पाचोरा-भडगावचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेश निश्चित, मुंबईत होणार औपचारिक प्रवेश

0

पाचोरा : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश निश्चित झाला आहे. नुकतीच त्यांनी शेंदुर्णी येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांची भेट घेतली. या भेटीनंतर वाघ यांच्या भाजप प्रवेशावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबई येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमात दिलीपभाऊ वाघ यांचा औपचारिक पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या घडामोडींमुळे वाघ समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
     शेंदुर्णी येथे नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची सभा संपन्न झाली. सभेनंतर मंचावरून उतरून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलीपभाऊ वाघ यांच्या जवळ जाऊन त्यांचे स्वागत स्विकारले. यावेळी फडणवीस साहेबांनी वाघ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ घेऊन भाजप प्रवेशासंदर्भातील सहमती दर्शवली. या महत्त्वाच्या बैठकीस पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ आणि भाजपचे पाचोरा येथील स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
   श्री वाघ यांनी मुख्यमंत्री आणि गिरीशभाऊ महाजन यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत भाजप प्रवेशासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. अनेक महिन्यांपासून वाघ यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर या भेटीनंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, वाघ यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे.
     भाजपला एक मजबूत स्थानिक नेता मिळणार आहे. वाघ समर्थकांची मोठी फळी त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे भाजपला पाचोरा आणि भडगाव भागात अधिक बळकटी मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वाघ यांच्या राजकीय अनुभवाचे आणि जनसंपर्काचे कौतुक केले आहे. त्यांनी वाघ यांच्या नेतृत्वाखाली या भागात भाजप अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
श्री वाघ यांच्या भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा होताच समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक समर्थकांनी सोशल मीडियावरून आनंद व्यक्त केला आहे. पाचोरा आणि भडगाव भागात फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वाघ समर्थकांनी ‘जय श्रीराम’, ‘वंदे मातरम’ आणि ‘भारतीय जनता पक्ष जिंदाबाद’ अशा घोषणा देऊन आनंद साजरा केला.
     ‘दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेश हा संपूर्ण पाचोरा-भडगाव मतदारसंघासाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हा भाग आणखी विकसित होईल,’ असे एका स्थानिक भाजप कार्यकर्त्याने सांगितले.
     दिलीपभाऊ वाघ यांचा औपचारिक भाजप प्रवेश मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर होईल. वाघ समर्थक आणि पाचोरा-भडगाव मतदारसंघातील नागरिक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
     शेंदुर्णी येथे  मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ घेऊन स्वागत स्विकारल्याचा व्हिडिओ देखील सोशल

मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये फडणवीस यांनी वाघ यांच्याजवळ जाऊन काही वेळ चर्चा केली आणि त्यांच्या प्रवेशाला पाठिंबा दिला असल्याचे स्पष्ट केले. हा व्हिडिओ पाहून समर्थकांनी जल्लोष केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here