चोपडा -(प्रतिनीधी मनिष प्र. महाजन, भाई कोतवाल रोड चोपडा
M0. 97661 43638 , 98508 65961) – उत्तम शिक्षण, प्रबळ इच्छाशक्ती आणि न थांबणाऱ्या प्रयत्नांच्या जोरावर आयुष्यात कोणतेही शिखर गाठता येते, याचा एक आदर्श ठरावा असा प्रेरणादायी प्रवास पुणे येथे वास्तव्यास असलेल्या गरताड येथील मुळचे रहिवासी ज्ञानेश्वर अभिमन पाटील (माजी सैन्य अधिकारी) यांचे सुपुत्र आणि चोपडा येथील विठ्ठल अभिमन पाटील (माजी सैन्य अधिकारी) यांचे पुतण्या चि. विशाल पाटील यांचा आहे. अत्यंत साध्या आणि सेवाभावी कुटुंबातून आलेल्या विशाल यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या घराण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील B.E. (Mechanical) ची पदवी प्राप्त केल्यानंतर अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी XL डायनॅमिक्स मध्ये कार्यरत राहून त्यांनी व्यावसायिक अनुभव मिळवला. मात्र बी.ई. ची पदवी एवढ्यावरच समाधान न मानता त्यांनी शिक्षणाची वाटचाल पुढे सुरू ठेवत CAT या अत्यंत कठीण परीक्षेत यश मिळवून थेट बुद्धगया येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) मध्ये MBA करण्याचा मान मिळवला. IIM सारख्या देशातील सर्वोच्च व्यवस्थापन संस्थेत प्रवेश मिळवणे हीच एक मोठी गोष्ट, त्यातही प्रथम श्रेणीसह MBA पूर्ण करून त्यांनी आपले शैक्षणिक व कौशल्याचे वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांच्या परिश्रमांना आणि गुणवत्तेला प्रत्यक्ष मान्यता लाभली ती थेट इन्फोसिस या जगप्रसिद्ध आयटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीमध्ये Business Strategy Manager या उच्चपदावर नियुक्ती होऊन. विशाल पाटील यांची निवड ही केवळ त्यांच्या ज्ञानाच्या बळावरच नव्हे, तर त्यांनी मिळवलेल्या व्यावसायिक अनुभव, IIM मधील अभ्यासक्रमातील गुणवत्ता आणि त्यांचे नेतृत्वगुण या सर्वच बाबी लक्षात घेऊन करण्यात आली आहे. इन्फोसिससारख्या प्रस्थापित कंपनीत Business Strategy विभागामध्ये काम करणे म्हणजे देशाच्या आर्थिक आणि डिजिटल धोरणात हातभार लावण्याचे मोठे जबाबदारीचे काम असते. विशाल यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या धैर्यवान निर्णयांनी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी नवे आदर्श उभे केले आहेत. अमेरिकन कंपनीतील नोकरी सोडून उच्च शिक्षणासाठी वेळ देण्याचा निर्णय अनेकांसाठी कठीण असतो, पण विशाल यांनी आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर हा मार्ग निवडून दाखवला. त्यांच्या यशामागे त्यांची स्वयंशिस्त, पारंपरिक कुटुंबातील मूल्ये, आणि त्यांना मिळालेलं मार्गदर्शन या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर अभिमन पाटील हे भारतीय सैन्यात अधिकारी पदावर कार्यरत होते. शिस्त, देशसेवा आणि प्रामाणिकपणा हेच त्यांच्या जीवनाचे मूलमंत्र होते. हेच संस्कार विशालवर लहानपणापासूनच झाले. तसेच विठ्ठल अभिमन पाटील हेही माजी सैन्य अधिकारी असून त्यांचाही प्रभाव विशालच्या व्यक्तिमत्वावर मोठ्या प्रमाणात आहे. अशा कुटुंबातील नव्या पिढीतील युवकाने शिक्षण, कौशल्य आणि कष्ट यांच्या जोरावर देशपातळीवरील यश संपादन करणे ही खर्या अर्थाने कौतुकाची बाब आहे. विशाल पाटील यांच्या यशामुळे गरताड, चोपडा, पुणे तसेच जळगाव जिल्ह्यातील तमाम तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे. खेड्यातील विद्यार्थ्यांनाही IIM, Infosys यासारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये स्थान मिळवता येते, हे त्यांच्या यशामुळे सिद्ध झाले आहे. त्यांच्या यशाचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा मार्गदर्शक ठरावा असा आहे. विशाल यांनी दाखवून दिलं आहे की, शिक्षणात सातत्य, स्पष्ट ध्येय आणि योग्य दिशा या त्रिसूत्रीवर चालल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यांनी केवळ आपले कौटुंबिक नाव उज्वल केले नाही तर समाजासाठी एक प्रेरणास्रोत म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सध्या पुणे येथील इन्फोसिसच्या प्रमुख कार्यालयात बिझनेस स्ट्रॅटेजी मॅनेजर या पदावर रुजू झालेल्या चि. विशाल पाटील यांचे झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूजच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांचे पुढील कार्यक्षेत्र यशस्वी, समृद्ध व देशहितासाठी उपयोगी होवो हीच शुभेच्छा. यशोगाथेचा सारांश : BE (Mechanical) नंतर अमेरिकन कंपनी XL डायनॅमिक्स मध्ये नोकरी, CAT परीक्षेद्वारे बुद्धगया IIM मध्ये प्रवेश, IIM-MBA प्रथम श्रेणीत उत्तीर्ण, थेट इन्फोसिसमध्ये Business Strategy Manager म्हणून नियुक्ती, शिक्षण, अनुभव आणि व्यवस्थापन कौशल्य यांचा उत्तम संगम. या प्रेरणादायी यशाबद्दल पुणे, गरताड, चोपडा, जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्रातील तमाम युवकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. या ध्येयवेड्या युवकाच्या यशाची गाथा समाजात नवचैतन्य निर्माण करणारी ठरली आहे






ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.