मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर, सनरायझर्स हैदराबादने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ला ११० धावांनी पराभूत केले. या विजयासह हैदराबादने हंगामाचा शेवट केला. रविवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकांत तीन गडी गमावून २७८ धावा केल्या. आयपीएलमधील ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात, कोलकाता संघ १८.४ षटकांत १६८ धावांवर बाद झाला. सनरायझर्सकडून जयदेव उनाडकट, इशान मलिंगा आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
या सामन्याने सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल २०२५ मधील प्रवास संपला. हैदराबादने १४ पैकी सहा सामन्यात विजय आणि सात सामन्यात पराभवासह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. दरम्यान, केकेआर पाच विजय आणि सात पराभवांसह आठव्या स्थानावर राहिला. हैदराबादने केकेआरला ११० धावांनी पराभूत करून त्यांचा दुसरा सर्वात मोठा विजय नोंदवला. यापूर्वी २०१९ मध्ये संघाने हैदराबादमध्ये आरसीबीला ११८ धावांनी पराभूत केले होते.
लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याच्या फलंदाजांना काही खास कामगिरी करता आली नाही. त्यांच्याकडून मनीष पांडेने सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली. याशिवाय हर्षित राणा ३४ धावा करून बाद झाला आणि सुनील नारायण ३१ धावा करून बाद झाला. दरम्यान, क्विंटन डी कॉक (९), अजिंक्य रहाणे (१५), रिंकू सिंग (९) आणि आंद्रे रसेल (०) हे हैदराबादच्या गोलंदाजांविरुद्ध प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. या सामन्यात रमनदीप सिंगने १३ धावा केल्या तर वैभव अरोरा खातेही उघडू शकला नाही. दरम्यान, अँरिक नॉर्टजे खाते न उघडता नाबाद राहिला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत हैदराबादने २० षटकांत तीन गडी गमावून २७८ धावा केल्या. त्यांच्यासाठी, उजव्या हाताच्या फलंदाज क्लासेनने १०५ धावांची सर्वाधिक नाबाद खेळी केली. त्याच वेळी, ट्रॅव्हिस हेड ४० चेंडूत ७६ धावा करून बाद झाला. केकेआरकडून सुनील नारायणने दोन आणि वैभव अरोराने एक विकेट घेतली.
या सामन्यात अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी सनरायझर्स हैदराबादला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ९२ धावांची भागीदारी झाली. सुनील नरेनने अभिषेकला आपला बळी बनवले. तो १६ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांसह ३२ धावा काढून बाद झाला. यानंतर, नरेनने ट्रॅव्हिस हेडला तंबूनचा रस्ता दाखवला. तो सहा चौकार आणि तितक्याच षटकारांसह ७६ धावा काढून बाद झाला. त्याने २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
कोलकाता विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात हेनरिक क्लासेन वेगळ्याच रंगात दिसला. त्याने फक्त ३७ चेंडूत शानदार शतक पूर्ण केले आणि एक मोठी कामगिरी केली. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा संयुक्त तिसरा फलंदाज ठरला. या बाबतीत त्याने २०१० मध्ये ३७ चेंडूत शतक झळकावणाऱ्या युसूफ पठाणची बरोबरी केली. या शानदार खेळीमुळे हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या रचली. यापूर्वी, संघाने राजस्थानविरुद्धच्या साखळी टप्प्यातील पहिल्या सामन्यात सहा विकेट गमावून २८६ धावा केल्या होत्या. या सामन्यात इशान किशनने २९ धावा केल्या तर अनिकेत वर्मा १२ धावा करून नाबाद राहिला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.