पाचोरा, ता. २२ ऑक्टोबर २०२४: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जारगाव शिवारात बनावट दस्त तयार करून जमिनीच्या खरेदी-विक्रीत फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार संतोष भिला सोनवणे (वय ३७, रा. नांद्रा, ता. पाचोरा) याला पाचोरा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात
संगनमताने बनावट आधारकार्ड, सातबारा उतारे आणि इतर दस्तऐवज तयार करून मुळ मालक आणि खरेदीदाराची मोठी फसवणूक करण्यात आली होती.
फिर्यादी श्री. सतेज सखाराम भारस्कर (वय ५२, सह दुय्यम निबंधक, पाचोरा) यांच्या तक्रारीनुसार पाचोरा पोलीस
ठाण्यात गु.र.नं. ४७१/२०२४ नुसार भारतीय दंड संहिता कलम ४१८, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ तसेच भारतीय नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी जारगाव शिवारातील गट नंबर १३४/२, प्लॉट नंबर ९ क्षेत्रफळ १८० चौ. मीटर या जमिनीचे दस्त क्रमांक ६९५७/२०२४ तयार केला. मुळ मालक
सौ. शीतल सुनीलकुमार पाटील यांच्या नावाने बनावट आधारकार्ड तयार करून मुळ मालकाऐवजी तोतया महिला उभी करून २,८५००० रुपयांना नगराज गोविंदा आहिरे यांना जमीन विकली.
गुन्ह्यात सहभागी आरोपींमध्ये शीतल सुनीलकुमार पाटील नावाची
तोतया महिला, पुंडलीक काशिनाथ पाटील, अक्षय आधार बडगुजर यांच्यासह ३० ते ३५ वयाचा एक अनोळखी इसम सहभागी असल्याचे आढळून आले. या आरोपींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची व मुळ मालकांची फसवणूक केली.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस
अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धनंजय वेरुळे व पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी संतोष भिला सोनवणे पुन्हा अशाच प्रकारचा बनावट दस्त तयार करण्याच्या तयारीत आहे.
पाचोरा पोलिसांनी जारगाव चौफुली येथे सापळा रचून त्याला ताब्यात
घेतले. सुरुवातीला त्याने चुकीची नावे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विश्वासात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीकडून पोलिसांनी ५ लाख रुपयांची फसवणुकीची रोख रक्कम, बनावट आधारकार्ड, सातबारा उतारे, खरेदी खताच्या नकला व इतर महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले आहेत. याप्रकरणी मुख्य सूत्रधार आरोपीने इतर
साथीदारांसोबत मिळून यापूर्वीही अशाच प्रकारचे अनेक बनावट व्यवहार केल्याचा संशय आहे.
सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक काम करत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी, प्रकाश चव्हाणके व इतर कर्मचारी करत आहेत.
नागरिकांना आवाहन करण्यात येते
की जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना मुळ कागदपत्रांची व व्यक्तींची पडताळणी करावी. ओळखीच्या व्यक्तींशीच आर्थिक व्यवहार करावेत. कोणताही शंका वाटल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी, प्रकाश चव्हाणके, पोहवा ज्ञानेश्वर महाजन, राहुल शिंपी, विश्वास देशमुख, पोकॉ योगेश पाटील, सागर पाटील व जितेश पाटील यांनी केली.
जारगाव बनावट दस्त प्रकरण
उघडकीस आल्याने नागरिकांनी सतर्क राहून व्यवहार करणे गरजेचे आहे. पाचोरा पोलिसांनी या प्रकरणात महत्त्वाची कारवाई करून मोठ्या घोटाळ्याला आळा घातला आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.