छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र जागृत देवस्थान विठ्ठल-रुक्माई मंदिर, निंभोरा (विठ्ठलाचे) हे गाव सध्या एका आगळ्या-वेगळ्या संकल्पनेसाठी चर्चेत आहे. गावातील तरुण चिरंजीव मयूर दौलत अहिरे यांनी आपल्या विवाहाची परंपरा मोडत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.मयूर हे कै. दौलत परभत अहिरे आणि गं. भा. सरलाबाई दौलत अहिरे यांचे कनिष्ठ सुपुत्र असून, त्यांचे मोठे बंधू श्री. विशाल दौलत अहिरे आहेत. आपल्या विवाहासाठी होणाऱ्या अनाठायी खर्चाला फाटा देत, मयूर यांनी विवाह अगदी साध्या आणि संविधानिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. विवाहावर खर्च होणारा पैसा उधळण्याऐवजी तो समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करावा, अशी अभिनव संकल्पना त्यांच्या मनात आली. मयूर यांनी ही संकल्पना आपल्या कुटुंबीय आणि सन्मित्रांसमोर मांडली. सर्वांशी सखोल चर्चा करून, त्यांनी एक अनोखा उपक्रम आखला. सध्या गावात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सुरू असल्याने, मयूर यांनी याच परंपरेला पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ठरवले की, आपला विवाह सोहळा साध्या पद्धतीने साजरा करून, पुढील वर्षाचा अखंड हरिनाम सप्ताह संपूर्णतः स्वतःच्या खर्चाने आयोजित करायचा.त्यामध्ये पत्रिका छपाईपासून ते पत्रावळींचा खर्च, गायक, वादक, साऊंड सिस्टम, कीर्तनकार आणि महाप्रसाद यासह सर्व खर्च त्यांनी उचलण्याचे ठरवले. या निर्णयामुळे धार्मिक कार्याला बळ मिळेल, तसेच उधळपट्टीवर आळा बसेल, असा मयूर यांचा विश्वास आहे या निर्णयाची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आणि उपस्थित कीर्तनकारांनी मयूर यांच्या या विचारांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. रवींद्र महाराज तारखेडेकर यांच्याकडे मयूर यांनी आपली संकल्पना व्यक्त केली. महाराजांनी यावर आनंद व्यक्त करत कीर्तनातूनही या आगळ्या उपक्रमाच कौतुक केले. गावकऱ्यांनीही मयूर यांच्या विचारांना पाठिंबा देत, त्यांच्या या निर्णयाला ऐतिहासिक ठरवले. वधू पक्षानेही या साध्या पद्धतीच्या विवाहासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मयूर अहिरे यांच्या या निर्णयाने विवाह परंपरेत एक सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश दिला आहे. अनावश्यक खर्च टाळून, तो धर्मकार्यासाठी आणि समाजाच्या हितासाठी वापरणे, ही काळाची गरज बनली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे निंभोरा गावाला एक नवीन ओळख मिळाली आहे.अखेर, मयूर दौलत अहिरे यांचा विवाह हा फक्त कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरला आहे. त्यांच्या या उपक्रमातून, त्यांनी फक्त एक नवीन परंपरा निर्माण केली नाही, तर भावी पिढीसाठी एक प्रेरणादायक संदेशही दिला आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.