पाचोरा -निवडणुकांचा काळ सुरू झाला की समाजात अनेक प्रकारच्या हालचाली घडू लागतात. मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेत्यांच्या सभा, घोषणा, आणि आश्वासनांची आतषबाजी सुरू होते. याचवेळी दुसऱ्या बाजूला, हंगामी व पोटभरु पत्रकारांसाठी अनेकांसाठी हे “सुगीचे दिवस” ठरतात. राजकारणाचा गदारोळ संपल्यानंतर माध्यम जगतात एक नवा फंडा समोर येतो. “ब्रेकिंग न्यूज” या नावाखाली विविध प्रकरणांना वाचा फोडली जाते, पण त्याचा हेतू समाजाच्या भल्यासाठी नसून काही वेळा ब्लॅकमेलिंग करणे असतो.
निवडणुकीनंतर अशा बातम्या हमखास दिसू लागतात: “दुधात भेसळ,” “रेशन दुकानांमध्ये लूट,” “दलालांचा बाजार,” “अवैध धंद्यांची खुलेआम नांदी,” ढाब्यांवर खुलेआम दारू विक्री, आंबे वडगाव भागात विजेची चोरी , तर पिंपळगाव पो स्टे हद्दीत अवैध धंदे उघडपणे कार्यरत या सर्व बातम्या एकीकडे धक्कादायक वाटतात, पण दुसरीकडे त्यांचा सत्याशी काही संबंध आहे का, याचा विचार मनात येतो. कारण अशा बातम्यांमध्ये पुरावे किंवा जबाबदार व्यक्तींची नावे दिसत नाहीत.
याला आपण “अंधारात तीर मारणे” असे म्हणतो. कोणत्याही प्रकारचे ठोस पुरावे नसताना केवळ भपंक बातम्या टाकून संबंधितांवर दबाव टाकणे आणि त्यातून आर्थिक फायद्याचा विचार करणे , ढाबा , हॉटेल हे नांव नाममात्र असले तरी शेदुर्णी – पाचोरा हायवेवर चालणारे अवैधकामांच्या लॉजिंग मधील खाट मालकां कडून सोयांबिन चिल्ली घरी नेणे , मित्रांना पार्टी देणे हेच उद्दिष्ट दिसते. माध्यमांमध्ये काही पत्रकार आणि त्यांच्यासोबत कार्य करणारे लोक या संधींचा पुरेपूर फायदा घेतात. या पद्धतीने पैसे उकळण्याचा हा खेळ नवीन नाही.
अशा बातम्या खऱ्या आहेत का? आणि जर खऱ्या असतील तर त्यावर कोणती कारवाई झाली? सत्य हे आहे की, “आभाळच एवढे फाटले आहे की कुठे ठिगळ लावणार?” स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा, आणि काही वेळा राजकारणी हे सर्वच जण या भ्रष्टाचाराचा भाग असतात. त्यामुळे सत्य समोर आले तरी दोषींवर कारवाई होणे जवळपास अशक्य ठरते.
माध्यमांचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांसमोर सत्य मांडणे, समाजातील समस्यांना वाचा फोडणे, आणि त्यावर चर्चा घडवून आणणे. मात्र, आजकाल माध्यमांची भूमिका बदलली आहे. काही पत्रकार आणि माध्यमसमूहांचे उद्दिष्ट हे सामाजिक जबाबदारीपेक्षा आपल्याच सहकार्याना टर्गेट करणे स्वतःच्या आर्थिक फायद्याच्या दिशेने झुकलेले दिसतात. त्यामुळे “सर्व काही विकले जाऊ शकते” ही मानसिकता वाढत आहे.
फालतू प्रकरणांना मोठे करून दाखवणे, ब्रेकींग टाकणे विनाकारण गोंधळ निर्माण करणे, किंवा समाजात भीतीचे वातावरण तयार करणे या गोष्टी सामान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सत्य पत्रकारितेचा खरा अर्थ हरवत चालला आहे.
काही पत्रकार स्वतःला नितीमूल्यांचे आदर्श प्रतिनिधी म्हणून मिरवतात. ते सातत्याने सांगतात की, “आम्ही कोणाचा एक रुपयाही घेत नाही, कोणाचे चहाचे लिंपित नाही,” पण त्यांचे खरे वर्तन हे त्यांच्या म्हणण्याला छेद देणारे असते. समाजातील सर्वसामान्य नागरिकांना हे कळते की, “मांजर डोळे मिटून दुध पित असते, पण बाकीचे डोळे उघडे ठेवून पाहत असतात.” अशा पत्रकारांबाबत समाजात चीड निर्माण होते.
पत्रकारितेला जेव्हा स्वच्छता आणि निष्ठेची गरज आहे, तेव्हा तिचे काही घटक भ्रष्टतेच्या चिखलात अडकले आहेत. त्यामुळे सर्व पत्रकारांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. आपण खरेच निष्पक्ष आहोत का? आपले कार्य समाजहितासाठी आहे का? या प्रश्नांची उत्तरे त्यांनी प्रामाणिकपणे शोधली पाहिजेत.
तसे म्हटले तर प्रामुख्याने “आप-आपल्या शिंगाने माती कोरा” ही उक्ती येथे लागू होते. केवळ स्वच्छतेचा आव आणून इतरांवर आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या कृतीने आदर्श निर्माण करणे हेच पत्रकारितेचे खरे यश आहे.
समाजाला खऱ्या अर्थाने जागृत ठेवण्यासाठी माध्यम क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. सत्यता, पारदर्शकता, आणि प्रामाणिकता या पत्रकारितेच्या मूळ तत्त्वांना जपणे काळाची गरज आहे.
पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाते. मात्र, तिच्या महत्त्वाला धक्का पोहोचवणाऱ्या घटना आणि कृती आज बघायला मिळतात. समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागले तरच पत्रकारिता ही पुन्हा एकदा विश्वासार्ह बनू शकते. तसे म्हटले तर प्रत्येक क्षेत्रात “सब हमाम में नंगे होते है” ही वस्तुस्थिती कितीही खरी असली तरी प्रत्येकाने आपल्या कामाचे मूल्य आणि महत्त्व काही प्रमाणात तरी जपले पाहिजे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.