पाचोरा (प्रतिनिधी – धनराज पाटील,बॅनर Mo. 9922614917) – भारताच्या सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, अंधश्रद्धा, जातिभेद, अज्ञान आणि अन्यायाविरोधात अविरत संघर्ष करणारे महामानव, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांची 11 एप्रिल 2025 रोजी जयंती पाचोरा शहरात मोठ्या उत्साहात, शिस्तबद्धतेने आणि सामूहिक एकतेने साजरी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जयंतीचे आयोजन अत्यंत भव्य स्वरूपात करण्यात येत असून, शहरातील सर्वच सामाजिक संघटना, सांस्कृतिक मंडळे, युवक संघटना, विविध राजकीय पक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार व समाजप्रेमी नागरिकांचा यात उत्स्फूर्त सहभाग दिसून येणार आहे.
या जयंती सोहळ्याचे आयोजन “सार्वजनिक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समिती, पाचोरा” यांच्या नेतृत्वाखाली केले जात असून, समितीचे अध्यक्ष म्हणून पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील कार्यरत आहेत. उत्सव समितीच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण उत्सवाची रूपरेषा ठरवण्यात आली असून, उत्सवात सर्व घटकांचा सक्रिय सहभाग निश्चित करण्यात आला आहे.
सकाळी 9.30 वाजता पाचोरा शहरातील महात्मा फुले स्मारक येथे प्रतिमापूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये माजी आमदार व पी.टी.सी.चे अध्यक्ष मा.आ.दिलीपभाऊ वाघ, शहरातील प्रतिष्ठित उद्योजिका आणि निर्मल सिड्स पाचोरा या कंपनीच्या संचालिका मा. वैशालीताई सुर्यवंशी, शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा चे संचालक मा. अमोलभाऊ शिंदे, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. संजयभाऊ गोहील, कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगावचे सभापती मा. गणेश भिमराव पाटील, तसेच प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी मा. भूषण अहिरे, तहसिलदार मा. विजय बनसोडे, नगरपरिषद पाचोरा चे मुख्याधिकारी मा. मंगेश देवरे आणि पोलीस विभागात पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. अशोक पवार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महात्मा फुले यांनी आपल्या जीवनकार्याद्वारे समाजात समता, शिक्षणाचा प्रसार, स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार, शेतकरी आणि मजूर वर्गाचे हक्क यासाठी झटून कार्य केले. त्यांची जयंती साजरी करताना त्यांच्या विचारांचा प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या उत्सवाच्या निमित्ताने फक्त एक दिवसाचा सोहळा न होता, त्यांच्या विचारांना समर्पित वैचारिक जागृतीचा कार्यक्रम म्हणून याकडे पाहिले जात आहे.
यंदाच्या उत्सवाचे आकर्षण म्हणजे सायंकाळी 6.00 वाजता निघणारी शोभायात्रा, जी कृष्णापुरी येथून सुरु होऊन महात्मा फुले स्मारक पाचोरा येथे संपन्न होणार आहे. या मिरवणुकीत जय हिंद क्रीडा व लेझीम मंडळ, कृष्णापुरी, पाचोरा यांचे सहभाग लक्षवेधी ठरणार असून, लेझीमच्या तालावर, बॅण्डपथकाच्या गजरात, भव्य झांजपथक व विविध सामाजिक संस्था-कार्यकर्ते यांचा सहभाग लाभणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक मार्गक्रमण करणार असून, नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा फुलांची उधळण करून स्वागत करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
शोभायात्रेनंतर रात्री 8.00 वाजता एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात “गाठोडं” या सांस्कृतिक सादरीकरणाचे सादरीकरण सुप्रसिद्ध शाहीर तुषार सुर्यवंशी, मुंबई आणि त्यांच्या सहकलाकारांकडून करण्यात येणार आहे. शाहीर परंपरेतून महात्मा फुले यांचे कार्य, संघर्ष, आणि विचार यांचा प्रभावी उद्घोष करण्यात येणार असून, हा कार्यक्रम नागरिकांच्या सांस्कृतिक भावनांना उर्जा देणारा ठरेल. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध स्वरूपात होत असून, स्थानिक पोलीस प्रशासन, नगरपरिषद, वीज विभाग, आरोग्य विभाग यांच्यासह सर्व संबंधित विभागांची सहकार्यभावना उत्सवासाठी लाभली आहे. विशेषतः सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन व्यवस्थापन यासाठी विशेष पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत.सार्वजनिक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले जयंती उत्सव समिती, पाचोरा यांच्यासह जय हिंद क्रीडा व लेझीम मंडळ, कृष्णापुरी, पाचोरा (मिरवणूक समिती) यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सर्वांनी या महत्त्वपूर्ण जयंती उत्सवात सहभागी होऊन महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करावा. सामाजिक समरसता, बंधुता, शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या दिशेने त्यांचे योगदान आपल्याला आजही प्रेरणा देत आहे. अशा महामानवाच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून सर्व घटकांनी आपापसातील मतभेद विसरून सामाजिक ऐक्य प्रस्थापित करावे, अशी भावना या आयोजनातून व्यक्त होते. महात्मा फुले यांचे विचार आजही तितकेच प्रभावी आणि कालसुसंगत आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त पाचोऱ्यात जो सामाजिक-सांस्कृतिक एकतेचा संगम होत आहे, तो निश्चितच प्रेरणादायी ठरेल. शिस्तबद्धतेने आणि भव्यतेने साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी आयोजक समितीने कसून तयारी केली आहे. पाचोऱ्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक समृध्दीच्या वाटचालीत अशा उपक्रमांचा मोठा वाटा आहे या भव्य आयोजनामुळे शहरात आनंदाचे, उत्साहाचे आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून पाचोरा शहराने एक आदर्श उभा केला असून, त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण शहर एकत्र येत असल्याचे दृश्य या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.