आयपीएल २०२५ – क्वालिफायर-२ मध्ये मुंबई इंडियन्सचा सामना पंजाबशी होणार; गुजरात टायटन्सचा प्रवास संपला

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव केला. या विजयासह हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघ क्वालिफायर-२ मध्ये पोहोचला आहे. आता १ जून रोजी अहमदाबादमध्ये पंजाब किंग्जशी त्यांचा सामना होईल. शुक्रवारी न्यू चंदीगडमध्ये खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकांत पाच गडी गमावून २२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातला निर्धारित षटकांत सहा गडी गमावून फक्त २०८ धावा करता आल्या. त्यांच्याकडून साई सुदर्शनने ८० धावा केल्या.
गुजरातची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार शुभमन गिलला फक्त एक धाव करता आली. त्याला ट्रेंट बोल्टने त्याचा बळी बनवले. त्यानंतर खेळपट्टीवर आलेला कुशल मेंडिस हिट विकेटने बाद होत तंबूमध्ये परतला. त्याने साई सुदर्शनसोबत ३४ चेंडूत ६४ धावांची भागीदारी केली. यामध्ये मेंडिसने २० धावांचे योगदान दिले. त्यानंतर सुदर्शनला वॉशिंग्टन सुंदरची साथ मिळाली. दोघांमध्ये ४४ चेंडूत ८४ धावांची भागीदारी झाली. सुंदरने ४८ आणि सुदर्शनने ८० धावा केल्या. त्याच वेळी रुदरफोर्डने २४, शाहरुख खानने १३ धावा केल्या. राहुल तेवतिया १६ आणि रशीद खान खाते न उघडता नाबाद राहिले. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्टने दोन बळी घेतले तर जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन, मिशेल सँटनर आणि अश्विनी कुमार यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
त्यापूर्वी, रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो यांच्या सलामी जोडीने मुंबईला जलद सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी झाली. साई किशोरने या सामन्यात पदार्पण करणाऱ्या बेअरस्टोला जेराल्ड कोएत्झीकरवी झेलबाद केले. तो २२ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४७ धावा काढल्यानंतर बाद झाला. त्यानंतर रोहितला सूर्यकुमार यादवची साथ मिळाली. दोघांनी ३४ चेंडूत ५९ धावा जोडल्या. यादरम्यान सूर्यकुमारने २० चेंडूंचा सामना केला आणि ३३ धावा करून तंबूमध्ये परतला.
या सामन्यात रोहित शर्माने २८ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. याशिवाय, त्याने आयपीएलमध्ये ३०० षटकारही पूर्ण केले. तो आयपीएलमध्ये ३०० षटकारांचा टप्पा गाठणारा पहिला सक्रिय खेळाडू ठरला. आता त्याच्या नावावर ३०२* षटकार आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. हिटमनने तिलक वर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी २२ चेंडूंमध्ये ४३ धावा जोडल्या. माजी कर्णधाराने ५० चेंडूंमध्ये नऊ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या. तिलकने ११ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या आणि नमन धीर नऊ धावा करून बाद झाला. हार्दिक पंड्या नऊ चेंडूंमध्ये तीन षटकारांच्या मदतीने २२ धावा करून नाबाद राहिला तर सँटनर खाते न उघडता नाबाद राहिला. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णा आणि साई किशोरने प्रत्येकी दोन बळी घेतले तर मोहम्मद सिराजला एक यश मिळाले.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here