पाचोऱ्यात खंडणीप्रकरणी किशोर रायसाकडासह तिघांवर गुन्हा दाखल; पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह इतरांची चौकशी सुरू

0

पाचोरा – शहरात काही व्यक्तींनी पत्रकार संघटनेच्या पदांचा उपयोग करत व्यावसायिकांकडून आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, या प्रकरणात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, राकेश सुतार (रा. शिंदाड), कुंदन बेलदार (रा. भातखेंडे) आणि अन्य एका व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता (BNS 2023) अंतर्गत खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार आणि प्राथमिक चौकशीनंतर संबंधित आरोपींविरोधात BNS 2023 अंतर्गत कलम 308(2), 118(1), 115(2), 351(2), 352, आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील तपास पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अनेक दिवसा पासुन काही व्यक्तींनी पत्रकार संघटनांच्या नावाखाली कार्यक्रम, पुरस्कार, कार्यशाळा, सन्मान अशा माध्यमातून काही ठिकाणी निधी संकलनाचा प्रयत्न केल्याच्या तक्रारी होत्या
शहरात यापूर्वीही काही घटनांमध्ये पत्रकार म्हणून ओळख निर्माण करून काही लोकांनी समाजमाध्यमांवर ब्रेकिंग बातम्यांच्या नावाने दबाव निर्माण केल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
या कारवाईनंतर व्यापारी व व्यावसायिक वर्गामध्ये दिलासा व्यक्त होत असून, पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले आहे. पाचोरा, भडगाव, पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांत चिंता निर्माण झाली होती.
पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी सांगितले की, “कोणतीही व्यक्ती पत्रकार असल्याचा दावा करत असल्यास त्याची अधिकृत ओळख व मान्यता तपासली जाईल. कोणीही गैरमार्गाने निधी उकळण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याविरोधात त्वरित कारवाई केली जाईल.”
या घटनेबाबत पाचोरा शहरातील पत्रकार संदिप महाजन यांनी प्रतिक्रिया देतांना सांगीतले “खऱ्या पत्रकारांनी जनतेचा विश्वास मिळवलेला असतो. अशा काही व्यक्तींच्या कृत्यामुळे संपूर्ण व्यवसायावर संशय निर्माण होतो, जे दुर्दैवी आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईने खरी पत्रकारिता व जनतेचा विश्वास अबाधित राहणार आहे” असे ते म्हणाले. या प्रकरणी चौकशी सुरू असून, संबंधित व्यक्तींच्या संपर्कात असलेले अन्य मंडळी, सोशल मीडिया ग्रुप्सवरील सहभाग, संभाव्य आर्थिक व्यवहार, आणि वापरलेली GP / PP याबाबत तपास सुरू आहे. ऑनलाईन व्यवहारांची तपासणीही केली जावी अशी मागणी होत आहे.
लोकशाहीतील चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकार व्यवसायात पारदर्शकता व विश्वास राखणे महत्त्वाचे असते. काही व्यक्ती त्या भूमिकेचा गैरवापर करत असल्यास कायद्याची कारवाई अपरिहार्य ठरते. पाचोरा पोलीस प्रशासनाने घेतलेली भूमिका ही सामाजिक जबाबदारीतून प्रेरित असून, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here