संतोष पाटील, विजय भोई, नितीन पाटील आणि दीपक पाटील हे अनमोल परिश्रम घेत आहेत. रुग्णांची नोंदणी, प्राथमिक तपासणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, जळगावला नेण्याची व्यवस्था आणि उपचारानंतर परतीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी कार्यकर्त्यांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, आज प्राथमिक तपासणी झालेल्या मोतीबिंदूच्या रुग्णांना पुढील शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथे रवाना करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे डोळ्यांच्या आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना उपचाराचा आधार मिळत असून, आरोग्यसेवा ही केवळ शहरापुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे. या उपक्रमाची अधिक माहिती किंवा शिबिरासंदर्भातील मार्गदर्शनासाठी वैभव राजपूत 8446414072 (पाचोरा) आणि निलेश पाटील 8600884707 (भडगाव) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे. तसेच डॉक्टर मोहम्मद बेग, डॉक्टर योगेश माळी, अभिमन्यू पाटील आणि प्रमोद माळी यांचेही या आरोग्यसेवा उपक्रमासाठी योगदान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!