भाजप कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी दिलीपभाऊ वाघ यांचा तातडीने पक्षप्रवेश अत्यावश्यक!

Loading

पाचोरा-भडगाव मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षांपासून राजकीयदृष्ट्या अत्यंत चुरशीचा आणि तितकाच मतभेदांनी व्यापलेला मतदारसंघ राहिला आहे. येथे पक्षांची वर्चस्वाची लढाई ही स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाच्या बळावर लढली जाते, जिथे जनतेशी नातं, संघर्षाची पार्श्वभूमी ठराविक दिशा देतो. याच पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती आखताना भारतीय जनता पार्टीने जर खरोखरच पाचोरा-भडगावमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करायचं ठरवलं असेल, तर माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप पक्षप्रवेश हा आजच्या घडीला सर्वात निर्णायक आणि तितकाच अनिवार्य असा टप्पा ठरतो. दिलीपभाऊ वाघ हे पाचोरा-भडगावमधील राजकारणात फक्त

एक नाव नाही तर ते एक राजकीय वादळ आहे. कारण त्यांचे पिताश्री स्व. आमदार आप्पासाहेब ओ. ना. वाघ यांच्यापासून सुरू झालेला जनतेसाठी संघर्ष, कार्य, अनुभव आणि लोकसमस्या सोडविण्याची परंपरा आजही त्यांच्यामार्फत समर्थपणे सुरू आहे.दिलीप भाऊ वाघ यांचीच नव्हे तर संपूर्ण वाघ परिवाराची ही एक विश्वासार्ह आणि जनतेशी जोडलेली प्रतिमा आजही ताजी आहे. त्यांनी आमदार असताना केलेल्या विकासकामांपासून ते वेळोवेळी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास नागरिकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करतो. ते कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी नसतानाही मतदारसंघातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत राहतात. त्यामुळेच भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या नावाबाबत आदर आणि विश्वास आहे. अशा नेतृत्वाला जर वेळीच सामावून घेतले नाही, तर त्याचा राजकीय तोटा हा फक्त मतांचे विभाजन नव्हे तर कार्यकर्त्यांच्या मनोबलाच्या घसरणीच्या स्वरूपात भाजपला सहन करावा लागू शकतो. भाजपमध्ये दिलीपभाऊ वाघ यांचा प्रवेश ही एक केवळ औपचारिकता राहिलेली असून, पक्षश्रेष्ठींपासून स्थानिक पातळीपर्यंत बहुसंख्य कार्यकर्त्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, हा प्रवेश नेमका कोणत्या दिवशी आणि कुठल्या कार्यक्रमात घ्यायचा, यावरच सध्या निर्णय प्रक्रिया थांबलेली दिसते. ही विलंबित प्रक्रिया जर अधिक काळ चालू राहिली, तर त्यामुळे संधी गमावण्याचा धोका निर्माण होतोय. कारण पाचोरा-भडगावमध्ये सध्या अनेक लहान-मोठ्या राजकीय गटांचे तगडे मोर्चेबांधणीचे प्रयत्न सुरू आहेत. अन्य पक्षही दिलीपभाऊंसारख्या लोकप्रिय नेतृत्वाला आपल्या गोटात खेचण्याची रणनीती आखत आहेत. निवडणूक म्हटली की पैसा आला आणि पक्षाकडून पैसा कोणाकडे येईल, कोण किती खर्च करेल, याच वादांमध्येच भाजपचे गट निवडणूक काळात निर्माण होतात आणि आजही आहेत. जर वेळेतच एक संघ, एक छत्र असलेले आणि सर्वांना मान्य असे नेतृत्व – विशेषतः दिलीपभाऊ वाघ यांच्यासारखे – भाजपाला मिळाले नाही, तर त्याचा थेट परिणाम पक्षाच्या पराभवावर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर भाजपने जर धोरणात्मक निर्णय घेण्यास उशिर केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका व वॉर्ड पातळीवर भाजपसाठी उमेदवार निवड, प्रचार तंत्र आणि जनतेशी नाळ जोडण्याच्या प्रक्रियेत अडथळे येण्याची शक्यता आहे. