पुण्यातील आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलसाठी कवी वैभव प्रभाकर महाजन यांची निवड

0

देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करणाऱ्या ऐतिहासिक भिडेवाड्यात महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या कार्याचा जागर घडवणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. २ जानेवारी ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत पुण्यातील एस.एम. जोशी फौंडेशन सभागृह, नवी पेठ येथे हा चार दिवसीय महोत्सव भव्य स्वरूपात होणार आहे.                                  उत्राण (ता. एरंडोल, जि. जळगाव) येथील प्रसिद्ध कवी वैभव प्रभाकर महाजन यांची या फेस्टिव्हलसाठी निवड करण्यात आली आहे. आयोजकांनी त्यांना यासंदर्भातील अधिकृत पत्र दिले असून, त्यांच्या सहभागाने या महोत्सवाला नवा आयाम मिळणार आहे.  या फेस्टिव्हलमध्ये विविध जनजागृती आणि प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भिडेवाड्याच्या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि फुले दाम्पत्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हा महोत्सव एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.        फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या ५०० हून अधिक देश-विदेशातील कवी व कलाकार विविध प्रकारच्या कलाकृती सादर करतील. यामध्ये गझल, कविता, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगितिक पोवाडे, महिला सक्षमीकरणासाठी लाठी-काठी, दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिक अशा उपक्रमांचा समावेश असेल.या महोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे फुले कार्यकर्त्यांसाठी दिला जाणारा “फुले समाजरत्न पुरस्कार”. या पुरस्काराने देश-विदेशातील २५ फुलेप्रेमी कवी, कवयित्री आणि कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. फेस्टिव्हलमधील सर्व कवयित्री सावित्रीमाई फुलेंच्या वेशभूषेत आपली कविता सादर करतील, ही या महोत्सवाची खासियत असेल. यामुळे सावित्रीमाईंच्या कार्याचा नवा जागर रसिकांना अनुभवता येईल. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे. विशेष म्हणजे, चारही दिवस सहभागी होणाऱ्या कवी, कलाकार आणि रसिकांना चहा, नाश्ता व दुपारचे भोजन मोफत दिले जाणार आहे.फुलेप्रेमी शिक्षक आणि कवी विजय वडवेराव यांनी या उपक्रमामागील उद्देश सांगताना म्हटले की, “फुलेंच्या कार्याचा प्रचार-प्रसार करण्याचा वसा घेऊन आम्ही या पहिल्या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. सर्व फुलेप्रेमींनी व रसिकांनी यात सहभागी होऊन या चळवळीत योगदान द्यावे.”कवी वैभव प्रभाकर महाजन यांची निवड झाल्याने जळगाव जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यांच्या सादरीकरणातून भिडेवाड्याच्या इतिहासाचा गाभा उलगडत प्रबोधनाचा संदेश प्रभावीपणे दिला जाणार आहे.फुले फेस्टिव्हल म्हणजे फुलेंच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. सर्वांनी या महोत्सवाला हजेरी लावून फुले दांपत्यांच्या कार्याचा गौरव करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here