छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र म्हणजे पराक्रम, धैर्य, स्वाभिमान आणि मातृभूमीवरील निष्ठेचा उत्कृष्ट संगम आहे. महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या या महापुरुषाने केवळ तलवारीच्या धारेवर नव्हे, तर दूरदृष्टी, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि उत्कृष्ट प्रशासन कौशल्याने स्वराज्याचे तोरण उभे केले. इतिहासाच्या या सुवर्णयुगाचा जागर आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी गडावर जिजाऊ माता आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी झाला. बालपणापासूनच त्यांच्यावर त्यांच्या आईचा मोठा प्रभाव होता. श्रीमंत जिजाऊमाऊलींच्या प्रेरणेने शिवबांचे व्यक्तिमत्त्व घडले. महाराजांच्या मनात स्वराज्य स्थापन करण्याची कल्पना बालपणापासूनच दृढ झाली होती आणि त्याच ध्येयाने त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. स्वराज्य ही केवळ एका व्यक्तीची कल्पना किंवा विचार नव्हे, तर हजारो मावळ्यांच्या पराक्रमाची गाथा आहे. या मावळ्यांनी आपली कर्तव्यनिष्ठा आणि शिवरायांवरील अखंड विश्वास यांच्या जोरावर इतिहास घडवला. यात येसाजी कंक – जे ६५ किलोची तलवार सहज उचलत, त्यांचे नाव येसाजी. शिवरायांच्या सैन्यातील हा शूर सरदार आपले बळ आणि धैर्याने शत्रूवर विजयी होत असे. बाजी प्रभू देशपांडे – ज्यांनी दोन हजार सैन्यांशी एक त झुंज दिली, त्याचे नाव बाजी. पावनखिंडीतील लढाईत त्यांच्या पराक्रमानेच शिवरायांना विश्रांतीचा क्षण मिळू शकला. तानाजी मालुसरे – ज्यांचा हात तुटला तरी लढण्याची जिद्द कायम असते, त्याचे नाव तानाजी. सिंहगडाच्या लढाईत त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन किल्ला जिंकला आणि इतिहास घडवला. संताजी घोरपडे – जे आठ तासांत दिल्लीवरून पुण्याला घोडा घेऊन येतात त्य त्यांचे नाव संताजी. त्यांच्या विलक्षण गती आणि पराक्रमामुळे मराठा साम्राज्याला अभिमान वाटतो. धनाजी जाधव – ज्यांनी शत्रूच्या छावणीत घुसुन कळस कापून आणला त्यांचे नाव धनाजी. त्यांच्या धाडसामुळे शत्रू देखील भयभीत होई. प्रतापराव गुजर – “वेड्यात मराठे वीर दौडले सात” या ओळींमध्ये अमर झालेले शूर योद्धा. अफजलखानाच्या सैन्याला पराभूत करण्यासाठी आणि मोगलांच्या वर्चस्वाला तडा देण्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाला तोड नाही. त्यांनी स्वराज्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आणि युद्धभूमीवर स्वतःला झोकून दिले. यासारख्या अनेक सर्व जाती – धर्मच्या मावळ्यांची मांदियाळी एकत्र करून, त्यांना दिशा देऊन आणि त्यांचे बलिदान सार्थ करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यांच्यामुळेच स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. शिवरायांनी केवळ तलवारीच्या जोरावर स्वराज्य उभे केले नाही, तर उत्तम प्रशासनाच्या आधारावरही त्याला टिकवले. त्यांनी न्यायप्रियता, धार्मिक सहिष्णुता आणि लोकहिताची धोरणे राबवली. राज्यकारभारात स्वराज्यव्यवस्थेचा ठसा उमटवताना त्यांनी लष्करी संघटना, आरमार, किल्ल्यांची व्यवस्था आणि राजकीय युती यावर भर दिला. त्यांनी असलेली प्रजाहितदक्षता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. धर्म, जात, पंथ यांच्या भिंती तोडून त्यांनी ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले. त्यांच्या सैन्यात सर्व जाती-धर्मातील सैनिक होते. ‘१८ पगड जाती’ हे त्यांचे धोरण केवळ घोषणा नव्हे, तर प्रत्यक्षात अंमलात आणलेला आदर्श होता. शिवरायांचे कार्य आणि विचार केवळ ऐतिहासिक नोंदीपुरते मर्यादित नाहीत. आजच्या काळातही त्यांचे तत्त्वज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. आज सामाजिक एकता, स्वाभिमान आणि कार्यकुशलता यांचा अभाव जाणवतो. भ्रष्टाचार, जातीयवाद, देशविघातक प्रवृत्ती आणि अराजकता यांचा मुकाबला करण्यासाठी शिवरायांच्या विचारांची गरज आहे. संघटन कौशल्य: शिवरायांनी केवळ मावळ्यांना संघटित केले नाही, तर विविध समाजघटकांना एकत्र आणून स्वराज्य निर्माण केले. आजही देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक ऐक्य महत्त्वाचे आहे. सुव्यवस्थापन: त्यांनी किल्ले व्यवस्थापन, लष्करी प्रशासन, गुप्तचर यंत्रणा आणि महसूल प्रणाली यासारख्या क्षेत्रांत अद्वितीय कार्य केले. आजच्या प्रशासनाने त्यांचे धोरण आत्मसात करायला हवे. समानता आणि न्याय: त्यांनी सर्व जाती-धर्मांना समान वागणूक दिली. आजच्या समाजाला ही समता जोपासण्याची नितांत गरज आहे. स्त्रीसन्मान आणि सुरक्षाव्यवस्था: शिवरायांचा काळ हा स्त्रीसन्मानासाठी प्रसिद्ध होता. त्यांनी स्त्रियांची अब्रू राखण्यासाठी कठोर कायदे केले. आजही महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या ध्येयधोरणांची गरज आहे. शिवजयंती – अभिमान आणि प्रेरणादायी दिव आज आपण शिवजयंती साजरी करतो, मात्र केवळ ढोल-ताशांच्या गजरात ही जयंती साजरी करण्याऐवजी शिवरायांच्या विचारांना आचरणात आणणे खूप महत्त्वाचे आहे. शिवरायांचे नेतृत्व गुण आत्मसात करून प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करावे. त्यांच्या प्रशासनिक धोरणांमधून शिकून देशासाठी उत्तम नागरिक बनावे.त्यांची धर्मनिरपेक्षता आणि समानतेची शिकवण अंगीकारून जातीयवाद संपवण्याचा प्रयत्न करावा.त्यांनी जसा स्वराज्यासाठी आपल्या आयुष्याची आहुती दिली, तसाच प्रत्येकाने आपल्या देशाच्या हितासाठी कार्य करावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि कार्य हे संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे ध्येय, पराक्रम, रणनीती, शौर्य आणि प्रजाहितदक्षता आजच्या काळातही लागू पडतात. भारत देश महासत्ता बनावा, प्रत्येक व्यक्ती स्वाभिमानाने जगावी आणि न्याय, समता आणि बंधुभावाने समाज उभारावा, यासाठी शिवरायांचे विचार आपल्या जीवनात रुजले पाहिजेत.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.