![]()
पाचोरा : अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) पाचोरा शहर व परिसरात कारवाया होत असल्याचे समोर येत असले, तरी त्या कारवायांची अधिकृत माहिती, संबंधित आस्थापनांची नावे, जप्त करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे तपशील तसेच घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल प्रसारमाध्यमांसमोर का येत नाहीत, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात ‘झुंज’ वृत्तपत्र व ‘ध्येय न्यूज’चे संपादक पत्रकार संदीप महाजन यांनी स्वतःच्या नावाने संबंधित विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार केली आहे. FDA जळगाव कार्यालयात आयुक्त तुकाराम मुंडे साहेब यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून पाचोरा शहर व परिसरात विविध ठिकाणी कारवाया झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र वरखेडी राईस मिलची कारवाई वगळता अन्य कारवायांची ठिकाणे, संबंधित फर्मची नावे अथवा कारवाईचा अधिकृत तपशील प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देण्यात आलेला नाही, अशी बाब पत्रकार संदीप महाजन यांनी आपल्या तक्रारीत निदर्शनास आणून दिली आहे. कारवाई झाली, संशयास्पद खाद्यपदार्थ आढळले, नमुने घेण्यात आले किंवा काही साठा नष्ट करण्यात आला, एवढीच माहिती समोर आली तर त्यानंतरच्या प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण होतात. घेतलेले नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले का? त्यांचे अहवाल काय आले? अहवालात खाद्यपदार्थ सुरक्षित अथवा मानकांनुसार असल्याचे निष्पन्न झाले की त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या? नष्ट करण्यात आलेला माल नेमका कोणत्या फर्म, उत्पादक अथवा फार्मचा होता? संबंधित आस्थापनाविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई झाली का? या सर्व प्रश्नांची अधिकृत माहिती अद्याप स्पष्टपणे उपलब्ध होत नसल्याने पाचोऱ्यातील कारवाईच्या पद्धतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. अन्नपदार्थांशी संबंधित कारवाईचा विषय थेट नागरिकांच्या आरोग्याशी निगडित आहे. त्यामुळे संशयास्पद तूप, क्रीम, गुटखा किंवा अन्य खाद्यपदार्थ जप्त झाल्यास त्यासंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया आणि उपलब्ध अधिकृत माहिती नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक ठरते. जळगाव जिल्ह्यातील इतर भागांमध्ये कारवाई झाल्यानंतर संबंधित माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचते, तर पाचोऱ्याच्या बाबतीतच संबंधित ठिकाणांची नावे का प्रसिद्ध केली जात नाहीत? हा सवाल आता उपस्थित होत आहे. यामागे कोणता विभागीय नियम, तपासाची गोपनीयता, कायदेशीर प्रक्रिया किंवा अन्य प्रशासकीय कारण आहे, हे FDA जळगाव कार्यालयाने स्पष्ट करणे गरजेचे आहे. दरम्यान, पाचोरा शहर व परिसरातील अवैध गुटखा विक्रीचाही प्रश्न गंभीर आहे. गुटख्याची विक्री किंवा साठवणुकीविरोधात कारवाई होत असल्यास जप्त मालाचे प्रमाण, संबंधित आस्थापना आणि त्यानंतरची कार्यवाही याची अधिकृत माहितीही जनतेला मिळणे अपेक्षित आहे. कारवाई होते, मात्र त्याबाबतची प्रेस नोट जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसारमाध्यमांपर्यंत नियमितपणे का पोहोचत नाही, हा प्रश्नही पत्रकार संदीप महाजन यांनी उपस्थित केला आहे. ‘पाचोरा शहर व परिसरासाठी कारवाईच्या माहितीबाबत स्वतंत्र निकष लागू आहेत का?’ अशी शंका निर्माण होण्याचे कारण म्हणजे कारवाईची माहिती आणि तिच्या परिणामांची अधिकृत माहिती यामधील असलेली तफावत होय. प्रशासनाने कोणत्याही फर्मचे नाव विनाकारण जाहीर करावे, असा प्रश्न नाही; मात्र कायद्यानुसार नाव प्रसिद्ध करता येत असेल आणि तपासाची संबंधित प्रक्रिया पूर्ण झालेली असेल, तर नागरिकांच्या हितासाठी पारदर्शकता राखणे आवश्यक आहे. उलट नाव प्रसिद्ध करता येत नसेल, तर त्यामागील कायदेशीर अथवा प्रशासकीय कारणही स्पष्ट केले जावे, अशी अपेक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार संदीप महाजन यांनी आयुक्त तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडे थेट ई-मेलद्वारे तक्रार करून पाचोरा शहर व परिसरातील FDA कारवायांचा अधिकृत तपशील उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. कारवाईची तारीख, ठिकाण, संबंधित आस्थापना, जप्त केलेल्या वस्तूंचे प्रमाण, नमुना तपासणीचे अहवाल, नष्ट केलेल्या मालाचा स्रोत आणि त्यानंतर करण्यात आलेली कायदेशीर कार्यवाही याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यास नागरिकांच्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे मिळू शकतील. अन्नभेसळ आणि अवैध गुटखा विक्रीसारख्या विषयांमध्ये प्रशासनाची कारवाई जितकी महत्त्वाची आहे, तितकीच तिची पारदर्शक नोंद आणि अधिकृत माहितीही महत्त्वाची आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखालील संबंधित विभागाने पत्रकार संदीप महाजन यांच्या तक्रारीची दखल घेऊन पाचोऱ्यातील कारवायांबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पाचोऱ्यात कारवाई झाली असेल तर तिचे अधिकृत परिणाम जनतेसमोर कधी येणार आणि संबंधित फर्मची नावे प्रसिद्ध न करण्यामागील नेमके कारण काय, याकडे आता पाचोरा शहराचे लक्ष लागले आहे.





























