चाळीसगांव – ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे हातगाव येथील एका नागरिकाची मोटारसायकल चोरीला गेल्याच्या प्रकरणातून चाळीसगांव ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने मोठ्या चोऱ्यांचा भंडाफोड केला आहे. या तपासात एकूण २९ पाणबुडी इलेक्ट्रीक मोटारी आणि एक हिरो स्प्लेंडर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतमोटार चोरीच्या मालिकेला मोठा प्रतिबंध लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मौजे हातगाव ता. चाळीसगांव येथील फिर्यादी व्यक्तीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या घटनेवरून चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ३०८/२०२५ भारतीय न्यायसंहिता कलम ३७९ प्रमाणे (मोटार वाहन चोरी) गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर मा. पोलिस अधीक्षक सो. जळगांव तसेच वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो. स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांच्या मार्गदर्शनानुसार समांतर तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काही संशयित व्यक्ती चोरीच्या वाहनांबाबत संशयास्पद हालचाली करीत आहेत. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशयित १) सोमनाथ उर्फ लंगडया रघुनाथ निकम (रा. अंधारी, ता. चाळीसगांव), २) सुधीर नाना निकम (रा. महारवाडी, ता. चाळीसगांव), आणि ३) सम्राट रविंद्र बागुल (रा. महारवाडी, ता. चाळीसगांव) यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी हातगाव येथून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या कबुलीजबाबानुसार त्यांनी मोटारसायकल ठेवलेल्या ठिकाणावरून पोलिसांनी ती मोटारसायकल हस्तगत केली. पुढील तपासात या आरोपींकडून पोलिसांनी अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी ग्रामीण भागातील अनेक शेतांमधून पाण्याच्या विहिरींवरील पाणबुडी इलेक्ट्रीक मोटारी चोरून विकल्याचे उघड केले. या खुलाशानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणांवर छापे टाकले. प्रारंभी ११ पाणबुडी इलेक्ट्रीक मोटारी हस्तगत करण्यात आल्या. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आणखी तपास सुरू ठेवला असता आणखी १८ पाणबुडी इलेक्ट्रीक मोटारी सापडल्या. अशा प्रकारे आरोपींकडून एकूण २९ पाणबुडी मोटारी आणि १ चोरीची मोटारसायकल असा मोठा माल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई ही केवळ चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनसाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून चाळीसगांव, अंधारी, रोहीणी आणि नांदगांव (जि. नाशिक) परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणबुडी मोटारी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या धडक कारवाईनंतर चोरट्यांच्या टोळीला मोठा आळा बसला आहे. संपूर्ण तपास व कारवाई ही मा. श्री. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगांव), श्रीमती कविता नेरकर मॅडम (अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव), श्री. विजयकुमार ठाकुरवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगांव उपविभाग), श्री. राहुल गायकवाड (वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव), आणि श्री. शशीकांत पाटील (पोलीस निरीक्षक, चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन) यांच्या सूचनांनुसार पार पडली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोकॉ महेश पाटील, पोकॉ भूषण शेलार, पोकॉ सागर पाटील, चापोकॉ बाबासाहेब पाटील तसेच चाळीसगांव ग्रामीण पोलिसांचे राफौ युवराज नाईक, पोहेकॉ गणेश चव्हाण, दीपक नरवाडे, संदीप पाटील, तुकाराम चव्हाण आणि विजय पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली. पोलीस विभागाकडून सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, ज्यांच्या शेतातून पाणबुडी इलेक्ट्रीक मोटारी चोरीस गेल्या असतील त्यांनी आपल्या मोटारींची ओळख पटवून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा व आपला माल परत घ्यावा. या कारवाईमुळे पोलिसांच्या दक्षतेचे आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेप्रती असलेल्या बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण समोर आले आहे. चाळीसगांव आणि नांदगांव तालुक्यातील ग्रामीण जनतेकडून या धाडसी पोलिस पथकाचे कौतुक केले जात आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.