पाचोरा – महाराष्ट्र पोलीस दलात आपल्या निष्ठा, प्रामाणिकपणा, धाडस, आणि प्रखर तपास कौशल्यामुळे एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या श्री. सचिन कदम या कर्तव्यदक्ष अधिकारी यांना “बेस्ट इन्व्हेस्टीगेशन अवॉर्ड 2024” हा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार मिळणार असल्याचे नुकतेच जाहीर झाले आहे. महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदक हा प्रतिष्ठेचा गौरव दिनांक १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक माननीय रश्मी शुक्ला मॅडम यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
या सन्मानामागे असलेली कहाणी म्हणजे एका पोलीस अधिकाऱ्याच्या कठोर तपासाची, तडफदार निर्णयक्षमतेची आणि न्यायासाठी लढणाऱ्या मनोवृत्तीची प्रेरणादायी वाटचाल.
कोरोनाच्या भीषण काळात पाचोरा येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक म्हणून केवळ एका महिन्याच्या कालावधीत त्यांनी केलेली कामगिरी चकित करणारी होती. या अल्प कार्यकाळातच त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास करत गुन्हेगारांना अटक केली. विशेष म्हणजे ट्रिपल सीट, कागदपत्र नसलेल्या आणि लायसन्सविना चालवणाऱ्या दुचाकीस्वारांवर त्यांनी मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करत शासनाच्या महसूलात लाखोंचा दंडात्मक निधी जमा केला.
या कालावधीत ‘सिंघम’ अशी ओळख पाचोरा शहरवासीयांनी त्यांना दिली होती. केवळ अपघाती कारवाया नव्हे, तर टपऱ्यांवरील गुटख्याचा व्यवहार, विनापरवाना विक्रीसारखे अवैध व्यवसाय, स्थानिक गुन्हेगारीची मुळे यांच्यावर त्यांनी धडाकेबाज कारवाई करत एक आदर्श निर्माण केला होता.
त्यांची पुढील कारकीर्द उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून जळगाव आणि बुलढाणा या जिल्ह्यांत झाली. या दोन्ही ठिकाणी त्यांनी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास करत अनेक प्रकरणे न्यायाच्या मार्गावर आणली. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घडणाऱ्या अत्याचार, खून, आणि बलात्काराच्या घटनांचा अत्यंत बारकाईने आणि कायदेशीर शिस्तीने तपास करून अनेक आरोपींना न्यायालयात दोषी ठरवले.
आज ते नागपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक – लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असून, भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्धचा त्यांचा लढा सुरूच आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक हिट लिस्टवरील गुन्हेगारांचा अचूक तपास करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.
अकोला जिल्ह्यातील गुडधी गावात १२ वर्षीय अनुसूचित जातीच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचा एक गंभीर गुन्हा २०२० मध्ये घडला होता. आरोपी ओम अजाबराव धोटे याने पब्जी गेम खेळण्याच्या बहाण्याने मुलाला फसवून त्याच्यावर पाशवी अत्याचार केला होता. हे संपूर्ण प्रकरण सिव्हील लाईन पोलीस स्टेशन, अकोला येथे दाखल झाले होते.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन कदम यांनी प्रचंड निष्ठेने केला. त्यांनी कलम ३७७ भादंवि, ४ (२) पोक्सो, आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा याअंतर्गत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
या खटल्यामध्ये ५ साक्षीदारांची सखोल साक्ष घेतली गेली आणि सरकार पक्षाने मांडलेले युक्तिवाद यावरून आरोपी दोषी सिद्ध झाला. दि. ३१ मार्च २०२३ रोजी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ शयना पाटील यांनी आरोपीला दुहेरी जन्मठेप, २० वर्षे सक्त मजुरी व २० हजारांचा दंड ठोठावला.
तपासाचे कौशल्य, दस्तऐवज सादरीकरण आणि न्यायालयातील समर्पक साक्ष-पुरावे यामुळे हा गुन्हा सिद्ध झाला. या निकालात सचिन कदम यांच्या प्रामाणिक तपासाची सर्वत्र स्तुती झाली.
सचिन कदम यांची कारकीर्द म्हणजे नव्या पिढीच्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांनी प्रादेशिक, ग्रामीण, शहरी अशा विविध विभागांत तपास केला असून कुठेही गुन्हेगारीला अभय दिलेले नाही. ते नेहमी कायद्याच्या चौकटीत राहून, अत्यंत अचूक व निष्पक्ष निर्णय घेत असतात.
त्यांच्या कार्यशैलीत स्पष्टता, तत्परता, आणि कायद्याबद्दलची आस्था दिसून येते. एखाद्या गुन्ह्यात आरोपीचा समाजिक दर्जा, राजकीय दबाव किंवा आर्थिक सामर्थ्य कधीही त्यांच्या तपासात आड येत नाही. त्यामुळेच अनेक वेळा त्यांच्या हातून तपासलेले खटले अंतिम न्यायालयात यशस्वी ठरले आहेत.
पाचोरा शहरातील नागरिक आजही त्यांच्या कार्यकाळाचे स्मरण करताना “खरा पोलीस अधिकारी म्हणजे सचिन कदम” असे अभिमानाने सांगतात. त्यांचे काम केवळ दहशत निर्माण करणे नाही तर लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे हेच उद्दिष्ट ठेऊन
नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असताना त्यांनी अनेक सरकारी यंत्रणांतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर पाळत ठेवून रंगेहात पकडण्याचे यश संपादन केले. विशेष म्हणजे त्यांनी चालवलेल्या कारवाईंमध्ये अनेक मोठ्या आर्थिक घोटाळ्यांचा उलगडा झाला आणि दोषींना तुरुंगात पाठवले गेले.
तपास प्रक्रिया ही केवळ गुन्हेगार शोधणे नाही तर त्याच्या मागे असलेली यंत्रणा, आर्थिक साखळी, आणि भविष्यात होणारे धोके ओळखणे ही त्यांची व्याप्ती आहे. हीच कार्यशैली त्यांना इतर अधिकाऱ्यांपासून वेगळी करते.
राज्य शासनाकडून ‘बेस्ट इन्व्हेस्टीगेशन अवॉर्ड’ हा गौरव ज्या अधिकाऱ्याच्या तपास कौशल्याला मिळतो, त्या गुणवंत अधिकाऱ्यांपैकी सचिन कदम हे एक आहेत. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते हा पदक समारंभ दिनांक १ मे २०२५ रोजी होणार असून, त्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सत्य, न्याय आणि निष्पक्षतेच्या मार्गाने चालणाऱ्या तपास यंत्रणेला प्रोत्साहन मिळणार आहे.
या सन्मानासोबतच सचिन कदम यांचे नाव पोलीस दलाच्या इतिहासात उज्ज्वल तपास अधिकारी म्हणून कोरले जाणार आहे. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाचा गौरव वाढला असून हे पदक केवळ वैयक्तिक नव्हे तर संपूर्ण पोलीस यंत्रणेच्या सन्मानाचे प्रतीक ठरणार आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.