पाचोरा – पाचोऱ्यातील सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार व कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांच्या निवासस्थानी शिक्षक पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी दिनांक २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता विशेष भेट दिली. कलेप्रती असलेले प्रेम आणि कलाकारांविषयीची आपुलकी याचे हे मनस्वी उदाहरण ठरले. नुकतेच पंढरपूर येथे पार पडलेल्या शिक्षक संमेलनात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्यासाठी शैलेश कुलकर्णी यांनी रांगोळीच्या माध्यमातून व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक सादर केले होते. त्या वेळी काही वैयक्तिक कारणांमुळे तांबे सर उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र त्यांनी कुलकर्णी सरांना फोन करून आश्वासन दिले होते की, पाचोऱ्यात आल्यावर नक्की भेट देतील आणि आपल्या शब्दाला जागत त्यांनी आज स्वतः ‘कला छंद ड्रॉइंग व रांगोळी क्लास’ येथे येऊन त्यांच्या कलेला मानाचा मुजरा दिला.
यावेळी दादांनी क्लासेस मधील विद्यार्थ्यांशी अत्यंत मनमोकळ्या वातावरणात संवाद साधत त्यांचे कौतुक केले, कलेविषयी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या प्रयत्नांना नव्या प्रेरणेने चेतवले. त्यांच्या प्रेमळ भेटीमुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. “एका सामान्य घरातील कलाकारास पदवीधर आमदारांनी दिलेली ही भेट म्हणजे माझ्या प्रामाणिक मेहनतीचे, विद्यार्थ्यांसाठी घेत असलेल्या प्रयत्नांचे आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाचे फलित आहे,” असे भावनिक उद्गार शैलेश कुलकर्णी यांनी झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूजशी बोलताना व्यक्त केले.
या घटनेच्या निमित्ताने एक व्यापक प्रश्न उपस्थित झाला – शिक्षकांचे खरे कौतुक कशासाठी व्हायला हवे? फलकावर शिक्षकांनी स्वतःरंगवलेले रंग पाहून की विद्यार्थ्यांच्या प्रतिभेतून स्वतःउमटलेल्या तेजस्वी विचार पाहून? देशाच्या इतिहासात अजरामर ठरलेले महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध प्रसंगी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. या वेळी शाळांचे फलक रंगवले जातात, विद्यार्थी भाषणे करतात, रचना सादर करतात आणि महापुरुषांचे विचार सर्वदूर पोहचवले जातात. मात्र, काही शाळांमध्ये असेही चित्र दिसते की, ज्या चित्रकला शिक्षकांनी स्वतः चित्रे रंगवली आहेत, त्यांच्या कामाचे अधिक कौतुक होते, तर विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला संधीच दिली जात नाही.की त्यांना तसे शाळेमध्ये घडवले जात नाही कारण शाळांमध्ये फलक रंगवण्याची परंपरा ही शिक्षणसंस्थेच्या सौंदर्यबद्धतेचे व महापुरुषांप्रती असलेल्या श्रद्धेचे प्रतीक असली तरी शिक्षणाचा खरा हेतू विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, सर्जनशीलता आणि अभिव्यक्तीची जाणीव जागृत करणे हा असायला हवा. एखाद्या शिक्षकाने स्वतः रंगवलेले चित्र सुंदर असले तरी त्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, त्यांच्याकडून महापुरुषांची चित्रे साकार करून घेतली तर त्याचा खरा शैक्षणिक हेतू साध्य होतो. चित्र रंगवणे हा कौशल्याचा भाग असतो, पण त्या रंगातून विचार साकार करणे हेच शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट असायला हवे.या उलट तसेच इतर विषयांतील शिक्षकही विद्यार्थ्यांच्या घडवणुकीत महत्त्वाची भूमिका बजावतात. इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास अशा विषयांमध्ये उत्तम यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या शिक्षकांच्या शिकवणीचा मोलाचा वाटा असतो. परीक्षेच्या निकालांमध्ये विद्यार्थी जेव्हा यशस्वी ठरतात, तेव्हा त्यांच्या मागील परिश्रमासोबतच शाळेतील शिक्षकांच्या स्पेशली शाळेत केलेल्या अध्यापनाचे (घरी घेतलेल्या क्लासेसचे नाही ) योगदान असते. त्यामुळे शिक्षणाचा उद्देश केवळ कौशल्यप्रदर्शनात नव्हे, तर ज्ञान व विचारांची पेरणी करण्यात असायला हवा.
