भडगाव – तालुक्यातील कोळी समाज बांधवांना जातीचा दाखला मिळवण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेले सेतु सुविधा केंद्र आणि CSC सेंटर हेच आता या समाजातील लोकांसाठी त्रासाचे कारण ठरत आहेत. कारण, भडगाव शहरासह तालुक्यातील अनेक कोळी बांधवांनी आपले सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन जातीचा दाखला मिळवण्यासाठी सेतु व CSC सेंटरवर अर्ज सादर करण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित केंद्र चालकांनी “कागदपत्रे अपुरी आहेत” किंवा “तांत्रिक अडचण आहे” अशा कारणांचा दाखला देत हे अर्ज स्वीकारण्यास नकार दिला आहे. या प्रकारामुळे कोळी समाज बांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, समाज बांधवांनी प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संबंधित प्रकरणावर बोलताना कोळी समाजातील काही बांधवांनी ध्येय न्युजशी संवाद साधताना सांगितले की, शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही जातीचा दाखला देण्याचा अधिकार हा फक्त शासकीय सक्षम अधिकाऱ्यांकडेच असतो. अर्जदाराकडून सादर झालेल्या कागदपत्रांची पडताळणी करून दाखला देणे, नाकारणे किंवा अपूर्ण कागदपत्रांची परतावणी करणे हे अधिकार सन्माननीय प्रांताधिकारी व संबंधित महसूल विभागातील अधिकारी यांच्याकडेच आहेत. मात्र, हे सर्व अधिकार असताना देखील सेतु सुविधा केंद्र आणि CSC सेंटरचे चालक स्वतःच अर्ज स्वीकारण्यास नकार देत आहेत. त्यांच्या नकारामुळे अर्जदारांना दाखला प्रक्रियेसाठी पुढे जाता येत नाही, आणि त्यामुळे समाजातील बांधवांना आवश्यक प्रमाणपत्रासाठी वारंवार दवडावे लागत आहे. अर्ज न स्वीकृत करण्याचे कारण विचारले असता संबंधित केंद्रचालकांनी “कागदपत्र अपुरे आहेत” किंवा “ऑनलाईन प्रणालीमध्ये तांत्रिक त्रुटी आहे” अशा कारणांचा आधार घेत अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. परंतु वास्तवात अर्ज स्वीकारून ते शासकीय स्तरावर पाठवणे हेच त्यांच्या जबाबदारीचा भाग आहे. कागदपत्रे चुकीची आहेत का, त्यात त्रुटी आहेत का किंवा अधिक पुरावे आवश्यक आहेत का, याचा निर्णय घेणे हा प्रांताधिकारी कार्यालयाचा अधिकार आहे. अशा परिस्थितीत सेतु व CSC केंद्र चालक स्वतःच अर्ज न स्वीकारून नागरिकांच्या शासकीय अधिकारावरच अन्याय करत आहेत, अशी कोळी समाज बांधवांची भावना आहे. या अन्यायाविरुद्ध समाजात प्रचंड संताप असून, संबंधित अधिकारी व केंद्रचालकांवर कारवाई न झाल्यास येत्या काही दिवसांत भडगाव येथे कोळी समाजाकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले जाईल, अशी तीव्र चेतावणी देण्यात आली आहे. पाचोरा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सन्माननीय प्रांताधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या कोळी समाज बांधवांनी आपली व्यथा ध्येय न्युजशी मांडताना सांगितले की, शासन नागरिकांना सोयीसाठी डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून सेवा देत आहे. परंतु जर त्या प्रणालीतील केंद्रचालकच अर्ज स्वीकारण्यास नकार देतील, तर सामान्य नागरिक कुठे जावेत? शासनाचे उद्दिष्ट लोकाभिमुख असताना, काही सेतु केंद्र चालक मात्र स्वतःच नियम बनवत आहेत आणि त्यामुळे शासनाच्या उद्देशावर पाणी फिरत आहे. त्यामुळे सन्माननीय प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित सेतु सुविधा केंद्र व CSC सेंटर चालकांना योग्य तो आदेश द्यावा, अशी मागणी कोळी समाज बांधवांनी केली आहे. तसेच, शासनाने केंद्रचालकांना नागरिकांच्या अर्ज स्वीकारणे बंधनकारक करावे आणि कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या बाबतचा अहवाल व शेरा सक्षम अधिकाऱ्यांकडे पाठवावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणामुळे भडगाव तालुक्यातील कोळी समाजात मोठी चर्चा सुरू असून, समाजातील वयोवृद्धांसह तरुण वर्गही एकजुटीने या अन्यायाविरोधात उभा राहत आहे. “सेतू सुविधा म्हणजे नागरिकांच्या सेवेसाठी असलेले माध्यम आहे, पण आता तेच नागरिकांच्या समस्या वाढवणारे केंद्र बनले आहे,” अशा शब्दांत समाजातील अनेक बांधवांनी आपली नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शासनाने या गंभीर बाबीची चौकशी करून संबंधित चालकांवर योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून त्रस्त कोळी बांधवांना त्यांच्या हक्काचा जातीचा दाखला सहज उपलब्ध होईल, अशी मागणी कोळी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.