पाचोरा – तालुक्यातील सारोळा जि प शाळेचे नामांकित केंद्रप्रमुख श्री विनोद धनगर यांची सांस्कृतिक मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित “शिक्षणात संस्कृतीचे महत्त्व” या विषयावरील विशेष राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. ही निवड जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत गौरवास्पद बाब असून, त्यांच्या यशामुळे शिक्षण क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे. राजस्थानमधील ऐतिहासिक शहर उदयपूर येथे दिनांक ११ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. संपूर्ण भारतभरातून फक्त ४० शिक्षकांचीच या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे, आणि त्यात जळगाव जिल्ह्यातून एकमेव श्री. विनोद धनगर यांचा समावेश झाला आहे. केंद्रप्रमुख म्हणून त्यांच्या कार्यक्षमतेची ही दखल घेण्यात आली असून, राष्ट्रीय स्तरावर त्यांना संधी मिळणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. नुकतेच सांस्कृतिक मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून अधिकृत डेप्युटी डायरेक्टर यांचे पत्र प्राप्त झाले असून, त्याद्वारे त्यांच्या निवडीची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे भारतीय संस्कृतीचा शिक्षणात समावेश करून विद्यार्थ्यांना समृद्ध, नैतिक आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देणे. शिक्षण प्रणालीमध्ये भारतीय परंपरा, सण-उत्सव, नैतिक मूल्ये, आणि सांस्कृतिक घटक यांचा प्रभावी समावेश कसा करता येईल, याविषयी या प्रशिक्षणात सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. विविध राज्यांतील शिक्षकांना एकत्र आणून शैक्षणिक धोरणे, संस्कृतीशी संबंधित शिक्षण पद्धती, वर्तणूकशास्त्र, आणि सर्जनशील अध्यापन तंत्रज्ञान यावर विस्तृत चर्चासत्र घेतली जाणार आहेत. विनोद धनगर हे गेल्या अनेक वर्षांपासून सारोळा (ता. पाचोरा) येथे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असून, त्यांच्या दूरदृष्टीमुळे शिक्षण व्यवस्थापन, अध्यापन आणि नवीन उपक्रम राबवण्यात ते नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. त्यांनी वेळोवेळी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संस्कृती, कला, नाटक, संगीत आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्यांनी आपल्या केंद्रात शालेय विकास प्रकल्प, डिजिटल शिक्षण, कला व संस्कृती संवर्धन कार्यक्रम, बालगोपाळांसाठी नैतिक शिक्षण उपक्रम, तसेच स्थानिक परंपरांचे संवर्धन करण्यासाठी विशेष अभ्यासक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळेच त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठेच्या प्रशिक्षणासाठी झाली आहे. केंद्रप्रमुख श्री. विनोद धनगर यांच्या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी झालेल्या निवडीबद्दल शिक्षण विभागातील अनेक मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी श्री. विकास पाटील :- यांनी सांगितले की, “विनोद धनगर यांची निवड म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठी उपलब्धी आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षणच नव्हे, तर संस्कारक्षम शिक्षण मिळते.” उपशिक्षणाधिकारी श्री. नरेंद्र चौधरी :-यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधारित शिक्षण रुजवण्यासाठी श्री. धनगर यांचे योगदान मोठे आहे. राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या विचारांची दखल घेतली गेली आहे, ही बाब निश्चितच प्रेरणादायी आहे.” पाचोरा गटशिक्षणाधिकारी श्री. समाधान पाटील:- यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “विनोद धनगर हे नेहमीच शिक्षणासोबत संस्कृती आणि परंपरांचे संवर्धन करण्यासाठी कार्यरत असतात. त्यांची राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी झालेली निवड हे त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे.” शालेय पोषण आहार अधिक्षक श्रीमती सरोज गायकवाड:- यांनी त्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “संस्कृती आणि शिक्षण यांचा संगम असलेले अध्यापन हे काळाची गरज आहे. श्री. धनगर यांच्या सहभागामुळे शिक्षण क्षेत्राला नवा दृष्टिकोन मिळेल.” उदयपूर येथे होणाऱ्या या विशेष प्रशिक्षणानंतर, श्री. धनगर यांना राष्ट्रीय पातळीवर विविध शाळांमध्ये मार्गदर्शन करण्याची संधी मिळू शकते. तसेच, त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून जळगाव जिल्ह्यातही संस्कृती-आधारित शिक्षण पद्धतींच्या विस्तारासाठी विविध .उपक्रम राबवले जातील. या निवडीबद्दल श्री. विनोद धनगर यांनी साप्ता. झुंज & ध्येज न्युज संपादक संदीप महाजन यांच्याजवळ आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले –
“शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून, ते संस्कार व मूल्यांचा मजबूत पाया घालते. विद्यार्थ्यांना संस्कृतीशी जोडणे हे माझे ध्येय आहे. राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाल्याचा आनंद आहे आणि या प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान आपल्या शाळांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.” श्री. विनोद धनगर यांची राष्ट्रीय स्तरावर झालेली निवड ही पाचोरा तालुक्यासाठी आणि जळगाव जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या मेहनतीमुळे शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडणार असून, भविष्यात आणखी शिक्षक आणि केंद्रप्रमुख यांना अशा राष्ट्रीय प्रशिक्षणांची संधी मिळावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे!
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.