मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती माणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने मराठी विभागाने प्रा. जगदीश संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पथनाट्य कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. द्वितीय वर्षातील विद्यार्थिनींचा पथनाट्य हा अभ्यासक्रमाचा भाग आहे. प्रत्येक विद्यार्थिनींना सहभागी करून प्रा. जगदीश संसारे यांनी पथनाट्य कार्यशाळा घेतली.
प्रा. जगदीश संसारे म्हणाले, “पथनाट्य हे केवळ नाटक नाही तर ती एक चळवळ आहे, समाजाला जागे करण्याचे काम पथनाट्य चळवळ करित असते. आपल्या आवाजाच्या जोरावर, मिळेल त्या जागी, प्रचंड ऊर्जा निर्माण करून रस्त्यावर आपल्याच विचारात गुंग असणाऱ्या माणसांना जागे करते ते फक्त पथनाट्य.”
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यशाळेत प्रा. संसारे यांनी मराठी भाषेचे संवर्धन कसे करावे, त्यावर आपले विचार मांडले. “केवळ आणि केवळ मराठीचाच अट्टाहास असावा. भाषेवर प्रेम करा, भक्ती असली तरी सक्तीची गरज नाही,” असे ते म्हणाले.
सदर कार्यशाळेत द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी अभ्यासक्रमात असलेल्या पथनाट्यांतील दोन पथनाटये सादर करून दाखविली. त्यासंदर्भात प्रा. जगदीश संसारे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ. रश्मी शेटये तुपे यांनी केले. महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी माधवी पवार हिने ‘ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमुची’ या गीताने कार्यशाळेची सुरूवात केली. महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख अतिथींचा सत्कार सेल्फ फायनॅन्सचे समन्वयक प्रा. दत्तात्रय गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यशाळेस मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यशाळेची सांगता प्रा. सुप्रिया शिंदे यांच्या ओघवत्या शैलीत झाली.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.