समतेच्या लढ्याला नवे बळ – पाचोऱ्यात समता सैनिक दलाच्या तालुका कार्यालयाचे १८ एप्रिल रोजी भव्य उद्घाटन

0

पाचोरा –( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर Mo. 9922614917)
-शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची प्रखरतेने जपणूक करणाऱ्या आणि सामाजिक समतेसाठी सतत झगडणाऱ्या समता सैनिक दलाच्या पाचोरा तालुका आणि जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांसाठी एक ऐतिहासिक आणि आनंददायी क्षण समोर आला आहे. बराच काळ प्रतिक्षेत असलेले समता सैनिक दलाचे अधिकृत तालुका कार्यालय आता अखेर प्रत्यक्षात साकारले जात असून, १८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता या कार्यालयाचे भव्य उद्घाटन समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. नानासो धर्मभूषण बागुल साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे.
ही केवळ कार्यालय उघडण्याची बाब नाही, तर समतेच्या लढ्याला नवे अधिष्ठान, नवसंजीवनी देणारी घटना आहे. कारण तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व पुरोगामी, समतेचे कार्यकर्ते, चळवळीत झिजलेले कार्यदूत, पत्रकार बांधव आणि समता सैनिक दलाच्या विचारांनी प्रेरित असंख्य लोकांनी हे कार्यालय असावे ही अनेक वर्षांची मागणी होती. आता ती मागणी पूर्ण होऊन एक नवा अध्याय सुरू होत आहे.
या संदर्भात समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे (मो. 9503152470) यांनी सर्वांना आवाहन करत स्पष्ट केले आहे की, “ज्याप्रमाणे क्रांतीकारक विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी केंद्रबिंदू आवश्यक असतो, त्याचप्रमाणे हे कार्यालय ही फक्त इमारत नसून, सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचे एक मजबूत बस्तान असेल.”
या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्याचे आयोजन सांडू भावराव कॅप्लेक्स, साईराज डिजिटलजवळ, भुयारी मार्ग, गिरड रोड, पाचोरा येथे करण्यात आले असून, सकाळी १० वाजता सर्व मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहावे असे नम्र आवाहन आयोजकांनी केले आहे. विशेष म्हणजे, नियोजन वेळेवर आणि काटेकोर असावे या उद्देशाने व्यक्तिशः फोन किंवा भेटी करणे शक्य न झाल्याने, झुंजवृत्तपत्र व ध्येय न्यूजच्या बातमी द्वारे हेच आमंत्रण समजावं असे आवाहन खुद्द किशोर डोंगरे यांनी केले आहे.
समता सैनिक दल – एक ऐतिहासिक चळवळ
समता सैनिक दल हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले संघटन असून त्याचा उद्देश म्हणजे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समतेसाठी तळागाळातील जनतेला संघटित करणे, त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देणे आणि संविधानिक मूल्यांप्रती जनजागृती निर्माण करणे हा आहे. आजही देशात आणि राज्यात विविध क्षेत्रांमध्ये असमानता, जातीभेद, अन्याय अशा गोष्टी दिसून येतात. अशा वेळी समता सैनिक दलासारख्या संघटनांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.
पाचोरा तालुक्यात गेल्या काही वर्षांत दलाच्या माध्यमातून विविध जनजागृती कार्यक्रम, संविधान जागर मोहिमा, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम, तरुण कार्यशाळा अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आता त्याला एक स्थायी स्वरूपाचे कार्यालय लाभत असल्याने ही चळवळ आणखी व्यापक होणार आहे.
कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी क्षण
या उद्घाटन कार्यक्रमात फुले-शाहू-आंबेडकर चळवळीशी संबंधित असंख्य कार्यकर्ते, शिक्षक, प्रबोधनकार, लेखक, पत्रकार, विद्यार्थी, महिलाप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ही केवळ भिंतींच्या चार भिंतींचे उद्घाटन नसून एका नव्या संघर्षाची, नव्या विचार प्रवाहाची सुरुवात आहे. दलाचे विचार हे केवळ भाषणांपुरते किंवा पोस्टरपुरते न राहता, ते गावागावात, पाड्यापाड्यांत पोहोचावेत, यासाठी या कार्यालयाचा उपयोग प्रशिक्षण केंद्र, संवाद मंच, माहिती केंद्र, तरुणांसाठी मार्गदर्शन केंद्र, लायब्ररी अशा स्वरूपात केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
या उद्घाटन सोहळ्यासाठी सांडू भावराव कॅप्लेक्स परिसरात मोठी तयारी सुरू झाली आहे. बॅनर, पोस्टर, फलक, बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहतूक नियोजन, स्वागत समिती, आभार प्रदर्शन, स्मृतिचिन्ह वाटप असे सर्व कार्यक्रम ठरवून नियोजनबद्ध पद्धतीने आखण्यात आले आहे. स्थानिक तरुण कार्यकर्त्यांनी हे संपूर्ण आयोजन आपल्या खांद्यावर घेतले असून, यातूनही संघटनेचे मजबूतपण आणि उत्साह दिसून येतो.
सर्व घटकांमधून सकारात्मक प्रतिसाद
पाचोरा शहर व तालुक्यातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत केले असून अनेक ठिकाणी समता सैनिक दलाच्या या उपक्रमासाठी शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील युवक, शेतकरी संघटना, बहुजन संघटना, युवक मंडळे आणि विविध शाळा-शिक्षकांनी या उपक्रमाबाबत उत्साह व्यक्त केला आहे.
प्रेरक अध्यक्ष बागुल साहेब यांचे नेतृत्व
समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. नानासो धर्मभूषण बागुल हे गेली अनेक दशके सामाजिक चळवळीतील सक्रिय आणि स्फूर्तीदायक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. दलाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण आणि समतावादी विचारांचा प्रचार यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या हस्ते पाचोऱ्यात कार्यालयाचे उद्घाटन होणे, हा स्थानिक कार्यकर्त्यांसाठी मोठा सन्मान आहे.
एकीकडे राजकारणात गढुळलेपणा, जातीय विषमता, आणि संविधान विरोधी मानसिकता वाढत असताना समता सैनिक दलासारख्या विचारधारेच्या संघटनेचे मजबूत पायाभूत रचनांमध्ये रूपांतर होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे हे कार्यालय हे फक्त एक ठिकाण न राहता सामाजिक परिवर्तनाचा दीपस्तंभ ठरेल यात शंका नाही.
उद्या १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सांडू भावराव कॅप्लेक्स, साईराज डिजिटलजवळ, भुयारी मार्ग, गिरड रोड, पाचोरा येथे होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहून या चळवळीचा भाग व्हा आणि समतेच्या लढ्यात योगदान द्यावे असे आवाहन किशोर डोंगरे, जिल्हाध्यक्ष, समता सैनिक दल, मो. 9503152470 यांनी केले आहे

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here