पाचोरा : -सध्याच्या काळात देशाच्या कणा असलेल्या शेतकऱ्यांचे जीवन अधिकच कठीण बनले असून, शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या पैशांसाठी त्यांना अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. पिकांची लागवड सुरू होण्याच्या तोंडावरच शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीडनाशके आणि इतर शेतीसाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीसाठी रोख रक्कमेची नितांत गरज असते. मात्र, पाचोरा शहरासह संपूर्ण तालुक्यातील बहुतांश एटीएम सेवा गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे बँकेतून पैसे काढणे अत्यंत कठीण झाले असून, याचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसत आहे.विशेष म्हणजे, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये शासकीय मदतीच्या, सोसायट्यांच्या किंवा पीककर्जाच्या माध्यमातून रक्कम जमा झाली आहे. मात्र, ती रक्कम प्रत्यक्षात मिळवण्यासाठी त्यांना बँकेच्या शाखांमध्ये दीर्घ रांगा लावाव्या लागत आहेत किंवा बंद एटीएमपुढे रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. काही शेतकऱ्यांनी तर पैसे काढण्यासाठी १० ते १५ किलोमीटरचा प्रवास करून दुसऱ्या गावातील बँकांमध्ये धाव घेतली आहे, पण तिथेही कधी कॅश नसते, तर कधी नेटवर्क नाही. परिणामी, शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर आता पत्रकार बांधवांनी आपल्या संघटना गत तट बाजूला सारून एकत्र येऊन या गंभीर प्रश्नाला वाचा फोडण्याचा निर्धार केला आहे. सध्या बातम्या संकलित करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकजूट होण्याची गरज असल्याचे स्पष्ट करत, पत्रकारांना संघटना, गट-तट, मतभेद यापलीकडे जाऊन एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाचोरा शहरातील पत्रकारांनी ठरवले आहे की, केवळ बातम्यांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरून, आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज शासनदरबारी पोहोचवला जाईल.या आंदोलनाचा प्रारंभ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन करण्यात येणार आहे. २९ मे गुरुवारी सकाळी ११ वाजता सर्व पत्रकारांनी या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालय व पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांना निवेदन सादर करण्यात येईल. निवेदनाद्वारे शहरातील सर्व बंद एटीएम तातडीने सुरु करण्याची मागणी केली जाईल. तसेच, एक आठवड्याच्या आत ही एटीएम सेवा पूर्ववत झाली नाही, तर त्या त्या बँकेच्या बंद एटीएमवर अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात येणार आहे.या निषेधात बंद एटीएमवर ढोल-ताशांच्या गजरात पुष्पहार अर्पण करून संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाला बँकेत जाऊन एटीएम सेवा तात्काळ सुरू कराव्या यासाठी गुलाबपुष्प देत विनंती करण्यात येणार आहे या आंदोलनामागे कुठलाही राजकीय हेतू नसून, हा शुद्ध सामाजिक आणि जनहितार्थ उपक्रम असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. बँकिंग सुविधा बंद ठेवणे हे केवळ तांत्रिक अडचण नसून, शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळणारे कृत्य आहे. शहरातील व तालुक्यातील इतर सामाजिक संस्था, कार्यकर्ते, शेतकरी संघटना, व्यापारी संघटना आणि विद्यार्थ्यांनी देखील या आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. पत्रकारांनी जर एकत्रितपणे आवाज उठवला, तर प्रशासन आणि बँका निश्चितच जागरूक होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उद्या २९ मे रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे, ही नम्र विनंती आयोजकांनी केली आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.