पाचोरा – शहरातील पुनगावरोड–गिरडरोड परिसर हा रेल्वेस्थानकाच्या जवळील अतिशय महत्वाचा वर्दळीचा भाग म्हणून ओळखला जातो. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करत असतात. रेल्वेने प्रवास करणारे, आपल्या नातेवाइकांना स्टेशनवर सोडणारे किंवा आणणारे, तसेच पहाटे मॉर्निंग वॉकला निघणारे नागरिक या मार्गावरून नेहमीच जात असतात. सध्या लग्नसराईचा कालावधी सुरू असल्यामुळे रात्री अपरात्री रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. या परिसरात दुकाने किंवा हॉटेल्स नसले तरीही ही रस्त्याची वस्ती काहीशा अंतर्मुख भागात असल्याने इथे सतत नागरिकांची हालचाल सुरू असते. मात्र गेल्या चार दिवसांपासून या सगळ्या भागात सार्वजनिक रस्त्यावरील व लगतच्या कॉलनी मधील लाईट पूर्णपणे बंद आहेत आणि हा अंधार अक्षरशः गुन्हेगारांसाठी वरदान ठरत आहे. परिसरात पसरलेल्या अंधारामुळे केवळ अपघाताचाच नव्हे तर चोरी, घरफोडी, चैन स्नॅचिंग आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांनाही प्रोत्साहन मिळत आहे. विशेष म्हणजे या परिसरात आधीपासूनच दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याचा इतिहास आहे नागरिकांनी यासंबंधी पोलिसांकडे तक्रारीही केल्या आहेत. स्थानिकांनी सांगितले की, अगदी उजेडातसुद्धा अलीकडे घरफोडीच्या घटना घडत असताना आता अंधाराचा फायदा घेऊन गुन्हेगार अधिक बिनधास्त होत चालले आहेत. अंधारामुळे नागरिकांना स्वतःच्या घराबाहेर पडणेही धोकादायक वाटत आहे. महिलांनी रात्री तर सोडाच पण संध्याकाळीही या भागातून एकट्याने चालणे टाळले आहे. वृद्ध व्यक्ती, लहान मुले, शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि पहाटे व्यायामासाठी निघणारे नागरिक या सगळ्यांना अंधारात चालताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काहींना पाय घसरून पडल्याच्या तक्रारी आहेत, तर काहींना कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. या भागात दुचाकी किंवा चारचाकी वाहन घेऊन जाणाऱ्यांना रस्त्यावर अडथळे किंवा खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता सातत्याने निर्माण होत आहे. स्थानिक नागरीकांनी याबाबत नगरपालिका व महावितरण कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठल्याही यंत्रणेकडून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. काही कर्मचारी ‘लाइनमध्ये तांत्रिक बिघाड आहे’, ‘संपर्क सुरू आहे’, ‘दुरुस्ती लवकर होईल’ असे आश्वासक पण कृतीशून्य प्रतिसाद देऊन वेळ मारून नेत आहेत. प्रत्यक्षात दुरुस्तीचा एकही प्रयत्न ठिकाणी होताना दिसत नाही. संपूर्ण रस्ता व कॉलनी रात्री पूर्णपणे काळोखात गडप होतो आणि त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या भागात काही घरांवर आधीच दरोड्यांचे प्रयत्न झाले आहेत, अनेक घरांमध्ये घरफोडी करून हजारो रुपये रोख, सोनं व अन्य किमती वस्तू चोरीस गेल्याच्या घटनांची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यात झाली आहे. मात्र त्या गुन्ह्यांचा तपास अपूर्ण असून आरोपी अजूनही फरार आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक आधीच असुरक्षिततेच्या सावटाखाली वावरत आहेत. यावर सार्वजनिक प्रकाश व्यवस्था ठप्प झाल्यामुळे जणू प्रशासनाने गुन्हेगारांना आमंत्रणच दिल्यासारखी परिस्थिती झाली आहे. एखाद्या गंभीर प्रकारात घरफोडी झाली किंवा चोरीच्या वेळी घरातील