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांची जनाधाराची ताकद ही केवळ त्यांच्या वैयक्तिक प्रभावामुळे नाही, तर वाघ परिवाराने वर्षानुवर्षे जपलेल्या कार्यकर्त्यांच्या मजबूत संघटनेमुळे आहे. त्यांनी स्वतःच्या कुटुंबातून आणि कार्यकर्त्यांमधून अनेक उमेदवार घडवले आहेत. त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणे, म्हणजे एकाचवेळी शेकडो निष्ठावान कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत होणे. आज भाजपमध्ये स्थानिक पातळीवर पाचोरा व भडगाव तालुक्यासाठी स्वकर्तृत्व व नेतृत्व असलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या उणीवांची चर्चा खुलेपणाने केली जात आहे. अशावेळी जर दिलीपभाऊ वाघ यांचा प्रवेश निश्चित वेळेत झाला, तर तो पक्षासाठी एक नवा बळ निर्माण करणारा ठरेल. त्यामुळे पक्षाने या प्रवेश प्रक्रियेतील अनावश्यक विलंब टाळून तत्काळ तारीख आणि व्यासपीठ निश्चित करणे गरजेचे आहे. दिलीपभाऊंचा भाजपमध्ये प्रवेश म्हणजे आगामी नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा यांमधील निवडणुकांच्या दृष्टीने एक दूरदृष्टीपूर्ण निर्णय ठरेल. दिलीपभाऊ वाघ यांच्यावर केवळ त्यांच्या समर्थकांचा नाही, तर सामान्य नागरिकांचाही विश्वास आहे. त्यांनी वेळोवेळी आपल्या वक्तव्यांमधून, माध्यमांमधून लोकशाही विषयीची आपली निष्ठा स्पष्ट केली आहे. त्यांची कोणतीही राजकीय घाई नसून जनतेसाठी योग्य व्यासपीठाची निवड करण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. अशा नेतृत्वास जर भाजपने वेळेत स्वीकारले, तर संपूर्ण भागात एक नवा राजकीय स्फोट घडू शकतो, जो भाजप विरोधकांसाठी मोठा धक्का ठरू शकतो. भाजपचे स्थानिक कार्यकर्तेही या संभाव्य प्रवेशाकडे आशेने पाहत आहेत. अनेक वॉर्डांत कार्यकर्त्यांनी आपली रणनीती आधीच तयार ठेवली असून, दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वात लढा देण्यास उत्सुक आहेत. मात्र हा उत्साह जर वेळेत दिशा मिळाली नाही, तर तो हळूहळू नकारात्मकतेत बदलू शकतो. नेतृत्वाच्या पातळीवरच्या गोंधळाचा फटका थेट कार्यकर्त्यांच्या मनोबलाला बसतो आणि हेच मोठ्या पक्षासाठी घातक ठरते. भाजपने मागील काही वर्षांत पाचोरा-भडगावमध्ये मोठी कामगिरी केलेली नसली, तरी संघटनात्मक पातळीवर त्यांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. आता हा अस्तित्व टिकवण्याचा टप्पा नाही, तर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा टप्पा आहे. आणि तो टप्पा पूर्णत्वास नेण्यासाठी दिलीपभाऊ वाघ यांच्यासारखे मजबूत, सर्वसमावेशक, लोकाभिमुख आणि मतदारांशी जोडलेले नेतृत्व आवश्यक आहे. या प्रवेशात विलंब झाल्यास, तो एक राजकीय संधी व नेतृत्व गमावण्यासारखा ठरेल. भविष्यात जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला बहुमत मिळवायचे असेल, तर निर्णय क्षणाचाही विलंब न करता घेणे अत्यावश्यक आहे. कारण लोकशाहीत वेळेवर घेतलेला निर्णय हा विजयाचा पाया ठरतो आणि उशीर झालेला निर्णय केवळ पश्चातापास कारणीभूत ठरतो. एकंदर विचार करता, दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेश ही केवळ एक औपचारिक गोष्ट नसून, पाचोरा-भडगाव मतदारसंघातील राजकीय समीकरणात एक निर्णायक मोड ठरणार आहे. भाजपचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल, तर वेळ न घालवता हा ऐतिहासिक निर्णय तातडीने घेणे हेच पक्षहिताचे ठरेल. अन्यथा भाजपसाठी ही एक अपूर्ण घडी आणि गमावलेली संधी ठरू शकते, जी भविष्यातील निवडणुकांमध्ये मोठा धक्का ठरू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here