रावेर – तालुक्यातील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. “शिवजयंती नाचून नव्हे, तर वाचून साजरी व्हावी; शिव विचारांचा जागर व्हावा” या उदात्त हेतूने प्रेरित होत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. प्रदीप तायडे व प्रा. अक्षय महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य व कर्तृत्वावर आधारित वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. व्ही. एच. पाटील आणि प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी उपस्थिती दर्शवली. महाविद्यालयातील इतर मान्यवर प्राध्यापक प्रा. डॉ. जे. पी. नेहते, प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके, प्रा. डॉ. पी. आर. गवळी, प्रा. मिलिंद भोपे आणि प्रा. ज्ञानेश्वर कोळी यांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. हर्षल पाटील व श्रेयस पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या वकृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यकारभार, प्रशासकीय धोरण, जल धोरण, स्त्री विषयक विचार, धार्मिक धोरण, स्वराज्य स्थापना, अफजलखान प्रसंग, शाहिस्तेखान प्रसंग, आग्रा भेट अशा विविध विषयांवर प्रभावी भाषण सादर केले. स्पर्धकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करून त्यांचे कार्य आणि योगदान स्पष्ट शब्दांत मांडले. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक मयुरी राजेश पाटील (तृतीय वर्ष कला) हिने पटकावला. द्वितीय क्रमांक विभागून ललित कडू पाटील (एम. एस्सी), दिव्या ब्रीजलाल जोगी (प्रथम वर्ष कला) यांनी मिळवला. तर तृतीय क्रमांक संजना विनोद भालेराव (द्वितीय वर्ष कला) हिने पटकावला. परीक्षक म्हणून प्रा. व्ही. एच. पाटील व प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांनी स्पर्धकांचे कौतुक करत त्यांना भविष्यात अधिक उत्तम वक्ते बनण्यासाठी मार्गदर्शन केले. वकृत्व स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी भाषणांतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा विविध पैलूंनी उहापोह केला. स्वराज्य स्थापनेपासून ते औरंगजेबाच्या विरोधातील संघर्षापर्यंत शिवचरित्रातील महत्त्वाच्या घटना विशद करताना, स्पर्धकांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यासपूर्ण मांडणी केली. काही विद्यार्थ्यांनी विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्त्री सन्मान धोरणावर प्रकाश टाकला, तर काहींनी त्यांचे आर्थिक धोरण आणि आधुनिक प्रशासनासाठी केलेले योगदान अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदीप तायडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अक्षय महाजन यांनी मानले. उपस्थित मान्यवरांनी शिवजयंती निमित्त आयोजित या वकृत्व स्पर्धेचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाचे विशेष कौतुक करत त्यांना भविष्यात इतिहासाच्या गहन अध्ययनासाठी प्रोत्साहित केले. या वकृत्व स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडला. महाराजांचा जीवनसंघर्ष, त्यांची ध्येयधोरणे आणि प्रशासनातील नवनवीन संकल्पना यांचा व्यापक आढावा घेत विद्यार्थ्यांनी शिवचरित्राचा गाढा अभ्यास केला. या स्पर्धेच्या निमित्ताने शिवजयंती केवळ नृत्य व संगीताच्या माध्यमातून नव्हे, तर खऱ्या अर्थाने विचारांच्या मंथनातून साजरी करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार, त्यांचे अभ्यासपूर्ण विचार, तसेच उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने घेतलेला हा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांना नव्या दृष्टिकोनाने इतिहासाचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करणारा ठरला
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.