व्यक्तींवर हल्ला झाला तर त्यास जबाबदार कोण? सार्वजनिक सुरक्षेचा हा मुद्दा असताना प्रशासन इतक्या गंभीरतेने दुर्लक्ष कसे करू शकते, असा सवाल नागरिक विचारत आहेत. तसेच हा रस्ता रेल्वे स्थानकाशी जोडला असल्यामुळे दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. स्टेशनवरून बाहेर पडल्यावर प्रवाशांना घर गाठण्यासाठी याच रस्त्याचा उपयोग करावा लागतो. रात्रीच्या ट्रेनने पोहोचलेले प्रवासी, एकटे महिलावर्ग, विद्यार्थिनी यांच्यासाठी या अंधाऱ्या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे थेट धोकादायक मोहिमेप्रमाणे झाले आहे. काही जण मोबाईलची टॉर्च लावून चालतात, तर काहींनी रिक्षा किंवा वाहन बोलावून दारापर्यंत आणण्यास सुरुवात केली आहे. पण सगळ्यांना हा पर्याय उपलब्ध होतोच असे नाही. परिणामी अंधारात चालताना घडणारे अपघात, हातातून वस्तू पडणे, लुटीचा धोका वाढणे असे प्रकार होऊ शकतात नागरिकांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक लाईट व्यवस्था ही अत्यावश्यक गोष्ट असताना ती चार दिवसांपासून ठप्प असणे ही बाब अत्यंत गंभीर असून यामागे कुठलेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. वास्तविक पाहता एखाद्या वस्तीतील लाईट बंद होणे म्हणजे त्या भागातील संपूर्ण सामाजिक जीवनच ठप्प होणे असते. यासाठी यंत्रणांनी तत्काळ कृती करणे गरजेचे असते. परंतु इथे तर चार दिवस उलटून गेले तरीही लाईट सुरू करण्यासाठी एकही यंत्रणा जागेवर दाखल झालेली नाही. नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत असा हलगर्जीपणा हा केवळ निष्काळजीपणा नसून हत्याराच्या स्वरूपातील दुर्लक्ष ठरते. विज वितरण कंपनी आणि नगरपालिका यंत्रणेचे कर्तव्य आहे की नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात. यामध्ये वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, आणि सुरक्षा या गोष्टी अत्यावश्यक आहेत. पण जर अंधाराचाच अंधार निर्माण केला जात असेल तर खाजगी वितरण कंपनी व नगरपालिका प्रशासनाची व्यवस्था लोकांच्या विश्वासास पात्र कशी ठरेल? विशेष म्हणजे या भागात दिवसा सुद्धा घरफोड्यांचे प्रमाण वाढले असल्याचे उदाहरणांसह स्पष्ट झाले असून यावरून अंधाराचा किती मोठा परिणाम होऊ शकतो, हे सहज लक्षात येते. जर दिवसा चोरी होत असेल तर रात्री अंधारात काय होईल, याची कल्पनाच थरकाप उडवणारी आहे. सोशल मीडियावरही या विषयाला वाचा फुटली असून अनेकांनी प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर या अंधारात घरात घुसून चोरी किंवा अत्याचार झाला तर जबाबदार कोण, असा सवाल थेट वीज वितरण कंपनीला व न पा प्रशासनाला विचारला आहे. हे प्रकरण केवळ लाईट बंद आहे एवढ्यावर थांबत नाही, तर ही गोष्ट नागरिकांच्या जिवित व मालमत्तेच्या सुरक्षेशी निगडित आहे. प्रशासनाने या विषयावर संवेदनशीलता दाखवून तात्काळ लाईट पुरवठा सुरळीत करावा, महावितरण व नगरपालिका प्रशासनाने तपासणी करून दोष दूर करावा तोपर्यत पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त जाता वाढवून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा. अन्यथा या अंधारात गुन्हेगारीची मोठी साखळी उभी राहील आणि त्याच्या छायेत संपूर्ण समाज बकाल होईल. त्यामुळे हा विषय प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने घ्यावा अशी मागणी जनतेकडून होत आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.