विद्यार्थीनी संशोधनासाठी सक्रिय व्हावे, जागतिक महिला संशोधन दिना निमित्ताने – डॉ. एस. ए. पाटील यांचे प्रतिपादन

0

ऐनपूर-  येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला संशोधन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस. ए. पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नरेंद्र मुळे उपस्थित होते.
    डॉ. नरेंद्र मुळे यांनी आपल्या भाषणात महिला संशोधक व त्यांच्या कार्याची माहिती दिली. त्यांनी ऐतिहासिक काळातील महिला संशोधकांचे योगदान विशद करताना आधुनिक काळातील महिला संशोधकांच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी मांडली. महिलांनी संशोधन क्षेत्रात केलेले भरीव योगदान, त्यांच्या संशोधनातून समाजाला मिळालेल्या सुविधा आणि वैज्ञानिक प्रगतीवर त्यांनी प्रकाश टाकला.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. एस. ए. पाटील यांनी मंगलयान मोहिमेतील महिला संशोधकांचे योगदान विशेषतः अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थिनींना संशोधन क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन करताना म्हटले की, ‘आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. संशोधन हे केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित नसून, समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. महिलांनी संशोधन क्षेत्रात उतरल्यास नव्या संकल्पना, नवे शोध आणि नव्या दिशा मिळतील.’ त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना संशोधनासाठी आवश्यक कौशल्ये, चिकाटी, जिज्ञासा आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून दिले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. हेमंत बाविस्कर यांनी केले. त्यांच्या ओघवत्या आणि प्रभावी निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. आभार प्रदर्शन प्रा. ऋतुजा पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. एस. पी. उमरीवाड, प्रा. कोमल सुतार, प्रा. काजल महाजन, प्रा. वैष्णवी पाटील, श्रेयस पाटील, श्री. गोपाल पाटील आणि हर्षल पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.
     या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान संशोधन प्रक्रियेबाबत विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ञांनी सविस्तर उत्तरे दिली. महिला संशोधन दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींमध्ये संशोधनाची आवड निर्माण झाली. या कार्यक्रमातून महिलांनी संशोधन क्षेत्रात उतरणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित झाले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींना संशोधनासाठी प्रोत्साहन मिळते व त्या समाजाच्या सर्वांगीण विकासात योगदान देऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here