पाचोरा – गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल येथे ८ मार्च २०२५, शनिवारी, आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून ‘आई आणि मी’ (Mom and Me) हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मातृत्वाचा सन्मान, महिलांचे सशक्तीकरण आणि मातांचा त्यांच्या मुलांसोबतचा नातेबंध अधिक दृढ करण्याचा संकल्प केला गेला.
या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या पर्यवेक्षिका व संस्था संचालक सौ. नेहा प्रेमकुमार शामनानी यांनी भूषविले. विशेष अतिथी म्हणून प्राचार्य श्री. प्रेम शामनानी सर, शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शाळेतील महिला शिक्षकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
या कार्यक्रमात शाळेतील महिला पालकांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. महिलांसाठी
विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख आकर्षण ठरले रॅम्प वॉक, स्वपरिचय आणि नृत्य स्पर्धा, ज्यामध्ये महिला पालकांनी आपली कला, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे सादर केले.
विशेष म्हणजे, महिलांच्या सशक्तीकरणासाठी या कार्यक्रमात स्वरक्षण प्रशिक्षण आणि सेल्फ-डिफेन्स (Self-Defense) चे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यासाठी शाळेच्या स्पोर्ट्स शिक्षिका साक्षी पवार मॅडम यांनी विद्यार्थिनींना प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकविलेले कराटे आणि सेल्फ-डिफेन्सचे प्रात्यक्षिक सादर केले. या प्रात्यक्षिकांमधून मुलींना संकट प्रसंगी स्वतःचे संरक्षण कसे करावे याचा थेट अनुभव मिळाला.
महिला पालकांनी या कार्यक्रमात विविध प्रकारच्या नाटिका आणि नृत्यप्रयोग सादर करून समाजातील महिलांच्या संघर्षाची, त्यांची कर्तृत्वगाथा आणि विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी मिळवलेल्या यशाची झलक सादर केली. ‘आजची नारी – सशक्त आणि आत्मनिर्भर’ या विषयावर आधारित नाटिका विशेष आकर्षण ठरली. या नाटकाच्या माध्यमातून महिलांनी स्त्री शिक्षण, महिला सुरक्षाविषयक प्रश्न, स्वावलंबन आणि समाजातील महिलांचा वाढता सहभाग यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
शाळेतील विद्यार्थिनींनीही सांस्कृतिक नृत्ये आणि देशभक्तिपर गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलींना आपली कला आणि विचार मांडण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाच्या शेवटी पालकांनी आपले मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाचे आणि शाळेच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले. महिलांसाठी असा कार्यक्रम आयोजित करून त्यांना आपली कला, आत्मविश्वास आणि कौशल्य दाखवण्याची संधी दिल्याबद्दल शाळेच्या व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार मानले.
एका पालकांनी सांगितले, “आजच्या महिलांना फक्त घरापुरते मर्यादित राहता कामा नये. प्रत्येक स्त्रीमध्ये सुप्त गुण असतात. अशा कार्यक्रमांमुळे त्यांना ते गुण सादर करण्याची संधी मिळते.”
तर दुसऱ्या पालकांनी आपल्या अनुभवाबाबत सांगितले, “ही स्पर्धा म्हणजे आमच्यासाठी एक आनंदोत्सव ठरला. आम्हाला रॅम्प वॉक, नृत्य आणि विविध खेळांमध्ये भाग घेऊन खूप मजा आली. आम्ही अशा कार्यक्रमांची पुनरावृत्ती व्हावी अशी मागणी करतो.”
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गटांमध्ये बक्षिसे वाटप करण्यात आली. मा. प्राचार्य श्री. प्रेम शामनानी सर आणि उपस्थित शिक्षिकांच्या हस्ते महिलांना बक्षिसे प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
महिला पालकांसाठी मनोरंजनात्मक खेळ आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले. त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सौ. अमिना बोहरा यांनी अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडले. त्यांच्या प्रभावी संवादशैलीमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.
हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून, यापुढेही दरवर्षी अशा प्रकारचे महिला सशक्तीकरण आणि कुटुंबातील नाते अधिक दृढ करणारे उपक्रम राबवले जातील, असे शाळेच्या व्यवस्थापनाने जाहीर केले. हा कार्यक्रम फक्त महिला दिनापुरता मर्यादित न ठेवता, वर्षभरात विविध वेगवेगळ्या स्वरूपात महिला सशक्तीकरणासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील राहील, असेही सांगण्यात आले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा सन्मान, मातृत्वाचा गौरव, महिला आत्मनिर्भरतेला चालना आणि समाजाच्या सर्व स्तरावर महिलांचा प्रभावी सहभाग वाढवण्याचा संकल्प करण्यात आला. ‘आई आणि मी’ (Mom and Me) हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम नसून, तो महिलांच्या हक्कांसाठी उभारलेली एक चळवळ आहे. महिलांच्या समान हक्कांसाठी, त्यांना सर्व क्षेत्रांत पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे आहे.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेने पार पाडल्याबद्दल शाळेच्या व्यवस्थापन, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.