Home Dhyeya News Special माफी मागणार नाही!’ — स्वातंत्र्यासाठी इयत्ता आठवीतच कारावास पत्करणाऱ्या अण्णासाहेबांचा अढळ देशभक्तीचा...

माफी मागणार नाही!’ — स्वातंत्र्यासाठी इयत्ता आठवीतच कारावास पत्करणाऱ्या अण्णासाहेबांचा अढळ देशभक्तीचा संकल्प -25 सप्टेंबर 1942 रोजी अटक; 28 सप्टेंबर 1942 ते 1 मार्च 1943 पर्यंत येरवडा कारागृहात सहा महिन्यांचा स्वातंत्र्यसंग्रामातील कारावास

0
75

Loading

स्वातंत्र्याच्या इतिहासातील तेजस्वी पर्व : स्व. अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन 

👉पाचोरा येथील हुतात्मा स्मारक हे केवळ दगड-मातीचे स्मारक नाही; ते या भूमीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या त्यागाची, संघर्षाची आणि बलिदानाची जिवंत साक्ष आहे. या पवित्र भूमीत स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या अनेक ज्ञात-अज्ञात देशभक्तांच्या स्मृती जपल्या आहेत. त्याच त्यागमय परंपरेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे स्व. अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन. स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास सांगताना त्यांच्या कार्याचा उल्लेख केवळ एका व्यक्तीच्या चरित्रापुरता मर्यादित राहत नाही; तो त्या काळातील तरुणाईच्या राष्ट्रनिष्ठेची आणि भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याच्या धैर्याची कहाणी ठरतो. १९४२ मध्ये महात्मा गांधींनी ‘चले जाव’ आणि ‘करेंगे या मरेंगे’चा नारा दिला आणि देशभर स्वातंत्र्याची अभूतपूर्व लाट उसळली. त्या वेळी अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन एरंडोल येथे इयत्ता आठवीत शिकत होते. शिकण्याचे, खेळण्याचे आणि भविष्याची स्वप्ने पाहण्याचे ते वय; मात्र त्यांच्या मनावर देशाच्या गुलामगिरीचे ओझे होते. राष्ट्रसेवादलाचे काम पाहताना त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत स्वतःला झोकून दिले. काँग्रेस कमेटीच्या कार्यालयात येणारी पत्रके दप्तरात लपवून गुप्तपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे धाडसी काम त्यांनी केले. ही पत्रके केवळ कागदाची पाने नव्हती; त्यात स्वातंत्र्याची हाक होती, अन्यायाविरुद्धचा आवाज होता आणि ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारी विचारांची ठिणगी होती. त्या काळात साने गुरुजी एरंडोल येथे येत असत. त्यांच्या समवेत ग्रामीण भागात फिरताना अण्णासाहेबांना स्वातंत्र्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याची प्रेरणा मिळत होती. सत्याग्रह करणाऱ्यांना अटक होत असताना त्यांची नावे व आकडेवारी गोळा करून काँग्रेस कमेटीकडे देण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. आडगाव परिसरातील जंगल सत्याग्रहाच्या वेळी ब्रिटिश सत्तेचा क्रूर चेहरा अधिक भयावहपणे समोर आला. फौजदार काळे यांच्या गोळीबारात भगवान भुसारी, शामराव पाटील आणि त्र्यंबक वाणी हे सत्याग्रही बळी पडले, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. मृतदेह आणि जखमींची झालेली अवस्था पाहून तरुणांच्या मनात संतापाची ज्वाला पेटली. तहानेने तडफडणाऱ्या जखमींना पाणी देण्याचा प्रयत्न केला असता पिस्तूल रोखण्यात आल्याची घटना अण्णासाहेबांच्या स्मरणात कायम राहिली. या अमानुषतेने त्यांचा निर्धार मोडला नाही; उलट स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्रतेने लढण्याची प्रेरणा मिळाली. सप्टेंबर १९४२ मध्ये ब्राह्मण ओट्यावर एन. जी. साळी यांच्यासह सत्याग्रह करत असताना अण्णासाहेबांना अटक झाली. तीन दिवसांनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मामलेदार देशपांडे यांनी अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन हे त्यावेळी वयाने लहान व त्यांच्या मुलासोबत शिक्षण घेत आहे म्हणुन माफी मागितल्यास सोडून देण्याची तयारी दर्शविली. परंतु अण्णासाहेबांनी माफी मागण्यास नकार दिला. परिणामी मामलेदार संतप्त झाले आणि त्यांनी इयत्ता आठवीत शिकत असतानाच त्यांना सहा महिन्यांचा कारावासाची शिक्षा ठोठावली ती सुद्धा कराची जेलमध्ये नेण्याची परंतु दोन दिवस जळगाव येथे कचेरीत थांबवून ठेवले अखेर कराची येथून तार आला कैद्यांसाठी कराची जेलमध्ये जागा नसल्याने त्यांची इतरत्र व्यवस्था करावी त्यामुळे अण्णासाहेबांना येरवडा मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले. २८ सप्टेंबर १९४२ ते १ मार्च १९४३ या काळात त्यांनी येरवडा