पाचोरा: श्री अंबाजी माता मंदिराच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त ४ मार्च २०२५ रोजी मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी नगर येथील या मंदिरात महाप्रसाद (भंडारा), महापूजा, पार्थिव शिवलिंग पूजन व महाआरतीचे आयोजन असून, या सोहळ्यासाठी हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मात्र, या सोहळ्याच्या

पार्श्वभूमीवर गांधी नगर परिसरातील भुयारी गटारीमुळे मुख्य रस्त्यांवरील खड्डे हे भाविकांसाठी मोठी समस्या ठरत आहेत. मंदीराकडे येणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता संभाव्य अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. स्थानिक नागरिक व भाविकांनी प्रशासनाकडे तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. श्री अंबाजी माता मंदिराचा वर्धापन दिन हा भाविकांसाठी श्रद्धेचा मोठा सोहळा असतो. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, तसेच कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा, यासाठी पाचोरा नगरपालिकेने तसेच विद्यमान नगरसेवक व भावी नगरसेवक यांनी ही महत्वाची समस्या लक्षात घेऊन तातडीने लक्ष घालून संबंधित रस्त्यांचे डांबरीकरण अथवा खड्डे बुजवण्याचे काम हाती घ्यावे, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. नगरपालिकेने वेळीच उपाययोजना केल्यास, या धार्मिक सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही आणि कार्यक्रम निर्विघ्न पार पडेल. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.