पण काही ठिकाणी असेही दिसते की, शिक्षक स्वतःच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी विद्यार्थ्यांपेक्षा स्वतःच्या हाताने फलक रंगवतात, स्पर्धांमध्ये फक्त स्वतःच्या क्लासेस मधील विद्यार्थ्यांकडून स्वतः चित्र काढून ते विद्यार्थ्याच्या नावाने सादर करून घेतात. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, अभिव्यक्तीशक्ती आणि सृजनशीलता कोमेजते. विशेष म्हणजे, काही कलाशिक्षक शाळेत अपेक्षित कामगिरी दाखवण्यात अपयशी नसतात पण स्वतःच्या आर्थिक उत्पन्नासाठी खासगी शिकवण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तयार करतात. मात्र यश आल्यावर शाळेच्या नावाखाली श्रेय घेतात, शिक्षकत्वाचे खरे कार्य विद्यार्थ्यांच्या घडवणुकीत दिसायला हवे.
आजच्या घडीला शाळांमध्ये प्रश्न निर्माण होतो की, विद्यार्थ्यांना रंगांचे तंत्र शिकवायचे की विचारांचे रंग चढवायचे? फलक सजावट म्हणून न ठेवता, तो एक प्रेरणादायी संदेशवाहक म्हणून साकारायला हवा. फलकावर उमटणारे रंग हे महापुरुषांच्या तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधित्व करायला हवेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देऊन त्यांच्या हातून असे चित्र तयार करावे, जे समाजात सकारात्मक विचारांचे बीज पेरणारे ठरेल. यासाठी प्रत्येक कला शिक्षकाने स्वतःकडे आत्मपरीक्षणाचा आरसा धरायला हवा. शिक्षण ही एक नोकरी किंवा उत्पन्नाचे साधन नाही, ती विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या पायाभरणीची पवित्र प्रक्रिया आहे. आणि यात प्रत्येक शिक्षकाचा वाटा महत्त्वाचा आहे. कलाशिक्षकांनीही हे जाणले पाहिजे की, त्यांच्या हातून विद्यार्थी घडले तरच त्यांच्या कलेला खरा अर्थ प्राप्त होईल. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रात जेव्हा विचार उमटतो, तेव्हा त्यामागे उभा असलेला शिक्षक हा खरा आदर्श ठरतो.
शाळा व्यवस्थापनाने आणि पालकांनीही हे लक्षात घेतले पाहिजे की, शिक्षण ही नुसती सजावट नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडवण्याची प्रक्रिया आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या हातून घडवलेल्या सर्जनशील कामाला आणि विचारशील अभिव्यक्तीला अधिक मान्यता द्यायला हवी. शिक्षकाने स्वतः रंगवलेले चित्र हे त्याच्या कौशल्याचे प्रतीक असते, पण शाळेतील (घरच्या क्लासेस मधील नाही ) विद्यार्थ्यांनी साकारलेली कलाकृती हे शिक्षकाच्या अध्यापनाचे खरे यश असते. आणि म्हणूनच आपण, समाज म्हणून, विद्यार्थ्यांच्या घडवणुकीवर अधिक भर देणाऱ्या शिक्षकांचे खरे कौतुक केले पाहिजे.आणि अशाच शिक्षकाची देखील शिफारस केली पाहिजे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.