“सन्मानाचा निरोप:मुख्याध्यापक ए. बी. आहिरे सरांचा गौरव सोहळा”

0

पाचोरा — पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या श्री गो. से. हायस्कूलमध्ये कार्यरत पर्यवेक्षक ए. बी. आहिरे सर यांना भडगाव मुख्याध्यापकपदाच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी एक हृदयस्पर्शी आणि सन्मानाने भरलेला निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपभाऊ वाघ आणि चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनाविवश वातावरणात पार पडला.
ए. बी. आहिरे सर यांची नुकतीच भडगाव येथे नवनियुक्त मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, श्री गो. से. हायस्कूलच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास शाळेच्या शालेय समितीचे चेअरमन दादासो खलिल देशमुख, तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेवआण्णा महाजन, मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे, उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख एम. बी. बाविस्कर, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, पर्यवेक्षक सौ. गोहील मॅडम,पर्यवेक्षक रहिम तडवी, संगिता वाघ मॅडम, महेश कौडीण्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. बोरसे यांनी केले, तर आभारप्रदर्शन बी. एस. पाटील यांनी केले.
ए. बी. आहिरे सर हे केवळ इंग्रजी विषयाचे सशक्त अध्यापक नव्हते, तर बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. इंग्रजी विषयावर त्यांचे असामान्य प्रभुत्व विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणादायी ठरले. त्यांच्या अध्यापन शैलीत स्पष्टता, सुसंगती आणि विद्यार्थ्यांना आत्मीयतेने मार्गदर्शन करण्याची खासियत होती. याशिवाय, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा तसेच ते उत्तम गायक म्हणून त्यांनी शाळेच्या विविध कार्यक्रमांना आपली सुरेल उपस्थिती बहाल केली होती. त्यांच्या आवाजातील गोडी आणि सादरीकरणातील आत्मीयता अनेकांच्या हृदयात घर करून राहिली आहे. ते केवळ अध्यापनच नाही, तर प्रशासनिक कामकाजातही ए. बी. आहिरे सरांनी आपल्या अचूक आणि सूक्ष्म दृष्टिकोनाचा प्रत्यय दिला. पर्यवेक्षक पदावर कार्यरत असताना त्यांनी शालेय व्यवस्थापनाची धुरा अत्यंत कुशलतेने सांभाळली. शाळेच्या कामकाजात “सर्व शिक्षक समान” या तत्त्वाचा त्यांनी नेहमीच आग्रह धरला. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक ही पदे शालेय कामकाजासाठी प्रशासनिक गरजेची असली, तरी शिक्षकांमध्ये ज्येष्ठ-कनिष्ठ अशी भेदभावाची भावना होऊ नये, असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यामुळे त्यांनी आपले कार्य अत्यंत समतोल आणि सर्वांचा सन्मान राखून पार पाडले.
तसे बघीतले तर शासकीय धोरणांनुसार, व स्कूल कोड अधिनियमानुसार, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक या पदांशिवाय शालेय कामकाजात इतर शिक्षकांमध्ये वरिष्ठ-कनिष्ठतेचा कोणताही अधिकार नसतो. या तत्त्वाला अनुसरूनच ए. बी. आहिरे सरांनी सर्व शिक्षकांशी सन्मानपूर्वक, मैत्रीपूर्ण आणि सहकार्यात्मक संबंध जोपासले. त्यामुळे शाळेतील शिक्षक वृंदात आपोआप एकतेचे आणि सहकार्याचे वातावरण निर्माण झाले.राजकीय क्षेत्रातही ए. बी. आहिरे सरांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. पाचोरा नगरपालिका लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची निवडणूक त्यांनी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ आणि नानासाहेब संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली होती. त्या निवडणुकीत “लक्ष्मी विरुद्ध सरस्वती” अशी संघर्षपूर्ण लढत रंगली होती.विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या नोकरीच्या ठिकाणच्या रजा टाकून तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी दांडी मारून पाचोऱ्यात येऊन सरांच्या विजयासाठी सक्रिय झाले होते या अत्यंत अटीतटीच्या मुकाबल्यानंतर केवळ काही मोजक्या मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. परंतु निवडणुकीत त्यांनी दाखवलेली कार्यक्षमता, प्रामाणिकता आणि स्वच्छ प्रतिमा आजही सर्वत्र कौतुकाने घेतली जाते. ए. बी. आहिरे सरांनी आपल्या शालेय सेवेला 15 जुलै 1996 रोजी प्रारंभ केला. त्या काळात त्यांनी इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून आपली अध्यापन यात्रा सुरू केली आणि याक्षणापर्यंत म्हणजेच तब्बल 27 वर्षे त्यांनी श्री गो. से. हायस्कूलमध्ये आपली सेवा अखंडपणे दिली. या दीर्घ सेवाकाळात त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन घडवले. त्यांच्याकडून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी होत आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत, हीच त्यांच्या कार्याची खरी फलश्रुती म्हणावी लागेल. या निरोप समारंभात उपस्थित प्रत्येकाने ए. बी. आहिरे सरांबद्दल आपली कृतज्ञता आणि शुभेच्छा व्यक्त करताना त्यांच्या योगदानाचे विविध पैलूंनी कौतुक केले. शालेय समितीचे चेअरमन दादासाहेब खालील देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आहिरे सर हे फक्त शिक्षक नाहीत, तर ते आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याने आणि इंग्रजी विषयातील सखोल ज्ञानाने शाळेच्या दर्जात उल्लेखनीय वाढ झाली.”
उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील यांनीही आपल्या मनोगतात आहिरे सरांच्या समर्पित वृत्तीचे आणि शाळेविषयी असलेल्या जिव्हाळ्याचे विशेष उल्लेख केले. तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेवआण्णा महाजन यांनी सांगितले की, “सांस्कृतिक कार्यक्रम असो, की शैक्षणिक उपक्रम, आहिरे सरांचा सहभाग नेहमीच प्रेरणादायी राहिला आहे. त्यांच्या गाण्याच्या सुरांनी कार्यक्रमांना रंगत आणली.”
पर्यवेक्षक सौ. गोहील मॅडम, रहिम तडवी, संगिता वाघ मॅडम, महेश कौडीण्य आदी शिक्षकांनीही आपल्या भावना व्यक्त करताना आहिरे सरांच्या सहकार्याची, विनम्रतेची आणि सर्वसमावेशक वृत्तीची भरभरून प्रशंसा केली.कार्यक्रमाच्या अखेरीस बी. एस. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. आपल्या आभारप्रदर्शनात त्यांनी म्हटले की, “ए. बी. आहिरे सरांचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.”निरोप समारंभाच्या दरम्यान काही क्षण भावनांनी ओथंबून गेले. शाळेतील जुन्या आठवणी, सहकार्याचे क्षण आणि मिळवलेले यशाचे टप्पे एकामागोमाग एक उजळून निघाले. विद्यार्थ्यांच्या स्मरणात आजही आहिरे सरांचे प्रेमळ मार्गदर्शन कोरले गेले आहे.आता जेव्हा ए. बी. आहिरे सर भडगाव येथे नवनियुक्त मुख्याध्यापक म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत, तेव्हा त्यांच्याकडून भडगाव येथील सु गी पाटील या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही अशीच प्रेरणा मिळेल याबद्दल कुठलाही संदेह नाही. त्यांच्या कार्यक्षमतेचा आणि संवेदनशील नेतृत्वाचा नवा अध्याय आता भडगावमध्ये लिहिला जाणार आहे.
त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी श्री गो. से. हायस्कूलचे सर्व शिक्षक, कर्मचारीवर्ग, विद्यार्थ्यांचा परिवार आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था यांच्यावतीने भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. “आयुष्याच्या प्रत्येक नव्या वळणावर यशाची नवी शिखरे सर करावीत,” अशा सदिच्छा सर्वानी व्यक्त केल्या.
अशा या समृद्ध कार्यकाळानंतर, ए. बी. आहिरे सर हे पाचोरा तालुक्यातील एक आदर्श शिक्षक, आदर्श पर्यवेक्षक आणि आदर्श सहकारी म्हणून सदैव स्मरणात राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here