निकोलस पूरनचा तडाखेबाज खेळ, लखनऊ सुपर जायंट्सचा सनरायझर्स हैदराबादवर ५ विकेट्सने दणदणीत विजय

0

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२५ च्या सातव्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने (एलएसजी) सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) वर ५ विकेट्सने शानदार विजय मिळवला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात एसआरएचने प्रथम फलंदाजी करत १९०/९ धावा केल्या होत्या. मात्र, निकोलस पूरनच्या तडाखेबाज ७० धावांच्या खेळीमुळे एलएसजीने १६.१ षटकांतच विजय मिळवला.
एसआरएचच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, परंतु नियमित अंतराने विकेट्स पडत राहिल्या. ट्रॅव्हिस हेडने ४७ (२८) धावा करत चांगली सुरुवात केली. अनिकेत वर्माने फक्त १३ चेंडूत ३६ धावा चोपल्या आणि एसआरएचच्या धावसंख्येत महत्त्वाचा वाटा उचलला. कर्णधार पॅट कमिन्सनेही १८ (४) धावा करत जलद खेळी केली.
लखनऊच्या शार्दुल ठाकूरने ४ षटकांत ३४ धावा देत ४ बळी घेतले आणि एसआरएचला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.
लखनऊच्या संघाने आक्रमक सुरुवात केली. मिचेल मार्शने ५२ (३१) धावा करून टीमला मजबूत पाया दिला. मात्र, निकोलस पूरनने २६ चेंडूत ७० धावा (६ चौकार, ६ षटकार) फटकावत एसआरएचच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. अब्दुल समदने ८ चेंडूत २२ धावा करत सामना सहज जिंकवला.
एसआरएचकडून पॅट कमिन्सने २ विकेट्स घेतल्या, परंतु त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
शार्दुल ठाकूरला त्याच्या अप्रतिम गोलंदाजीसाठी  सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. तर निकोलस पूरनने त्याच्या तुफानी खेळीसह चाहत्यांची मने जिंकली.

*उद्याचा सामना:-*

२८ मार्च रोजी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रात्री ७:३० वाजता खेळवला जाणार आहे.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here