ताण-तणाव मुक्त जीवनासाठी ऐनपूर महाविद्यालयात मार्गदर्शन कार्यशाळा

0

Loading

ऐनपूर, ता. रावेर: सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे मानसशास्त्र विभागातर्फे “ताण-तणाव मुक्त जीवनशैली” या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तणावातून मुक्त राहता यावे, मनाच्या चंचलतेवर नियंत्रण मिळवता यावे आणि ध्यानसाधनेच्या माध्यमातून आत्मचिंतन करता यावे, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी. अंजने यांनी या कार्यशाळेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये तणाव न घेता सकारात्मक विचारसरणी अंगीकारण्याचे महत्त्व पटवून दिले. “तणाव हे आपल्या मानसिक आरोग्यावर आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम करत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ताण-तणाव मुक्त जीवनशैली अंगीकारून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेले पाहिजे,” असे ते म्हणाले.
कार्यशाळेच्या सुरुवातीला मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी विद्यार्थ्यांसमोर विषयाची सखोल ओळख करून दिली. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, मनाची चंचलता, आणि त्याचा एकूण व्यक्तिमत्त्वावर होणारा प्रभाव याविषयी मार्गदर्शन केले. “मन हे अत्यंत चंचल असते. आपल्या मनात सतत वेगवेगळे विचार येत असतात आणि आपण त्या विचारांवर कृती करतो. त्यामुळे मनावर नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे आहे. जर मनावर अनावश्यक तणाव निर्माण झाला, तर त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी ध्यान, योगसाधना आणि सकारात्मक विचार यांचा सराव करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेचे प्रमुख वक्ते माननीय विजय पाटील (रावेर) यांनी विद्यार्थ्यांना मानसिक तणाव दूर करण्यासाठी ध्यानसाधनेचे महत्त्व पटवून दिले. “आपण नेहमीच इतरांच्या वागण्याकडे, बोलण्याकडे लक्ष देतो. मात्र, आपण स्वतःला किती ओळखतो? स्वतःच्या मानसिकतेकडे, भावनांकडे किती लक्ष देतो? याचा विचार फारसा करत नाही. ध्यानाच्या माध्यमातून स्वतःचे आत्मनिरीक्षण करता येते आणि आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करून मन:शांती मिळवता येते,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यांनी ध्यान साधनेद्वारे मनःशांती कशी मिळवावी, आपल्या विचारांची दिशा कशी ठरवावी आणि परीक्षा काळातील मानसिक तणाव कसा कमी करावा, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध ध्यानतंत्र शिकवत, आपल्या मनाचा अभ्यास कसा करावा आणि मानसिक संतुलन कसे राखावे याची माहिती दिली.
कार्यशाळेच्या दुसऱ्या व्याख्यात्या माननीय दीपाली लोहार (रावेर) यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ध्यानसाधना करून घेतली. “ध्यान हे केवळ एक ध्यानतंत्र नसून, तो आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग असायला हवा. रोज काही मिनिटे ध्यान केल्याने मानसिक स्थिरता वाढते, आत्मविश्वास निर्माण होतो आणि विचार करण्याची क्षमता अधिक स्पष्ट होते,” असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी विद्यार्थ्यांना सोपे आणि प्रभावी ध्यानतंत्र शिकवले, ज्यामुळे त्यांना परीक्षेतील भीती, तणाव, आणि नकारात्मक विचारांपासून मुक्त होता येईल. अनेक विद्यार्थ्यांनी या सत्रादरम्यान आपल्या अनुभवांची शेअरिंग केली आणि ध्यानसाधनेमुळे त्यांच्या मन:स्थितीत झालेल्या बदलांची माहिती दिली.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. डी. बी. पाटील यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे परिचय करून दिले आणि कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. कार्यशाळेच्या आयोजनासाठी डॉ. डी. बी. पाटील, डॉ. व्ही. एन. रामटेके, डॉ. जे. पी. नेहेते, डॉ. नरेंद्र मुळे, प्रा. एस. पी. उमरिवाड, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, प्रा. अक्षय महाजन, श्री. श्रेयश पाटील, श्री. अनिकेत पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेत ६१ विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “या कार्यशाळेमुळे आमच्या मनातील परीक्षेची भीती कमी झाली आहे. ध्यानसाधनेचा सराव केल्यास निश्चितच आमचे मन स्थिर राहील आणि आत्मविश्वास वाढेल,” असे एका विद्यार्थिनीने सांगितले.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी डॉ. नरेंद्र मुळे यांनी उपस्थित मान्यवरांचे, वक्त्यांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले. शेवटी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या परवानगीने कार्यशाळेची सांगता करण्यात आली.
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली. मानसिक तणाव, परीक्षेतील भीती आणि ध्यानसाधनेचे महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थ्यांना याचा निश्चितच फायदा होईल. भविष्यातही अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here