मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दादरच्या राजा शिवाजी विद्या संकुल येथे १५ जून २०२५ रोजी “मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६वे कविसंमेलन भारावलेल्या वातावरणात, अत्यंत रसाळ आणि भावस्पर्शी स्वरूपात संपन्न झाले.
या कविसंमेलनाचे नेमके, प्रवाही आणि रसिकांशी संवाद साधणारे सूत्रसंचालन प्रभावी शैलीत विक्रांत लाळे यांनी केले. प्रत्येक कवीच्या सादरीकरणापूर्वी केलेली ओळख, विषयाची पार्श्वभूमी आणि रसिकांची संवेदना जागवणारे शब्द यामुळे संपूर्ण संमेलनात सातत्य आणि ओघ निर्माण झाला.
कार्यक्रमाचे आयोजन तीन विशेष सत्रांमध्ये करण्यात आले होते — पाऊस, जागतिक पितृदिनानिमित्त ‘बाबा’ आणि मुक्त विषय. या तिन्ही सत्रांमध्ये सहभागी कवींसोबत रसिकांनीही शब्दांच्या सरींत चिंब भिजण्याचा आनंद लुटला. विशेष म्हणजे “पाऊस” या सत्रात कविता सादर होत असतानाच खऱ्याखुऱ्या पावसाने आपली साक्ष देत उपस्थित राहून काव्याचे आभाळच भरून टाकले. कार्यक्रम संपेपर्यंत थोडी विश्रांती घेतलेल्या या आभाळरुपी श्रोत्याने, सारे कवी-रसिक सुखरूप घरी पोहोचल्यावरच आपल्या थेंबांच्या टाळ्यांनी कवितांना सलामी दिली!
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर येथून आणि पुण्याहूनही विशेष कवी उपस्थित होते, ज्यांनी आपल्या शब्दांनी संमेलनात नवीन सूर मिसळले. डॉ. मानसी पाटील, प्रा. स्नेहा केसरकर, अशोक दामोदर कुलकर्णी (पुणे), कल्पना दिलीप मापूसकर, कल्पना निलेश सांगळे, किशोरी शंकर पाटील, जयश्री हेमचंद्र चुरी, एकनाथ शेडगे, सरोज लट्टू, स्मिता शाम तोरसकर, आश्विनी सोपान म्हात्रे, संतोष धर्मराज मोहिते, अशोक (भाई) पुंडलीक नार्वेकर, विक्रांत मारूती लाळे, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, रविंद्र शंकर पाटील, सुचित्रा अरुण टिपणीस या सर्व कवींनी आपल्या शैलीतून भावना उलगडत रसिकांशी संवाद साधला. विशेष उल्लेखनीय म्हणजे नितीन सुखदरे आणि सनी आडेकर यांनी त्यांच्या मनातील “बाबा” सर्वांसमोर प्रभावीपणे सादर करून कार्यक्रमात भावनिक रंग भरले. कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी श्री. लट्टू, शैलेश नाबर आणि बालकवी वेदान्त यशवंत पंडित उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी साहित्य कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर, शोध आनंदाचा फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सुखदरे, सचिव सनी आडेकर, तसेच विक्रांत लाळे, रविंद्र पाटील आणि किरण जाधव यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या एकत्रित नियोजनामुळे हे कविसंमेलन केवळ एक कविसंमेलन न राहता, एक भावपूर्ण आणि संस्मरणीय अनुभव ठरला. त्यांच्या नेतृत्वामुळे संमेलनाला एक सुसंस्कृत, समर्पित आणि सर्जनशील चौकट लाभली. साहित्यसेवेचा व संवेदनशील दृष्टिकोनाचा प्रभाव संमेलनाच्या प्रत्येक टप्प्यावर अनुभवायला मिळाला.
साहित्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी अशी की, १७वे कविसंमेलन येत्या १३ जुलै २०२५ रोजी दादर येथेच होणार आहे. काव्यरसिकांनी आपल्या दिनदर्शिकेत ही तारीख नोंद करून, पुन्हा एकदा या शब्दोत्सवात सामील होण्याची संधी गमावू नये!
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.