सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून निनादणारा आवाज “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जतो सह्याद्रीचा सिंह” हा केवळ घोष नव्हता, तर त्या असंख्य हुतात्म्यांचा शपथविधी होता, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण केले. एक मे महाराष्ट्र दिन म्हणजे एका महान बलिदानाचा स्मृतिदिन. ही तारीख केवळ राज्यनिर्मितीचा दिनांक नसून, ती मराठी अस्मितेच्या संघर्षाची, सांस्कृतिक जाणीवेच्या लढ्याची आणि विचारवंतांच्या क्रांतीशील आवाजाची साक्ष देणारी दिनांक आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणिसशे साठ रोजी झाली खरी, पण त्यामागे १०७ हुतात्म्यांचे रक्त सांडले. त्या रक्ताचे थेंब आज मुंबईतील हुतात्मा स्मारकात अमर झाले आहेत. हे स्मारक केवळ दगडांनी बांधलेले नाही, तर ते आपल्या अस्मितेच्या मुळाशी असलेल्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही केवळ भाषिक राज्यनिर्मितीची मागणी नव्हती. ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा, सामाजिक मूल्यांचा आणि आर्थिक हक्कांचा संघर्ष होता. मराठी भाषकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी करताना अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्या लढ्याला मुंबई केंद्रस्थानी होती – एक अशी मुंबई, जिच्या रचनेत कोळ्यांचे जाळ, गिरणगावातील श्रमिकांचे घाम, साहित्यिकांचे शब्द आणि बंडखोरांचे बाण होते. या चळवळीत हुतात्मा झालेले काही नावे आजही आपल्या स्मरणात आहेत: सिताराम बनाजी पवार, जोसेफ डेव्हिड पेजारकर, चिमणलाल डी. शेठ, रामचंद्र सेवाराम, शंकर खोटे, धर्माजी गंगाराम नागवेकर, निवृत्ती विठोबा मोरे, आत्माराम पानवलकर, बालप्पा कामाठी आणि असे अनेक. या यादीतील सर्व १०७ हुतात्म्यांचे बलिदान हा महाराष्ट्राच्या स्थापनेचा पाया आहे. या चळवळीला वैचारिक अधिष्ठान देणारे दोन महान विचारवंत म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. सावरकरांनी क्रांती, राष्ट्रभक्ती आणि सांस्कृतिक अस्मिता या त्रिसूत्रींवर अधोरेखित केलेल्या विचारधारेतून ‘हिंदुत्व’ आणि ‘स्वराज्य’ या संकल्पनांना सामाजिक भान दिले. त्यांनी मराठी भाषेच्या जतनासाठी आणि देशातील सर्व नागरिकांमध्ये बौद्धिक जागृतीसाठी लेखन आणि व्याख्याने दिली. महाराष्ट्र हा फक्त भौगोलिक नव्हे, तर विचारांचा प्रांत आहे, हे त्यांच्या कार्यातून सिद्ध होते. प्रबोधनकार ठाकरे यांनी जातिव्यवस्था, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आपल्या लेखणीतून रणशिंग फुंकले. त्यांच्या लेखांमध्ये सामाजिक जागृतीचा आणि मराठी अस्मितेचा स्पष्ट स्फोट आढळतो. मुंबई ही मराठी माणसाची आहे, हा ठाम संदेश त्यांनी वेळोवेळी समाजमनात बिंबवला. या लढ्याला आकार देणाऱ्यांमध्ये अनेक झुंजार नेते, समाजसुधारक, कवी, साहित्यिक, कलावंत आणि लोकनेते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेची मशाल पेटवली, आचार्य अत्रे यांनी आपल्या शब्दांनी हृदयाला घुसळून टाकणारे भाषण दिले. सेनापती बापट यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून नेतृत्व केले. एस. एम. जोशी, श्रीपाद अमृत डांगे, शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांनी लोकजागृतीचा मशाल उंचावून धरला. या सर्वांनी मिळून चळवळीला चैतन्य दिले. मुंबईत २१ नोव्हेंबर १९५५ रोजी शांततामय मोर्चा काढताना पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात अनेक युवक धारातीर्थी पडले. हे सारे युवक विविध सामाजिक पार्श्वभूमीतील होते – कामगार, विद्यार्थी, दुकानदार, साधे नागरिक. हे बलिदान महाराष्ट्राच्या रचनेचे मूळ बनले. या चळवळीत जी नावे अज्ञात राहिली, ती देखील