कारागृहात सहा महिन्याची शिक्षा भोगली. तुरुंगाच्या भिंतींमध्येही त्यांचा देशप्रेमाचा आवाज शांत झाला नाही. रात्रीतून जेलवरील इंग्रजांचा झेंडा उतरवणे आणि भारताचा तिरंगा फडकवणे , राष्ट्रगीत, भाषणे आणि देशभक्तीपर उपक्रम सुरूच राहिले. सुटका झाल्यानंतरही त्यांनी राष्ट्रसेवादलाच्या शिबिरात सहभागी होऊन देशसेवेचे कार्य पुढे चालू ठेवले. या संपूर्ण संघर्षामध्ये एक गोष्ट विशेषत्वाने जाणवते—त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेताना मानधन, सवलती किंवा भविष्यात मिळणाऱ्या कोणत्याही लाभाचा विचार केला नव्हता. देश स्वतंत्र व्हावा, भारतमाता परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त व्हावी, हीच त्यांच्या मनातील प्रेरणा होती. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. पाचोरा कचेरीवर फडकणारा युनियन जॅक स्वातंत्र्यसैनिक सु. भा. पाटील यांच्या हस्ते खाली उतरविण्यात आला आणि तिरंगा अभिमानाने फडकला. त्यानंतर रामभरोसे मास्तर, सुपडू रामदास गुप्ता, लालचंद शेठ यांचे वडील जगजीवन शेठ मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वराज्य आले पण कुणाचे?’ हे नाटक सादर करण्यात आले. आठ ते दहा हजार नागरिक त्या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होते. स्वातंत्र्य मिळाले असले तरी सामान्य माणसाच्या जीवनात खरे स्वराज्य कितपत आले, हा प्रश्न त्या नाटकातून उपस्थित करण्यात आला. आजही तो प्रश्न आपल्याला अंतर्मुख करतो. स्वातंत्र्यानंतर अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन यांनी सार्वजनिक जीवनातही आपली कर्तव्यनिष्ठा जपली. त्यांनी शासनाच्या स्वातंत्र्यसैनिक जिंल्हा गौरव समितीवर सदस्य तसेच तालुका भ्रष्टाचार निर्मूलन शासकीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून काम पाहिले. पाचोरा नगरपालिकेत अॅक्ट्राय इन्स्पेक्टर म्हणून सेवा बजावली आणि ऑगस्ट १९८३ मध्ये सेवानिवृत्त झाले. सार्वजनिक जीवनातील ही वाटचाल त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील मूल्यांशी सुसंगत होती. प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी त्यांनी आयुष्यभर जपली. ३ डिसेंबर २०२५ रोजी अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन यांचा स्वर्गवास झाला. देहाने ते आज आपल्यात नसले तरी त्यांच्या संघर्षाची गाथा आणि त्यागाची प्रेरणा कायम आहे. स्वातंत्र्यसैनिकांचे नामनिर्देशन व वारसदार म्हणून त्यांनी आपले सुपुत्र संदीप दामोदर महाजन यांचे नाव जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे २१ जुलै १९९१ रोजी नोंदविले होते. ही नोंद केवळ प्रशासकीय बाब नसून त्यांच्या कुटुंबाकडे सोपविलेल्या त्यागाच्या आणि राष्ट्रनिष्ठेच्या वारशाची साक्ष आहे. आज स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाकडे पाहताना आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे—ज्यांनी स्वातंत्र्यासाठी काहीही मागितले नाही, त्यांच्या नावावर मिळणाऱ्या सवलती आणि सन्मानासाठी जर खोटेपणा केला जात असेल, तर हा केवळ शासनाची फसवणूक करणारा प्रकार नाही; तो स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी केलेला विश्वासघात आहे. खऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करणे म्हणजे त्यांच्या नावापुढे केवळ पुष्पहार अर्पण करणे नव्हे, तर त्यांच्या विचारांशी प्रामाणिक राहणे होय. इयत्ता आठवीत शिकत असताना देशासाठी कारावास स्वीकारणाऱ्या अण्णासाहेबांनी आपल्याला एक अमूल्य संदेश दिला—राष्ट्रासाठी केलेला त्याग हा व्यवहार नसतो; तो जीवनाचा संकल्प असतो. पाचोरा येथील हुतात्मा स्मारकात त्यांच्या कार्याचा आणि संघर्षाचा गौरव करणारी ही नोंद पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावी, हीच अपेक्षा. कारण तिरंगा फडकवताना केवळ ध्वजाला सलाम करून स्वातंत्र्याचा सन्मान होत नाही; त्या तिरंग्याच्या प्रत्येक रंगामागे दडलेल्या त्यागाला मनापासून नमन केले, तरच स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजतो. आणि म्हणूनच अण्णासाहेबांचा १९४७ मधील प्रश्न आजही आपल्या विवेकाला जागे करतो—“स्वराज्य आले… पण कुणाचे?” या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक पिढीने आपल्या कर्तृत्वातून द्यायचे आहे. ✒️..शब्दांकन : सौ. शितल संदीप महाजन
उपशिक्षिका – श्री गो से हायस्कूल, पाचोरा, जि. जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!