शाश्वत शेतीचा नवा आराखडा : पाचोऱ्यात उद्या खरीप हंगाम 2025 साठी तालुकास्तरीय नियोजन व मार्गदर्शन कार्यशाळा – मा. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन

पाचोरा –– महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक 6 मे 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता, पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2025 पूर्वतयारीसाठी भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार मा. किशोर आप्पा पाटील भूषवणार असून, हा उपक्रम फळरोप वाटिका, गिरड रोड, पाचोरा येथील कृषि विभागाच्या आवारात संपन्न होणार आहे. शासनाच्या शेतकरीहितदृष्टीकोनातून दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची ही मालिका यंदा नव्या दमाने सुरू होत आहे. सन 2024–2025 या वर्षात कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा, त्यामधून साध्य झालेली उद्दिष्टे, शेतकऱ्यांचा लाभ आणि पुढील खरीप हंगाम 2025 साठी आखण्यात आलेल्या नव्या धोरणांची माहिती या कार्यशाळेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यामध्ये विविध मोहिमा, प्रात्यक्षिके, सजीव स्टॉल्स, शेतमाल प्रक्रिया उद्योगांचे प्रात्यक्षिक, कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांचे सहभाग, मार्गदर्शन सत्र व कृषी तज्ज्ञांचे संवाद सत्र या सर्व गोष्टींचा समावेश आहे.
या कार्यशाळेत उपस्थित राहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान, साधने, आधुनिक शेतीमाल उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विपणन व संधी यांची सखोल माहिती मिळणार असून, शेतकरी गट, उत्पादक कंपन्या, खाजगी निविष्ठा वितरक आणि सूक्ष्म सिंचन कंपन्यांचा प्रत्यक्ष सहभाग यात असेल.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, उपविभागीय कृषि अधिकारी किशोर मांडगे, कृषि विकास अधिकारी विजय बनसोडे, तालुका कृषि अधिकारी रमेश जाधव व अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांमध्ये डॉ. हेमंत बाहेती, डॉ. गिरीश चौधरी, इंजि. वैभव सुर्यवंशी, डॉ. शरद जाधव (कृषी विज्ञान केंद्र, जळगाव) हे तांत्रिक विषयांवर सखोल मार्गदर्शन करणार आहेत. बीजप्रक्रिया, माती नमुना, उगवण चाचणी, जैविक निविष्ठा, BBF तंत्रज्ञान, जलसंधारण, फळबाग लागवड, गुलाबी बोंडअळी नियंत्रण आदी विषयांवरील प्रत्यक्ष प्रात्यक्षिके ही या कार्यशाळेचा केंद्रबिंदू असणार आहेत.
या आधी 4 मे 2025 रोजी तालुका कृषि अधिकारी रमेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली खरीप नियोजन व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कृषी विभागातील सर्व कर्मचारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधी, फार्मर प्रोड्युसर कंपन्या, सूक्ष्म सिंचन विक्रेते यांची उपस्थिती होती. सविस्तर नियोजन, जबाबदाऱ्यांचे वाटप, प्रात्यक्षिकांचे व्यवस्थापन यावर या बैठकीत सखोल चर्चा झाली.
कार्यशाळेच्या आयोजनामध्ये PMFME योजनेअंतर्गत नवउद्योजकांचा सहभाग घेतला जाणार असून, त्यांनी उभारलेले स्टॉल्स आणि त्यांचे अनुभव शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधी, शासकीय मदतीच्या योजना आणि उत्पादन क्षमतेवाढीचा मार्ग यावरही चर्चा होणार आहे.
प्रदर्शन विभागात जैन इरिगेशन, निर्मल सीड्स, IFFCO, महाधन, बेल्जियम फर्टिलायझर, महाबीज, कृषि विज्ञान केंद्र व अन्य कंपन्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले असून, येथे रासायनिक आणि जैविक निविष्ठा, नॅनो तंत्रज्ञान, जैविक प्रक्रिया, स्पिरुलिना उत्पादन अशा विविध संकल्पनांचे प्रात्यक्षिक व माहिती सादर केली जाणार आहे.
कार्यक्रमाचे बोधवाक्य “शेतकऱ्यांनीच शेतकऱ्यांसाठी चालवलेली बाजारव्यवस्था म्हणजेच आदर्श बाजारव्यवस्था” हे असून, या उपक्रमामार्फत शेतकऱ्यांमध्ये बाजार व्यवस्थापनाबाबत स्वयंपूर्णतेचा आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न आहे.तालुका कृषि अधिकारी कार्यालय, पाचोरा व आत्मा यंत्रणा यांच्या समन्वयातून आयोजित या नावीन्यपूर्ण उपक्रमात तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे व या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here