चोपडा – चोपड्यातील ज्येष्ठ नागरिक संघाने जिल्ह्यातील अग्रगण्य संघ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. संघाच्या सभागृहाचे उद्घाटन आणि खुल्या व्यायाम शाळेच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना अध्यक्ष व ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. विकास हरताळकर यांनी संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले. “चोपडा ज्येष्ठ नागरिक संघ हा केवळ चोपडाच नव्हे, तर जिल्ह्यातील एक आदर्श संघ आहे. याठिकाणी उत्तम सोयीसुविधा, आरोग्यविषयक मार्गदर्शन, आणि व्यायामासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संघाने सामाजिक बांधिलकी जपत सतत विविध सेवा उपक्रम राबवले आहेत,” असे त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित अशा या संघाचे मुख्यालय कै. मगनलाल रामदास बडगुजर (साळुंखे) सभागृहात आहे, जे विद्यमान आमदार प्रा. आण्णासो. श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या तत्कालीन निधीतून उभारण्यात आले आहे. सभागृहाच्या उभारणीत बडगुजर कुटुंबीयांनी मोठे योगदान दिले आहे.
सहकार्याची कृतज्ञता व्यक्त करताना जिल्हा क्रीडा विभाग व नगरपालिका चोपडा यांचे मोलाचे योगदान अधोरेखित करण्यात आले. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या नागरिकांनी संघाच्या कार्यक्षम व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले.संघाच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संघाचे कार्यालय आणि खुल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान आमदार प्रा. आण्णासो. चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांना निमंत्रित करण्यात आले होते. परंतु, मुंबईत महत्त्वाच्या बैठकीसाठी उपस्थित राहावे लागल्याने त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवून संघाच्या यशस्वी भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात विनय पाठक यांच्या बासरी वादनाने झाली, ज्यामध्ये गणेश वंदनेचे सुमधुर सादरीकरण करण्यात आले. जिजाबराव नेरपगारे यांच्या प्रार्थनेने सोहळ्याला आध्यात्मिक प्रारंभ झाला. या उद्घाटन सोहळ्यात न.प. मुख्याधिकारी श्री. राहुल पाटील, कृ.उ.बा. संचालक श्री. गोपाल पाटील, बंधन बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. भरत पवार, माजी नगराध्यक्ष श्री. रमणलाल गुजराथी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या कामात मोलाचा वाटा उचलणारे संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख, उपाध्यक्ष जे.एस. नेरपगारे, सहसचिव इंजि. विलास पाटील, कोषाध्यक्ष दिलीपराव पाटील यांची देखील उपस्थिती होती. संघाच्या कार्यकारिणीत माजी कोषाध्यक्ष मुख्या सुभाष पाटील, एम.डब्ल्यू. पाटील, मधुकर पाटील यांचेही मोलाचे योगदान आहे. डॉ. विकास हरताळकर यांनी आपल्या भाषणात मधुमेहाच्या वाढत्या प्रादुर्भावावर चिंता व्यक्त केली. “मधुमेह हा एक मूक शत्रू असून तो हळूहळू डोळ्यांना, किडनीला आणि शरीराच्या विविध अवयवांना हानी पोहोचवतो. यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, आणि वैद्यकीय तपासणीची आवश्यकता आहे,” असे त्यांनी सांगितले. चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाने आजवर विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये आरोग्य तपासणी शिबिरे, व्यायाम सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचे कार्य उल्लेखनीय आहे. संघाच्या कार्याचा आवाका विस्तृत असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे ध्येय आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सचिव एन.डी. महाजन यांनी केले. त्यांनी संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला आणि पुढील कार्यासाठी दिशादर्शन केले. प्रा. श्याम गुजराथी यांनी आभार प्रदर्शन केले आणि उपस्थितांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचा समारोप संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पसायदानाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका फेस्कॉम सचिव शांताराम पाटील यांनी केले. त्यांना संघ सचिव विलास पाटील खेडीभोकरीकर यांनी साथ दिली. या उत्सवमय सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचेआणि अभिमानाचे भाव होते. चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाने जिल्ह्यातील इतर संघांसाठी एक आदर्श उभा केला आहे. उत्तम व्यवस्थापन, नवनवीन उपक्रम, आणि समाजसेवेच्या कटिबद्धतेमुळे संघाची प्रतिष्ठा दिवसेंदिवस उंचावत आहे. संघाच्या कार्यकर्त्यांनी यापुढेही असेच एकत्रित राहून सामाजिक कार्याचा वसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. चोपड्यातील या अग्रगण्य संघाने सामाजिक सेवेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात नवचैतन्य आणण्याचा वसा घेतला आहे, जो खरोखरच प्रेरणादायी आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.