पाचोरा (प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर Mo. 9922614917) – फोटोबाजी, बॅनरबाजी, अवाजवी प्रसिद्धी आणि चौकाचौकांत लावण्यात येणारे स्वतःचे

फोटो यापासून दूर राहून, केवळ कार्याच्या जोरावर ओळख निर्माण करणारे,पत्रकारांच्या खऱ्या न्यायहक्कासाठी लढणारे आणि तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत प्रामाणिक योगदान देणारे सचिन सोमवंशी यांची मुंबई मराठी पत्रकार संघाच्या संलग्न अधिकृत जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या पाचोरा तालुका अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे पाचोरा तालुक्यातील पत्रकार वर्तुळात समाधान व्यक्त होत असून, त्यांच्या या निःस्वार्थी, सजग आणि स्पष्टवक्तेपणाच्या नेतृत्वामुळे संघटना अधिक बळकट होणार आहे, असा विश्वास विविध स्तरांतून व्यक्त केला जात आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ ही महाराष्ट्रातील एक अत्यंत जुनी आणि पत्रकारांच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने लढणारी प्रमुख संघटना आहे. या संघटनेच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या जळगाव जिल्हा पत्रकार संघाने जिल्ह्यातील विविध तालुक्यांत आपला विस्तार केला असून, प्रत्येक तालुक्यात योग्य नेतृत्व उभे करून पत्रकारांसाठी कार्य करण्याचा ध्यास या संघटनेने घेतला आहे. त्याच ध्येयधोरणाच्या अनुषंगाने पाचोरा तालुक्याच्या अध्यक्षपदी सचिन सोमवंशी यांची निवड ही अत्यंत योग्य आणि आवश्यक पाऊल ठरली आहे.सचिन सोमवंशी हे गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी सदैव सत्य, निडरता, आणि सामाजिक बांधिलकी यांचा विचार करत पत्रकारिता केली आहे. त्यांनी कधीही पत्रकारितेचा उपयोग स्वतःचा आर्थिक वा सामाजिक फायद्यासाठी केला नाही. अनेकदा पत्रकारांच्या संघटनांमध्ये पद मिळाल्यानंतर काही मंडळींकडून विशेषतः अवैध धंदेवाल्यांकडून आपले फोटो बॅनरवर छापणे, चौकाचौकांत लावणे, आणि स्वतःचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी इतरांच्या नावाने पुरस्कार वाटप वा जाहिरात गोळा करणे असे प्रकार पाहायला मिळतात. मात्र सोमवंशी यांचा मार्ग यापेक्षा पूर्णपणे वेगळा राहिला.ते नेहमीच म्हणतात की, “कार्य हेच आपली ओळख असावी, चेहऱ्यावरचे फोटो नव्हे.” त्यामुळेच त्यांनी कधीही पत्रकार असो वा नसो, कोणाच्याही संमतीशिवाय त्यांचे फोटो वापरून स्वतःचा बॅनर शो केला नाही, अवैध धंदेवाल्यांकडून पैसे घेऊन चौकात प्रसिद्धीसाठी पोस्टर्स लावले नाहीत. त्यांच्या या नम्रतेने आणि नितीमत्तेवर आधारलेल्या वर्तनामुळेच त्यांच्या नेतृत्वाची विश्वासार्हता अधिक ठळकपणे समोर आली आहे.यापूर्वी त्यांनी जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली असून, त्या कार्यकाळातही त्यांनी कोणत्याही प्रकारची आर्थिक किंवा वैयक्तिक लाभासाठी संघटनेचा वापर केला नाही. पत्रकार संघटनेच्या नावाखाली त्यांनी ना कधी पैसा गोळा केला, ना कधी पुरस्कारांची विक्री केली, ना कधी हप्ते मागितले. त्यामुळेच त्यांचं नाव घेतलं की, निष्ठा, सचोटी आणि लढाऊ वृत्ती ही प्रतिमा लोकांच्या मनात तयार होते.त्यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा तालुका पत्रकार संघ अधिक सशक्त होणार यात कोणतीही शंका नाही. त्यांनी स्पष्ट केले आहे की, “पाचोरा तालुक्यातील जे पत्रकार आमच्या संघटनेचे सदस्य असतील, त्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या न्यायहक्कासाठी मी कोणतीही तडजोड करणार नाही. संघटनेचा एक एक सदस्य माझ्यासाठी कुटुंबासारखा आहे.” त्यांच्या या विचारांमुळे अनेक नवोदित पत्रकारांना प्रेरणा मिळते आहे. पत्रकारिता केवळ बातम्या देण्याचा व्यवसाय नसून, ती समाजाप्रती जबाबदारी आणि जनहितासाठीची लढाई आहे, हे त्यांनी त्यांच्या प्रत्येक कृतीतून दाखवून दिले आहे.सचिन सोमवंशी यांच्या निवडीनंतर पाचोरा, भडगाव, जामनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा आदी तालुक्यांतून अनेक पत्रकारांनी, सामाजिक संस्थांनी, राजकीय नेत्यांनी, आणि लोकप्रतिनिधींनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांच्या कार्यकाळात पाचोरा तालुक्यातील पत्रकारांसाठी विविध उपक्रम, प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शन सत्रे, आणि पत्रकार सुरक्षेसंदर्भातील जनजागृती उपक्रम राबवले जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.पत्रकारांच्या हितासाठी आवाज उठवणाऱ्या या संघटनेत नेतृत्व करणे म्हणजे केवळ मानाचा पद नसून, ती एक जबाबदारी आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे पार पाडण्याची क्षमता सचिन सोमवंशी यांनी त्यांच्या आजवरच्या कार्यातून सिध्द केली आहे. समाजात अनेकदा अशीही उदाहरणं दिसतात जिथे बॅनरवर मोठे फोटो झळकतात, परंतु त्यामागे कामच नसतं. अशा बॅनरपुरतं मर्यादित नेतृत्व समाजाला काही देऊ शकत नाही. याच्या पूर्णपणे विरोधी उदाहरण म्हणजे सोमवंशी – जे केवळ त्यांच्या कामातून आणि कृतीतून समाजाशी संवाद साधतात.त्यांच्या निवडीनंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, “ही निवड म्हणजे माझ्या कामाची पावती आहे. ही संधी मी तालुक्यातील पत्रकारांसाठी अधिक मजबूत आधारस्तंभ ठरण्यासाठी वापरणार आहे. मी माझ्या कार्यकाळात कोणताही गवगवा न करता, कोणत्याही कार्यक्रमाच्या नावाखाली पैसा मागे न लावता, प्रामाणिकपणे संघटनेसाठी झटणार आहे. माझं ध्येय हे केवळ माझी ओळख बनवणं नसून, इथल्या प्रत्येक पत्रकाराची ओळख उजळवणं आहे.”एकूणच, पाचोरा तालुक्यातील पत्रकार संघटनेला एक सशक्त, अनुभवी, आणि प्रामाणिक नेतृत्व लाभल्यामुळे संघटनेच्या कार्याची दिशा आणि गती निश्चितच वाढेल, असा विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात आहे. बॅनरशाहीच्या पलीकडे जाऊन केवळ कर्तृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या सोमवंशी यांचे नेतृत्व ही इतर अनेक पत्रकारांसाठी आणि पदाधिकार्यांसाठी देखील एक प्रेरणादायी शिकवण ठरेल.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.