केएल राहुलने आरसीबीच्या जबड्यातून सामना हिसकावून घेतला; दिल्लीचा विजयी चौकार

0

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२५ च्या २४ व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ विकेट्सने पराभव करून या हंगामात सलग चौथा विजय नोंदवला. दरम्यान, बेंगळुरूला दुसरा पराभव पत्करावा लागला. दिल्ली कॅपिटल्सने पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-२ मध्ये स्थान मिळवले आहे. त्याच वेळी, आरसीबी पाच सामन्यांत तीन विजय आणि दोन पराभवांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने सुरुवात झटपट केली आणि पहिल्या चार षटकांत फक्त एका विकेटच्या मोबदल्यात ६० पेक्षा जास्त धावा केल्या. फिल सॉल्टने १७ चेंडूत ३७ धावांची जलद खेळी केली आणि धावबाद झाला. यानंतर संघाने ३० धावांच्या आत तीन विकेट गमावल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली.
विराट कोहलीने १४ चेंडूत २२ धावा केल्या. पडिक्कलने १ धावेचे योगदान दिले. कर्णधार रजत पाटीदारने २५ धावांची संथ खेळी केली. लिव्हिंगस्टोन ४, जितेश ३ आणि कृणाल पंड्या १८ धावा करून झटपट बाद झाले. शेवटी, टिम डेव्हिडने २० चेंडूत ३७ धावांची नाबाद खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. कुलदीप आणि विप्राज यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने ३० धावांवर तीन विकेट गमावल्या. त्यानंतर, ६० धावांपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्यांनी चार विकेट गमावल्या. फाफ २, जॅक फ्रेझर मॅकगर्क ७ आणि अभिषेक पोरेल ७ धावा करून तंबूमध्ये परतले. कर्णधार अक्षर पटेलने १५ धावा केल्या पण केएल राहुलने एक बाजू राखून ठेवली.
रिमझिम पावसात, राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी पाचव्या विकेटसाठी ५५ चेंडूत १११ धावांची नाबाद भागीदारी केली. केएल राहुलने ५३ चेंडूत ९३ धावांची नाबाद खेळी केली आणि स्टब्सने २३ चेंडूत ३८ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. भुवनेश्वर कुमारने दोन विकेट घेतल्या. जोश आणि सुयश यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here