पाचोरा – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे सामाजिक न्याय, समता, लोकशाही आणि संविधान मूल्यांचा साजरा करण्याचा दिवस असतो. प्रत्येक शिक्षणसंस्थेने या दिवशी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे विचार आणि कार्याची ओळख करून देणे ही केवळ परंपरा नव्हे, तर मूलभूत सामाजिक जबाबदारी आहे. परंतु पाचोरा शहरातील एका नामांकित CBSE पॅटर्नच्या शाळेने यंदा १४ एप्रिल २०२५ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे समोर आले असून, यामुळे एका सजग आणि संतप्त पालकाने झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज कार्यालयात थेट तक्रार पाठवत संबंधित शाळांवर रोष व्यक्त केला आहे.विषय जास्त वादग्रस्त होऊ नये म्हणून मुद्दाम शाळेचे नाव या बातमीत नमूद केले नाही परंतु या पालकाने पाठवलेल्या तक्रारीमध्ये स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “शाळांमध्ये वर्षभर अनेक महापुरुषांचे जन्मदिवस, पुण्यतिथ्या, वेशभूषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, सायंटिफिक वाचन, प्रार्थना गीत अशा विविध उपक्रमांद्वारे साजरे केले जातात.किंबहुना त्याची पूर्व सूचना अधिकृत Pdf व्दारे पालकांच्या ग्रुप वर दिली जाते मात्र 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संदर्भात एक एक ओळची देखील सूचना नाही यावेळी नेहमी प्रमाणे दोन दिवस आधी विद्यार्थ्यांना सूचना न देता बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत मात्र जाणूनबुजून मौन बाळगले जाते, ही बाब केवळ लज्जास्पदच नव्हे तर अन्यायकारक आहे.”
सदर पालकाने आपल्या निवेदनात आक्रोशपूर्ण शब्दांत असा सवाल केला आहे की, “शाळा फक्त निवडक महापुरुषांसाठीच आहे का? बाबासाहेब आंबेडकर यांना दुर्लक्षित करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?”
या प्रखर निषेधाच्या निवेदनात पुढे लिहिले आहे की, “ हे तेच बाबासाहेब आंबेडकर आहेत, ज्यांना लहानपणी अस्पृश्यतेचा अनुभव येत होता. त्यांना पाण्याचा हक्क नाकारला जात होता. शाळेत कोपऱ्यात उभं राहून शिक्षण घेणारे बाबासाहेब पुढे जगातल्या सर्वोच्च विद्यापीठांमधून शिक्षण घेऊन भारताचा संविधानकार & भारत रत्न झाले. पण आजच्या काळात पाचोरा शहरातील एका इंग्रजी माध्यम शाळांमध्ये बाबासाहेबांच्या जयंतीचा उच्चारही होत नसल्याचं पाहून हे शिक्षण आणि मूल्यशिक्षण दोन्ही अधोगतीला गेलेले दिसते.”
मेसेज व्दारे पाठवलेल्या तक्रारीत पालकाने सांगितले की, बाबासाहेब आंबेडकर हे इतिहासाचे नव्हे, तर वर्तमान आणि भविष्याचे अधिष्ठान आहेत. त्यांचे विचार विद्यार्थी व समाजापर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक शाळेचे कर्तव्य आहे. जर ही जबाबदारी शाळा पार पाडत नसतील, तर पालकांनी आवाज उठवावा, हेही त्यांनी ठामपणे नमूद केले आहे.
सदर निवेदनात पुढे असेही स्पष्ट इशारा दिला आहे की, “जर यापुढेही बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाणार नसेल, तर पालक & आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. समाजमाध्यमांपासून ते शैक्षणिक मंडळांपर्यंत, आणि आवश्यक असल्यास कायदेशीर पातळीवरसुद्धा याविरोधात आवाज उठवण्यात येईल.”
या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरातील शासकीय अधिकाऱ्यांनी, तसेच संबंधित शैक्षणिक संस्थेने जी ‘सीबीएसई’च्या नावाने प्रतिष्ठेचा टेंभा मिरवते त्यांनी वेळीच आत्मपरीक्षण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. संविधानाची आणि राष्ट्रपुरुषांच्या स्मृतींची जाणीवपूर्वक उपेक्षा करणे हे शिक्षणाच्या मूलभूत तत्त्वांशी प्रतारणा आहे, असा ठाम सूर पालकांच्या रोषातून उमटत आहे.
या प्रकरणाकडे शाळा प्रशासन, शिक्षण विभाग यांच्याकडून गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित असून, भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी अधिक स्पष्ट, सर्वसमावेशक आणि समतावादी उपक्रम राबवावेत, अशी संतप्त मागणी सर्वसामान्य पालकांकडून पुढे येत आहे.






ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.