आपल्या स्मृतीत टिकवणे हे आपले कर्तव्य आहे. अनेकांनी आपले नाव न सांगता, कुठल्याही श्रेयाशिवाय रात्रंदिवस प्रचार, जनजागृती आणि सहकार्य केले. त्यांचेही योगदान या भूमीच्या रक्तामध्ये मिसळलेले आहे. आज एक मे महाराष्ट्र दिन साजरा करताना आपण फक्त शासकीय कार्यक्रमांपुरते मर्यादित राहता कामा नये. ही संधी आहे – आपल्या भाषेसाठी, संस्कृतीसाठी, स्वाभिमानासाठी आपण काय करत आहोत हे विचारण्याची. आज महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्टीने देशात अग्रणी होती की आहे, हे सुद्धा तपासण्याची वेळ आलेली आहे. सोबतच शेतकरी आत्महत्यांच्या छायेत, उद्योग महाराष्ट्राबाहेर नेले जात आहेत, महाराष्ट्र बेरोजगारीच्या संकटात आणि सामाजिक विषमतेच्या वावटळीत अडकलेला आहे. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या मूळ उद्दिष्टांचा आपण विचार करायला हवा – केवळ भाषेच्या नावावर राज्य मिळवणे नव्हे, तर त्या राज्याला समतेचे, न्यायाचे आणि प्रगतीचे राज्य बनवणे ही खरी जबाबदारी आहे. १०७ हुतात्म्यांनी आपला प्राण गमावला, हे विसरणे म्हणजे स्वतःच्या इतिहासाला काळोख्या कोठडीत ढकलणे होय. स्वातंत्र्यवीर सावरकर, प्रबोधनकार ठाकरे आणि असंख्य दिग्गजांचा लढा केवळ त्या काळासाठी नव्हता, तो पुढील पिढ्यांना दिशा देणारा आहे. म्हणूनच – हुतात्म्यांच्या रक्तातून साकारलेला महाराष्ट्र ही संकल्पना आजही ताजी आहे. ती जागवली पाहिजे, जपली पाहिजे आणि पुढे नेली पाहिजे. आजच्या काळातील सावधपणा आणि काळजीची गरज अधिकच भासू लागली आहे. महाराष्ट्र आज औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या भारतात अग्रगण्य आहे. परंतु या प्रगतीच्या आड, मराठी अस्मिता पुन्हा एकदा एका संकटाच्या छायेत सापडत चालली आहे. वेगवेगळ्या राजकीय शक्ती आणि आर्थिक गट केवळ त्यांच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राची सामाजिक, भाषिक आणि सांस्कृतिक ओळख गालबोटीत टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः मुंबईसारख्या शहराचे केंद्रस्थान वारंवार डळमळीत करण्याचे प्रयत्न होतात. विशेष म्हणजे आज राजकीय आणि वैयक्तिक स्वार्थापोटी महाराष्ट्राची अस्मिता पुन्हा एकदा गुजरातच्या पायाशी टाकण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न काही मंडळी करत आहेत. हे केवळ दुर्दैवीच नव्हे, तर हुतात्म्यांच्या बलिदानाचा अपमान आहे. १०७ हुतात्म्यांचे रक्त ज्यात मिसळले आहे, ती मुंबई आणि महाराष्ट्राची अस्मिता कोणत्याही परिस्थितीत कोणाच्याही राजकीय ताटाखालचं मांजर होऊ देणार नाही, ही प्रत्येक महाराष्ट्र भूमिपुत्राची जबाबदारी आहे. हुतात्म्यांचे स्मरण केवळ एका दिवशी नको, तर प्रत्येक निर्णयात हवे. आज आपल्याला महाराष्ट्र दिन साजरा करताना केवळ शासकीय औपचारिकता नको, तर एक ठोस मूल्यनिष्ठ आकलन हवे. आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कामगारांचे विस्थापन, बेरोजगारी, भाषिक अनादर आणि सामाजिक विषमता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेले आहोत. अशा परिस्थितीत आपण मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता या संकल्पनांचा केवळ भावनिक नव्हे, तर क्रियाशील अर्थ शोधायला हवा. आजच्या पिढीने हे बलिदान आणि मूल्यसंस्था विसरल्यास पुन्हा एकदा आपल्याला त्या संपूर्ण लढ्याचा इतिहास नव्याने लिहावा लागेल – पण या वेळेस शक्यतो हुतात्म्यांशिवाय. महाराष्ट्र ही केवळ भूमी नाही, तर ती हुतात्म्यांच्या रक्तातून फुललेली अस्मिता आहे. ती कोणाच्या स्वार्थासाठी तुडवली जाऊ नये, हीच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण साऱ्यांनी शपथ घेणे गरजेचे आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.