जामनेरमध्ये जागतिक कुस्तीचा थरार : महाराष्ट्राच्या मातीतील पैलवानांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार आव्हान!

0

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘नमो कुस्ती महाकुंभ-२’ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना, “सध्या जागतिक पटलावर देशाचे, विशेषतः महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव मोठ्या अभिमानाने कोरत आहेत. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ, एशियन गेम्ससारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या मातीतील खेळाडूंनी सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मातीवरील कुस्तीची आपली पारंपरिक ताकद आजही जागतिक स्तरावर झळकते आहे,” असे गौरवोद्गार काढले.
        नमो कुस्ती महाकुंभ-२ या स्पर्धेचे आयोजन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री आमदार अनिल पाटील, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), मंगेश चव्हाण, संजय कुटे, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, अमोल जावळे, अनुपभैय्या अग्रवाल, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी रामदास तडस, जामनेरच्या माजी नगराध्यक्ष साधनाताई महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.                                            जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि क्रीडा वारसा जपणारे शहर आहे. याच शहरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन होणे, ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. “कुस्ती हा केवळ खेळ नसून, तो आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. मातीशी नाळ असलेल्या या खेळाने आपल्या देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले, ते खाशाबा जाधव यांच्या माध्यमातून. आजही महाराष्ट्रातील विजय चौधरी, सोनाली मंडलिक, राजीव पटेल यांसारख्या कुस्तीपटूंनी आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावर परदेशी प्रतिस्पर्ध्यांना चित करत जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे,” असे फडणवीस म्हणाले.
        मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात मॅटवरील कुस्तीमुळे मरगळ आलेल्या भारतीय कुस्ती क्षेत्राला मातीवरील कुस्तीने पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून दिल्याचे सांगितले. “मागील काही वर्षांत मॅटवरील कुस्तीमुळे आपण थोडे मागे पडलो होतो. मात्र, आपल्या मातीतील कुस्तीपटूंनी मेहनतीच्या जोरावर दमदार पुनरागमन केले आहे. या स्पर्धेमुळे नवोदित कुस्तीपटूंना संधी मिळत आहे आणि जागतिक स्तरावर झळकण्यासाठी ही व्यासपीठ ठरत आहे,” असे ते म्हणाले.
         ‘देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा’ ही यंदा अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. भारतासह फ्रान्स, रोमानिया, इस्टोनिया, उझबेकिस्तान, जॉर्जिया आदी नऊ देशांतील जागतिक विजेते, ऑलिम्पियन, हिंदकेसरी, रुस्तम-ए-हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी यांसारखे नामांकित कुस्तीपटू सहभागी झाले होते. त्यामुळे स्पर्धेची रंगत आणि दर्जा अधिकच वाढला होता. या स्पर्धेत महाराष्ट्राचे पृथ्वीराज पाटील, सोनाली मंडलिक, विजय चौधरी यांनी आपापल्या गटांमध्ये दमदार खेळाचे प्रदर्शन करत परदेशी कुस्तीपटूंना पराभूत केले.
       गिरीश महाजन यांच्या कुस्तीवरील प्रेमाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “गिरीशभाऊ हे देखील उत्तम कुस्तीपटू होते. त्यांनी विद्यापीठ पातळीवर अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. आता राजकारणाच्या आखाड्यात देखील त्यांनी आपल्या विरोधकांना चित केले आहे!” ही मिश्कील टिप्पणी करत त्यांनी गिरीश महाजन यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले.
देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा ही महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला पुढे नेणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले, “या स्पर्धेमुळे कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकण्याची संधी मिळते. तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रेरणा मिळते. गिरीश महाजन यांच्या पुढाकारामुळे जामनेरसारख्या शहरात एवढ्या भव्य स्पर्धेचे आयोजन होणे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.”
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. उपस्थित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेतला आणि कुस्तीपटूंना प्रोत्साहन दिले. “नागरिकांनी शांततेत आणि शिस्तीत स्पर्धेचा आनंद घेतला, हेच या स्पर्धेच्या यशाचे खरे लक्षण आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी नमूद केले.
या स्पर्धेतील अनेक चुरशीचे आणि उत्कंठावर्धक सामने उपस्थितांनी अनुभवले. महाराष्ट्रातील खेळाडूंनी दाखवलेल्या कणखर खेळामुळे उपस्थितांनी वेळोवेळी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. विशेषतः पृथ्वीराज पाटील आणि विजय चौधरी यांच्या सामन्यांनी उपस्थितांची मने जिंकली. परदेशी कुस्तीपटूंनीही आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या भव्य स्पर्धेचे आयोजन सुरळीतपणे पार पडण्यासाठी गिरीश महाजन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत, जिल्हा प्रशासनाचे सहकार्य आणि कुस्तीगीर संघटनेचे योगदान यांचा मोठा वाटा असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. “आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन होत राहिल्यास महाराष्ट्रातील कुस्तीपटू जागतिक स्तरावर निश्चितच चमकतील,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, खेळाडू, आयोजक आणि नागरिकांचे आभार मानत स्पर्धेचा समारोप करण्यात आला. कुस्ती क्षेत्रासाठी ही स्पर्धा नव्या पर्वाची सुरुवात ठरेल, असा विश्वास व्यक्त होत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here