पी आर सरकार चॅरिटेबल ट्रस्टचा हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न

0

विरार (गुरुदत्त वाकदेकर) : विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या पी आर सरकार चॅरिटेबल ट्रस्टचा हळदीकुंकू समारंभ विरार पूर्व येथील भोयापाडा येथील सी बी एस सी स्कूलच्या सभागृहात उत्साही वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रेडिओ जॉकी जगदीश संसारे म्हणाले, “महिलांनी आपले घर सांभाळत असताना, स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढायला हवा. आपले आयुष्य आनंदाने व्यतीत करायला हवे.” शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सारीका रावत यांनी उपस्थित संस्कृती प्रेमी महिलांना मनःपूर्वक धन्यवाद दिले आणि हळदीकुंकू समारंभ आपल्या मधील स्नेहभाव वृद्धिंगत करेल असा विश्वास व्यक्त केला. रावत यांनी पी आर सरकार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी अल्प शूल्क आकारून पाड्यावरील विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन केले.

या मंगल प्रसंगी रेडिओ जॉकी माधवी पवार यांनी आपल्या पहाडी आवाजात ‘अफजलखानाच्या वधाचा’ पोवाडा सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. सेंट जोसेफ महाविद्यालयाच्या कलाकार विद्यार्थ्यांनी पथनाट्य, नृत्य आणि बहारदार गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. हळदीकुंकू समारंभात सहभागी झालेल्या महिलांनी विविध खेळांत भाग घेऊन बक्षीसे जिंकली.

विद्या तांबडी आणि संजिवनी किणी यांनी उस्फुर्तपणे कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. रक्षा भोया आणि जॉनिटा फर्नांडिस यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here