भडगाव : शिक्षण ही केवळ ज्ञानाची देवाणघेवाण नसून ती नव्या पिढीच्या जीवनदिशेला आकार देणारी शक्ती आहे. आणि हीच शक्ती प्रभावीपणे विद्यार्थ्यांच्या मनात व भविष्याच्या वाटेवर जागवण्याचे मोलाचे कार्य पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था गेल्या अनेक दशकांपासून अत्यंत यशस्वीपणे पार पाडत आहे. याच संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेले सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय, सौ. जयश्री ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय, तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग यांनी सन २०२५ च्या बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक निकाल साध्य करून संस्थेची यशस्वी परंपरा पुढे नेली आहे. यंदा शालेय निकाल ऑनलाइन जाहीर होताच संपूर्ण परिसरात समाधान व अभिमानाची लहर उमटली. शास्त्र शाखेचा निकाल तब्बल ९८.५०%, कला शाखेचा ८९.५०% तर व्यवसाय अभ्यासक्रमाचा ८७.५०% इतका लागल्याने पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या गुणवत्तेचा आणि शैक्षणिक बांधिलकीचा एक अभेद्य ठसा उमटला आहे.
शास्त्र शाखा
या विभागात – गौरव संदीप सोनवणे याने ८७% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. गौरव हा अभ्यासू, शांत, आणि समर्पित विद्यार्थी असून त्याची ही घोडदौड त्याच्या चिकाटीचे उदाहरण आहे. त्याच्यापाठोपाठ श्रावणी निलेश पाटील हिने ८६.१७% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर आदित्य योगेश चिंचोले याने ८५.६७% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. ही तिघंही विद्यार्थी शाळेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असत.
कला शाखा
या विभागात – चैताली भीमराव मोरे हिने ८८.८३% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. चैतालीच्या गुणांचा आलेख हा शालेय जीवनात सततच वरच्या पातळीवर राहिला आहे. तिच्या यशामागे तिची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा आहे. मेघा नरेंद्र पाटील हिने ८२.१७% गुण मिळवून द्वितीय तर अंकुश बाळकृष्ण माळी याने ८०.८३% गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम
या शाखेअंतर्गत तीन वेगवेगळ्या तांत्रिक विषयांत विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
अकॉउंटिंग विभागात प्रतीक्षा गणेश पाटील हिने ६९.६६% गुणांसह यश मिळवले.
इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी विभागात किरण अनिल पवार याने ६८.८३% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला तर दुसऱ्या गटात भूषण ज्ञानेश्वर पाटील याने ६५.१४% गुणांसह प्रथम स्थान प्राप्त केले.
या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या शिक्षकांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
सदर निकालाची अधिकृत घोषणा होताच, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार दिलीपभाऊ वाघ, चेअरमन नानासो संजय वाघ, व्हाईस चेअरमन नानासो व्ही. टी. जोशी, मानद सचिव दादासो ॲड महेश देशमुख, शालेय समितीचे चेअरमन आबासो दत्ता पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन बाबासो विनय जकातदार, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे चेअरमन नानासो विजय देशपांडे, तसेच सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक अजय अहिरे, उपमुख्याध्यापक आर. बी. पाटील, पर्यवेक्षक शरद महाजन, पर्यवेक्षिका छाया बिर्हाडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधुभगिनींच्या मार्गदर्शनामुळेच आज विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चालवले जाणारे उपक्रम, तांत्रिक प्रशिक्षण व नैतिक मूल्यांची जाणीव या साऱ्यांचे प्रतिबिंब या निकालात प्रकर्षाने दिसून आले. सतत पुढे जाण्याची ऊर्जा आणि संस्थेचा विकासदृष्टीकोन शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या बळावरच नव्हे तर आपल्या अभ्यासातील शिस्त, अभ्यासाची सातत्यपूर्णता, सुसंस्कारित वागणूक, आणि समाजोपयोगी दृष्टिकोन यामुळे शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. ही परंपरा अखंड सुरु ठेवण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी तसेच सर्व शिक्षक वर्ग सातत्याने प्रयत्नशील आहेत.
यंदाच्या निकालामुळे संस्थेवर असलेला विद्यार्थ्यांचा व पालकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. संस्थेने वेळोवेळी शाळेतील भौतिक सुविधा, संगणक शिक्षण, तांत्रिक साहित्य, ग्रंथालय, प्रयोगशाळा, ई-लर्निंग, खेळाचे मैदान यावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे. शिक्षणसंस्था म्हणजे फक्त ज्ञानदानाचे केंद्र नसते तर ती मूल्य, संस्कार आणि नेतृत्व निर्माण करणारी कार्यशाळा असते. सौ. जयश्री ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयाने या तत्वाला अनुसरून शिक्षण दिले आणि आज त्याच्या फळरूपात गुणवंत विद्यार्थी समाजासमोर उभे ठाकले आहेत. विद्यार्थ्यांचे हे यश म्हणजे त्यांचे वैयक्तिक यश नसून, ते त्यांच्या शिक्षकांचे, पालकांचे आणि संस्थेच्या मार्गदर्शक मंडळाचे एक सामूहिक यश आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे भावी शिक्षण व करिअर प्रवास यशस्वी होवो, ते उच्च शिक्षण घेऊन देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देतील, अशा शुभेच्छा संस्थेच्या वतीने सर्वांनी एकमुखाने व्यक्त केल्या. या निकालाच्या निमित्ताने पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला नवा सन्मान प्राप्त झाला असून भविष्यात ही परंपरा अधिक बहरत राहो हीच झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युज तर्फे शुभेच्छा
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.