![]()
पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, ७५ वर्षांची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा लाभलेल्या श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे शालेय वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘कलारंग २०२५–२६’ या तीन दिवसीय सांस्कृतिक, शैक्षणिक व कलात्मक महोत्सवाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. १ जानेवारी २०२६ ते ३ जानेवारी २०२६ या कालावधीत शाळेच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या उपक्रमात सुमारे २५०० विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून आपले सुप्त कलागुण सादर केले. या महोत्सवाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आणि विजेत्या विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हॉईस चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करताना अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडतो, आत्मविश्वास वाढतो आणि कलागुणांना योग्य दिशा मिळते, असे मत व्यक्त केले. संस्थेने शिक्षणासोबतच कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना संधी देण्याची भूमिका सातत्याने जपली असल्याचे त्यांनी नमूद केले आणि या यशामागे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांचे विशेष कौतुक केले. समारंभाचे अध्यक्ष व्ही. टी. जोशी यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, या व्यासपीठावरून भविष्यातील कलाकार, खेळाडू आणि संवेदनशील नागरिक घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. पाटील (ठाकरे) यांनी शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. गत शैक्षणिक वर्षात शाळा व शिक्षकांनी विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीला सलाम केला. सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौंडिण्य यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले. या तीन दिवसीय ‘कलारंग’ महोत्सवाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, नेतृत्वगुण, संघभावना, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकास घडवणे हा होता. यंदा प्रथमच संस्थेच्या श्री. सु. भा. पाटील प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही स्नेहसंमेलनात सहभाग नोंदवून कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमादरम्यान गीत गायन, बालनाट्य, एकपात्री, सामूहिक नृत्य, फॅन्सी ड्रेस, चित्रकला, हस्तकला, रांगोळी, विज्ञान व गणित प्रदर्शन तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. गीत गायन लहान गटात वृंदाविशाल थोरात, आरव सोनवणे आणि देवयानी पाटील यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला, तर मोठ्या गटात श्रद्धा सोनवणे, कावेरी चौधरी आणि ऋतूपर्ण महाजन यांनी यश संपादन केले. बालनाट्य स्पर्धेत ‘निषेध अत्याचाराचा’ व ‘आदर्श गणपती संहार भ्रष्टाचाराचा’ या सादरीकरणांनी विशेष दाद मिळवली. एकपात्री स्पर्धेत दिव्यराज खैरनार प्रथम ठरला, तर सामूहिक नृत्यात पाचवी इयत्ता व दहावी ड या वर्गांनी प्रथम क्रमांक मिळवला. चित्रकला, हस्तकला, रांगोळी आणि विज्ञान-गणित प्रदर्शनांमधून विद्यार्थ्यांची कल्पकता व वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून आला. क्रीडा स्पर्धांमध्ये लिंबू-चमचा, धावणे, स्लो सायकलिंग, शटल रन, संगीत खुर्ची, तीन पायांची शर्यत अशा विविध प्रकारांत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मोठ्या गटातील कबड्डी स्पर्धा विशेष रोमांचक ठरली. या समारंभास संस्थेचे चेअरमन संजय वाघ, शालेय समितीचे चेअरमन दादासाहेब खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, संचालक भागवत महालपुरे, भूषण वाघ, माजी मुख्याध्यापक सुधीर पाटील, विश्वास साळुंखे, श्री. सु. भा. पाटील विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका उज्वला साळुंखे, ओम राठी, रवी अग्रवाल, नंदू प्रजापत, नंदकुमार कोतकर, आकाश वाघ, उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, सेवानिवृत्त शांताराम चौधरी, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, पर्यवेक्षक आर. बी. तडवी, आर. बी. बांठिया, उपप्रमुख रविंद्र बोरसे, क्रीडा प्रमुख एस. पी. करंदे, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालयीन अधीक्षक अजय सिनकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. बोरसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. एकूणच ‘कलारंग २०२५–२६’ या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला, क्रीडा आणि सर्जनशीलतेला उजाळा देत शाळेच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक सुवर्णपान जोडले.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.







