शासन नियमांची पायमल्ली; पाचोरा डाक कार्यालयातील प्रशासकीय अनियमितता उघड

0

पाचोरा – शहरातील डाक विभाग कार्यालयात कर्मचारी व्यवस्थापन, कार्यालयीन प्रशासन, पोशाख संहितेचे पालन, कार्यालयीन वेळेचा अंमल तसेच तांत्रिक कारणावरून खिडकी सेवा बंद करण्याच्या प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या संदर्भात माहिती अधिकार कायद्यांतर्गत सविस्तर माहिती मागविण्यात आली असून, यामुळे डाक विभागातील अंतर्गत कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पाचोरा डाक कार्यालयात कोणते अधिकारी आणि कर्मचारी

कार्यरत आहेत? त्यांच्यावर कोणकोणती कामकाज जबाबदारी सोपविण्यात आली आहे? यासंदर्भात कोणतीही स्पष्ट माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध नाही.हा प्रकार सुसंगत प्रशासनाच्या धोरणांना विरोधी आहे.
माहिती अधिकार कायद्यानुसार, प्रत्येक शासकीय कार्यालयाने कर्मचारी यादी, पदनाम व कार्य जबाबदाऱ्या स्पष्टपणे दर्शवाव्यात. मात्र पाचोरा डाक कार्यालयात याबाबत पारदर्शकता नाही. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ही माहिती प्रवेशद्वारी, सूचना फलकावर उपलब्ध असणे गरजेचे होते.
भारतीय डाक विभागाने कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ठराविक पोशाख संहिता (Dress Code) लागू केली आहे. हा पोशाख कर्मचारी वर्गाची ओळख, शिस्तबद्धता आणि लोकाभिमुख कार्यपद्धती दर्शविणारा असतो. मात्र पाचोरा डाक कार्यालयातील अनेक कर्मचारी पोशाख संहितेचे पालन करताना दिसत नाहीत. विभागाकडून यावर कुठलीही शिस्तपालन भंग कारवाई होत असल्याचे दिसत नाही. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
सार्वजनिक सेवांसाठी काम करणाऱ्या शासकीय कार्यालयांची वेळ ही निश्चित आणि शिस्तबद्ध असणे अत्यावश्यक आहे. डाक विभागाच्या कार्यालयासाठी ठरविलेली कार्यालयीन वेळ आणि जेवणाची सुटी यासंबंधी निश्चित आदेश असावा लागतो. मात्र पाचोरा कार्यालयात अनेक वेळा कार्यालयीन वेळ न पाळल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कर्मचारी मनमानी पद्धतीने जेवणाची वेळ असल्याचे सांगत  नागरिकांना वेठीस धरले जाते यामुळे नागरिकांची वेळ वाचण्याऐवजी अधिक खर्ची जात आहे. ह्या संदर्भात नियमांचे उल्लंघन केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करणे गरजेचे ठरत आहे.
माहिती अधिकार कायदा, 2005 अंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारी ‘प्रथमदर्शनी माहिती अधिकारी’ आणि ‘आपले अधिकारी’ यांची माहिती देणारा फलक लावणे बंधनकारक आहे. ह्या फलकाच्या माध्यमातून नागरिक थेट जबाबदार अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. मात्र पाचोरा डाक कार्यालयात हा फलक लावण्यात आलेला नाही, की कोणतीही अशी माहिती उघडपणे नागरिकांसमोर दिली जात नाही. हा प्रकार कायद्याचे उल्लंघन असल्याने गंभीर स्वरूपाचा आहे.
पाचोरा डाक कार्यालयात अनेक वेळेस ‘तांत्रिक अडचणमुळे सेवा बंद’ असे फलक सहज लावले जातात. किंबहुना ते तसे तयारच करून ठेवण्यात आलेले आहेत या फलकांमागे कोणतीही अधिकृत आदेश प्रक्रिया, परवानगी किंवा कार्यालयीन नोंद आढळून आलेली नाही. नागरिकांची सेवा घेण्याची जबाबदारी झटकण्यासाठी हा फलक केवळ साधन ठरत आहे. हे अत्यंत गैरप्रकाराचे उदाहरण असून, यामागील जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे.
वरिल सर्व बाबींमुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजी आणि संताप निर्माण झाला आहे. पोस्ट कार्यालय हे शासकीय सेवेचे महत्वाचे माध्यम असून, त्याच्यावरचा विश्वास टिकवणे डाक विभागाची जबाबदारी आहे.
या सर्व प्रकारांवर चौकशी व्हावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत स्वतंत्रपणे या बाबींवर माहिती मागविण्यात आली आहे:
या सर्व तक्रारींच्या संदर्भात संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील माहिती पाठविण्यात आली आहे.
या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवावा व सुधारात्मक पावले उचलावी, अशी मागणी केली आहे.
कायद्याचे पालन आणि पारदर्शक प्रशासन हाच पर्याय ही बाब केवळ पाचोरा तालुक्यापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण डाक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण करणारी आहे. त्यामुळे अशा प्रकारचे गैरप्रकार रोखण्यासाठी विभागीय सुधारणांची गरज आहे.
तक्रारी नोंदवून, माहिती अधिकाराचा वापर करून, नागरिकांनी लोकशाही प्रक्रिया जपली आहे —स्पर्धेच्या युगात आता डाक विभागाचीच  जबाबदारी आहे की ते कसे विश्वासाला पात्र ठरतील.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here