पाचोरा – महाराष्ट्रात संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा कायदा प्रभावीपणे लागू असतानाही, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सर्रासपणे गोवंश हत्या व तस्करीच्या घटना समोर येत असल्याने गोरक्षक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः बदलापूर, पडघा (भिवंडी), मालेगाव (जि. नाशिक), अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, धुळे, धाराशिव, सोलापूर, नांदेड, बीड, जालना या जिल्ह्यांमध्ये गोवंश हत्या थांबण्याचे नाव घेत नसून, ही हत्या आणि तस्करी खुलेआम सुरू असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
यासोबतच, राज्याच्या सीमावर्ती भागांमध्ये – विशेषतः तेलंगणा व कर्नाटकच्या सीमांवर – गोवंश तस्करीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर गोरक्षक संघटनांचे कार्यकर्ते आपल्या जिवावर उदार होऊन गोवंश रक्षणासाठी मैदानात उतरलेले असताना, त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करून त्यांना छळले जात असल्याचे गंभीर आरोप विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहेत.
या विषयासंदर्भात पाचोरा शहर व ग्रामीण भागातील विहिप व बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी अचानक पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर केले असून, त्यामध्ये आगामी ७ जून २०२५ रोजी साजरी होणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, पाचोरा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, वरखेडी येथे सध्या खुलेआम गोवंशाची खरेदी-विक्री केली जात असून, या खरेदीचा उद्देश थेट गोहत्येसाठीच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या बाजारावर तातडीने कारवाई करत गोवंशाची तस्करी व गोहत्या थांबवाव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
या अनुषंगाने विहिप मंत्री योगेश सोनार, बजरंग दल प्रखंड संयोजक बंटी पाटील, विहिप प्रखंड गोरक्षा प्रमुख राहुल मधुकर पाटील, विहिप प्रचार प्रसार प्रमुख योगेश पाटील तसेच गोरक्षा क्षेत्रातील कार्यकर्ते गौरव पाटील, जीतू लोणारी, बंडू पांचाल, सोपान शिपी, जय बागुल, आकाश पाटील, रोहित पाटील, गोकुल पाटील, दक्ष पाटील, दिनेश भोई, प्रमोद वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी ध्येय न्युजशी बोलताना योगेश सोनार यांनी सांगितले की, “महाराष्ट्र सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आहे, परंतु अंमलबजावणीच्या पातळीवर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. शासकीय यंत्रणा व पोलीस प्रशासन यांची गोरक्षणाबाबत उदासीनता दिसून येत असून, यामुळेच गोवंश तस्करीचा सुळसुळाट झाला आहे. आम्ही सरकारकडे मागणी करतो की, गोवंश रक्षणासाठी स्वतंत्र व विशेष पथके स्थापन करून या तस्करीला आळा घालावा.”
बंटी पाटील यांनी सांगितले की, “गोरक्षक कार्यकर्ते जिवाची पर्वा न करता गोवंश रक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले जातात. यामुळे गोरक्षकांचा मनोबल खचत आहे. शासनाने याची गंभीर दखल घेऊन गोरक्षकांवर होणारे खोटे गुन्हे मागे घ्यावेत आणि त्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी.”
राहुल मधुकर पाटील यांनी सांगितले की, “गोवंश तस्करीसाठी आजही अनेक ठिकाणी मालवाहतूक वाहनांचा सर्रास वापर केला जात आहे. हे सर्व थांबवायचे असेल तर बाजार समिती परिसरात विशेष पथक तैनात करून गोवंशाची हालचाल त्वरित थांबवणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस अधीक्षकांनी थेट लक्ष घालणे गरजेचे आहे.”
तसेच, आकाश पाटील, गोकुल पाटील, प्रमोद वाघ आणि रोहित पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “गोहत्या व गोवंश तस्करी ही फक्त धार्मिक भावना दुखावणारी बाब नाही, तर ही कायद्याला आव्हान देणारी, सामाजिक सलोखा बिघडवणारी व पर्यावरणावरही परिणाम करणारी गंभीर बाब आहे. ही केवळ गोरक्षकांची लढाई नाही, तर समाजाच्या अस्मितेची लढाई आहे.”
गोरक्षक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन सादर करत बकरी ईदपूर्वी विशेष गस्त, तपासणी मोहिमा राबवाव्यात, वाहनांमध्ये होणाऱ्या गोवंश वाहतुकीवर बंदी आणावी आणि वरखेडी बाजार समितीमध्ये सुरु असलेल्या गोवंश खरेदी-विक्रीवर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.
गोरक्षक संघटनांच्या या मागणीकडे प्रशासन गांभीर्याने पाहते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, सर्वसामान्य जनतेनेही यासंदर्भात जागरूक राहून प्रशासनास सहकार्य करणे हे सामाजिक जबाबदारीचे लक्षण ठरेल. गोवंश रक्षण ही धर्मभावनेशी संबंधित बाब असून, त्याचे पालन ही सरकारची व प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे, हे विसरता कामा नये.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.