पाचोरा नगरपालिकेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले – प्रशासकीय कारभार शिस्तबद्ध, विकासकामे टॉऊन हॉल मधील पार्कीगच्या जागातील अतिक्रमण सोडले तर सर्व कामे युद्धपातळीवर सुरू

0

Loading

पाचोरा नगरपालिकेचा शिस्तबद्ध कारभार नागरिकांच्या समाधानाचा केंद्रबिंदू — प्रशासक मंगेश देवरे यांच्या नेतृत्वाखाली “काम बोले – राजकारण नव्हे” या संस्कृतीचा उदय
पाचोरा – शहरात आगामी नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. गलियार्‍यांमध्ये चर्चा, गणितं, आणि समीकरणांच्या जोडघटती रंग घेऊ लागल्या आहेत. काहीजण एकतर्फी निकालाची भविष्यवाणी करत आहेत, तर काहींच्या मते यावेळी दुतर्फी किंवा तीन-चार तर्फी लढत रंगणार आहे. मात्र एक गोष्ट निश्चित — यावेळची निवडणूक पाचोऱ्यातील राजकारणाचा चेहरामोहरा बदलणारी ठरणार आहे. निवडणुकीचे वातावरण गरम होत असले तरी सध्या शहराचा कारभार पूर्णपणे राजकारणमुक्त, शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने चालू आहे. प्रशासक तथा मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय व्यवस्थेने नागरिकांचा विश्वास जिंकला आहे. नगरपालिकेचा कारभार सध्या अशा टप्प्यावर आहे, जिथे कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय प्रत्येक निर्णय नियमांनुसार घेतला जात आहे. कोणत्याही राजकीय दबावाशिवाय कामकाज केल्याने नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. प्रशासनाने शहराच्या विकासाची दिशा निश्चित करून प्रत्येक प्रकल्पासाठी ठराविक वेळापत्रक आखले असून, त्या वेळेत काम पूर्ण होईल यासाठी अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी स्वतःला समर्पित केले आहे. परिणामी, शहरातील स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, नळजोडणी, प्रकाश व्यवस्था अशा अनेक मूलभूत क्षेत्रांत सातत्याने सुधारणा होत आहे. प्रशासक मंगेश देवरे यांनी शहरातील नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेली विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहेत. शहराचा चेहरामोहरा बदलत असताना एक-दोन भागांतील अनियमिततेचे मुद्दे मात्र चर्चेचा विषय ठरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुशील डेअरी आणि साई मंदिर परिसरात बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांच्या प्रश्नावरून काही वाद निर्माण झाले आहेत. या परिसरात बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांवर स्पेशल ब्रँचच्या पथकाने कडक नजर ठेवली असल्याचे दिसते. मात्र या पथकाच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. शहरातील नागरिकांचा सवाल आहे की, हे पथक खरंच निष्पक्ष काम करत आहे का? कारण बाजारपेठेत गाळेधारक नियमित भाडे भरत असताना, काही रस्त्यावरील विक्रेत्यांवर विशेष लक्ष दिले जात असल्याची चर्चा आहे. हे पथक शेतकऱ्यांना त्रास देत असल्याची नाराजी देखील व्यक्त होत आहे. शहरातील नागरिक म्हणतात की, “भ्रष्टाचारमुक्त” अशी ओळख असलेल्या या पथकाने जर खरोखरच निष्पक्षता दाखवली असती, तर फक्त भुयारी पुलापासून साई मंदिरापर्यंतच नव्हे तर शहरातील सर्व ठिकाणी समान निकष लावले गेले असते. त्याचप्रमाणे, हुतात्मा स्मारक समोरील टाऊन हॉल परिसरात बसवण्यात आलेल्या पाईप्समुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठी गैरसोय भासत आहे. त्या ठिकाणी पाईप लावण्याचा निर्णय कोणत्या नियमांनुसार आणि कोणाच्या आदेशाखाली घेण्यात आला, हा देखील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. पाईपमुळे केवळ चारचाकी वाहने नव्हे, तर दुचाकी वाहने पार्किंगसाठी देखील अडचणीचे ठरत आहेत. टाऊन हॉलमधील एका व्यापाऱ्याने गाळा भाड्याने घेतल्यानंतर पार्किंगच्या जागेतच टेबल, खुर्च्या आणि चहाच्या जार ठेवून व्यवसाय सुरू केला आहे, असे नागरिक सांगतात. या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे लक्ष असूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की, “फुकटचा चहा न पिणारे” हे अतिक्रमणविरोधी अधिकारी या ठिकाणीच डोळेझाक का करत आहेत? या लहानशा अपवादांशिवाय, नगरपालिकेच्या एकंदर कारभारात तक्रारींचा सूर मात्र नाही. एखादी किरकोळ अडचण आली तरी ती तात्काळ सोडवली जाते. अधिकारी व कर्मचारी वर्ग शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असून, जनतेशी संवाद साधण्याची त्यांची पद्धत प्रशंसनीय आहे. राजकीय हस्तक्षेप नसल्याने कामकाज अधिक पारदर्शक झाले आहे. पूर्वी ज्या ठिकाणी एखादे काम मंजूर होण्यासाठी विविध दबावगट आणि टक्केवारीचे राजकारण चालायचे, ते आता पूर्णपणे थांबले आहे. प्रत्येक कामासाठी आवश्यक निधी, मंजुरी आणि नियोजन वेळेत पूर्ण होत आहे. नगरपालिकेच्या कारभारावर स्थानिक ज्येष्ठ नागरिक, व्यापारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार या सगळ्यांचं लक्ष आहे. या सर्व घटकांचे एकमताने मत आहे की, “सध्याच्या काळात प्रशासन ज्या पद्धतीने काम करत आहे, त्यात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नाही.” त्यामुळे शहरात वादविवाद निर्माण होत नाहीत, उलट शांततेचे वातावरण आहे. प्रशासक तथा मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी घेतलेली धोरणात्मक भूमिका शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देणारी ठरली आहे. त्यांनी प्रत्येक विभागात पारदर्शकता आणि जबाबदारी यांचा संगम घडवून आणला आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी वर्गालाही नियमांच्या चौकटीत राहून काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. परिणामी, कामकाजाचा वेग वाढला असून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांमध्ये एकमताने असा विचार पुढे येत आहे की, जर पुढेही नगरपालिकेचा कारभार या प्रशासकीय पद्धतीनेच चालवला गेला, तर पाचोरा शहराचा विकास अधिक वेगाने होईल. कारण सध्याची कामे “राजकारणमुक्त” वातावरणात होत आहेत, आणि त्यामुळे शहराची प्रगती स्थिर व नियोजनबद्ध मार्गाने सुरू आहे. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांचा दृष्टिकोन अत्यंत दूरदर्शी आहे. शहरातील स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व्यवस्था, नळजोडणी प्रकल्प, आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण ही कामे निश्चित वेळेत पूर्ण होत आहेत. पूरग्रस्त परिस्थितीतही प्रशासनाने दाखवलेली तत्परता उल्लेखनीय ठरली. रात्री-दिवस चालणाऱ्या कामांमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी विश्वास आणि आदर वाढला आहे. आगामी नगर पालिका निवडणुकीत कोणतेही राजकीय पॅनल सत्तेवर आले, तरी मंगेश देवरे यांच्या नेतृत्वाखालील हा काळ पुढील प्रतिनिधींसाठी आदर्श ठरेल, यात शंका नाही. कारण या काळात “काम बोले – राजकारण नव्हे” ही नवी संस्कृती पाचोऱ्यात दृढपणे रुजली आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर, नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य, आणि पारदर्शक कारभार या सर्व बाबी शहराला नवे शिखर गाठण्यासाठी मदत करत आहेत. निवडणुकीनंतर जर सर्वानुमते असा निर्णय झाला की, सध्याप्रमाणे टक्केवारीचे वितरण न करता नियमानुसार विकासकामांची पद्धत कायम ठेवायची, तर शहराचा विकास अधिक नियंत्रित, स्थिर आणि सातत्यपूर्ण राहील. अखेरीस हेच म्हणावे लागेल की, प्रशासक तथा मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या संयमित, निर्णयक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे पाचोरा शहरात “काम बोले – राजकारण नव्हे” या नव्या संस्कृतीचा पाया भक्कम झाला आहे. भविष्यातही हीच दिशा कायम राहिली, तर पाचोरा शहर विकास, शिस्त आणि स्वच्छतेच्या आदर्श उदाहरणांपैकी एक ठरेल यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here