पाचोरा – वैद्यकीय क्षेत्रात केवळ ज्ञानच नव्हे, तर संवेदनशीलतेची उब आणि माणुसकीचा स्पर्श यांच्याही तेवढ्याच गरज असते. अशाच मूल्यांच्या आधारावर उभे राहिलेले, आणि अवघ्या सहा वर्षांत हजारो रुग्णांच्या मनात विश्वासार्हतेचे स्थान निर्माण करणारे सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आता आपल्या यशस्वी वाटचालीच्या सातव्या वर्षात प्रवेश करत आहे. रुग्णसेवेचा खरा अर्थ काय, याचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर स्वप्निल पाटील व डॉक्टर सौ. ग्रिष्मा पाटील या उच्चशिक्षित, सेवाभावी दांपत्याचे हे जीवनकेंद्र.या वर्धापन दिनाचे औचित्य साधत त्यांच्या कार्याचा मागोवा घेणे आणि त्या मागे असलेले विचार, तत्त्व, परिश्रम आणि समर्पण यांचा उजाळा घेणे आवश्यक ठरते.
सहा वर्षांपूर्वी 2019 मध्ये पाचोऱ्यातील भडगाव रोडवरील 'भाग्यश्री प्लाझा' येथे उभे राहिलेल्या या हॉस्पिटलने अल्पावधीतच परिसरातील आरोग्यसेवेमध्ये नवे मापदंड निर्माण केले आहेत. डॉ. स्वप्निल पाटील यांचा वैद्यकीय प्रवास हा केवळ डिग्रीपर्यंत मर्यादित नाही. पाचोऱ्यातच शालेय शिक्षण घेतलेल्या डॉ. पाटील यांनी दहावी व बारावीमध्ये सातत्याने प्रथम क्रमांक
राखत वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. एम.डी. मेडिसिन ही पदवी सुवर्णपदकासह मिळविल्यानंतर त्यांनी मुंबईतील जसलोक आणि सायन या प्रतिष्ठित रुग्णालयांमध्ये क्रिटिकल केअर विभागात सेवा बजावली. तरीही, मोठ्या शहरातील आकर्षक संधींना नकार देत त्यांनी आपली जन्मभूमी, शिक्षणभूमी आणि कर्मभूमी असलेल्या पाचोऱ्यात परत येण्याचा निर्णय घेतला. त्यांची अर्धांगिनी डॉ. सौ. ग्रिष्मा पाटील यांनी एम.बी.बी.एस. आणि डी.सी.एच. या पदव्या प्राप्त करून स्वतःला बालकांच्या आरोग्यासाठी वाहून घेतले. त्या नवजात शिशु आणि बालरोग तज्ञ म्हणून सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सेवा बजावत आहेत. त्यांच्या बालकांप्रती असलेल्या ममत्वपूर्ण दृष्टीकोनामुळे रुग्ण आणि पालक यांच्यात त्यांच्या प्रती अपार विश्वास निर्माण झाला आहे. या हॉस्पिटलमध्ये मधुमेह, थायरॉईड, किडनी, यकृत, उच्च रक्तदाब, मेंदू विकार, मिरगी, हृदयविकार, दमा अशा किचकट आजारांवर अचूक निदान आणि सुयोग्य उपचार केले जातात. डॉ. ग्रिष्मा पाटील यांच्या विभागात नवजात बाळांपासून बारा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या सर्व आजारांवर शास्त्रोक्त व परिणामकारक उपचार केले जातात. अंगावर सूज येणे, बाळ दूध न पिणे, हातपाय निळे पडणे, त्वचाविकार, वारंवार ताप येणे, कावीळ, न्युमोनिया अशा बालकांशी निगडित समस्या अत्यंत तज्ञतेने हाताळल्या जातात. हॉस्पिटलमध्ये असलेली अत्याधुनिक यंत्रसामुग्री, प्रशिक्षित स्टाफ, सुसज्ज आयसीयू, स्वच्छता, तत्पर रुग्णवाहिका आणि सुसंवादी प्रशासन यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आत्मविश्वासाने उपचार घेण्यासाठी येथे येतात.
महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत डायलिसिस सेवा सुरू करून सिद्धिविनायक हॉस्पिटलने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात सामाजिक भान दाखवले आहे. या योजनेअंतर्गत नवजात शिशूपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील रुग्णांवर दमा, मेंदूचे विकार, हृदयविकार, मलेरिया, डेंग्यू, सर्पदंश, विषबाधा, अपघाती इजा, फ्रॅक्चर अशा गंभीर आजारांवर मोफत उपचार सुरू झाले आहेत. नवजात बालकांसाठी NICU सुविधा आणि वयोवृद्धांसाठी वैद्यकीय सुविधा हा या हॉस्पिटलचा विशेष पैलू ठरला आहे.
कोरोना काळात डॉक्टर्स दांपत्याने अहोरात्र सेवा करत स्वतःचे प्राण धोक्यात घालून सामाजिक कर्तव्य पार पाडले. स्वतः बाधित होऊनही ते पुन्हा सेवा देण्यासाठी सज्ज झाले. त्यांच्या या समर्पणाचे अनेक उदाहरणे आज पाचोऱ्यात दररोज ऐकायला मिळतात. त्यांनी फक्त वैद्यकीय उपचारच केले नाहीत तर लोकांमध्ये आत्मविश्वास जागवला, भीती घालवली आणि माणुसकीचे दर्शन घडवले. या सहा वर्षांच्या कालखंडात त्यांनी केवळ रुग्णसेवा केली नाही तर आरोग्याच्या क्षेत्रात समाजाभिमुख उपक्रमांचीही एक शृंखला उभी केली आहे. ग्रामीण व शहरी भागात वैद्यकीय शिबिरे, जनजागृती कार्यक्रम, माता-पित्यांसाठी मार्गदर्शन, मुलांच्या शाळांमध्ये तपासण्या, मोफत तपासणी योजना, सवलतीत औषधे देणारे उपक्रम राबवले गेले आहेत.
हे सर्व पाहता सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे केवळ एक उपचार केंद्र नाही तर सामाजिक स्वास्थ्याची चळवळ ठरली आहे. हॉस्पिटलच्या पुढील टप्प्यात टेलीमेडिसिन सेवा, महिला आरोग्य केंद्र, मोफत कॅन्सर तपासणी, वृद्धांसाठी फिजिओथेरपी सुविधा, नर्सिंग व फार्मसी कॉलेज, कार्डियाक कॅथलॅब यांचे नियोजन पूर्ण झाले आहे. ही सेवा केवळ शहरापुरती मर्यादित न राहता, तालुक्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार या दांपत्याने केला आहे. त्यांच्या या नियोजनात केवळ वैद्यकीय सुविधा नाहीत तर रुग्णाच्या मानसिक आणि आर्थिक आधाराचा विचारही अंतर्भूत आहे. डॉ. स्वप्निल आणि डॉ. सौ. ग्रिष्मा पाटील यांचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक सेवा उपक्रम आणि प्रत्येक उपचार यामागे असलेली माणुसकीची भावना या हॉस्पिटलच्या प्रत्येक भिंतीत खोलवर भिनलेली आहे. त्यामुळेच आज सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा वर्धापन दिन म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातल्या माणुसकीच्या विजयाचा साजरा ठरतो. सर्व पाचोरा व तालुक्याच्या जनतेकडून या सेवाभावी युगपुरुष व युगस्त्रीला मानाचा मुजरा आणि पुढील आरोग्यप्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! ‘सिद्धिविनायक’ हे केवळ नाव नसून – आरोग्याचा आशीर्वाद देणारे श्रद्धास्थान!
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.