पाचोऱ्यात बोगस पत्रकारांची ‘पोटभरू गँग’; वैयक्तिक वाटस्अ‍ॅप गटांतून गलिच्छ हल्ल्यांची नवी यंत्रणा

0

Loading

पाचोरा- शहरात सध्या एक वेगळ्याच स्वरूपाचा आणि समाजविघातक प्रकार मूळ धरतो आहे — तो म्हणजे स्वतःला पत्रकार म्हणवून घेणाऱ्या तथाकथित पोटभरू लोकांची एक ‘गँग’ निर्माण झालेली आहे. या गटाचा पत्रकारितेशी काहीही संबंध नाही, ना हे लोक कोठल्याही अधिकृत माध्यमाचे प्रतिनिधित्व करतात, पण त्यांच्याकडे मोबाइल, एक बनावट ‘प्रेस’ लोगो, सोशल मीडियावर काही बोगस चॅनल्स आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे वैयक्तिक WhatsApp गट आहेत. आणि या ग्रुपचाच वापर करून ही गँग सामान्य माणसांवर, सामाजिक कार्यकर्त्यांवर, राजकीय विरोधकांवर आणि इतर मतप्रदर्शन करणाऱ्या लोकांवर गलिच्छ हल्ले करण्याचा उद्योग मोठ्या बिनधास्तपणे चालवत आहे. या ग्रुपमध्ये अनेक लोकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध, जबरदस्तीने समाविष्ट केले जाते. कोणालाही ‘अ‍ॅड’ करणे, त्यांची वैयक्तिक माहिती मागवणे, आणि मग त्यांच्या विरोधात ‘कथित पोस्ट’ तयार करून सगळ्यांसमोर त्यांची बदनामी करणे, हा या गँगचा मुख्य कार्यक्रम असतो. आणि या सगळ्या प्रकारात यांचं पत्रकारितेशी कोणतंही दूरदृष्टीचं नातं नाही, उलट ‘पत्रकार’ ही ओळख या गलिच्छ हल्ल्यांना एक भेसूर स्वरूप देत आहे.
जे कोणी या गटाची कार्यपद्धती, पोस्ट्स किंवा उद्देशांचा निषेध करतात, त्यांच्यावर अत्यंत अश्लील, घाणेरड्या, वैयक्तिक आणि कमी दर्जाच्या शब्दांत टीका केली जाते. त्यांना सामाजिकदृष्ट्या अपमानित करण्याचा पुरेपूर प्रयत्न होतो. विशेष म्हणजे, ही टीका केवळ व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही, तर वेळप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांवरसुद्धा खालच्या स्तरावरील आरोप लावले जातात.या घाणेरड्या लेखनातून कोणीही सुटत नाहीत. हे वाचून या लोकांच्या संस्कृतीची, त्यांच्यातील मानसिक निकृष्टतेची आणि पत्रकारितेच्या पवित्रतेला त्यांनी दिलेल्या तडजोडीची कल्पना येते.
या प्रकारामागे एक विषारी मानसिकता कार्यरत आहे — लोकांच्या आत्मसन्मानावर हल्ला करणे, त्यांना मानसिक त्रास देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात त्यांचं चित्र विकृत करणे. हाच या तथाकथित गँगचा खरा हेतू असतो. कारण यांना कोणतीही सामाजिक प्रतिष्ठा नाही, कोणताही वैचारिक पाया नाही आणि समाजासाठी काही करण्याची इच्छाही नाही. त्यामुळे अशा व्यक्ती जेव्हा कोणी उभं राहतं, मत मांडतं, चांगलं कार्य करतं, तेव्हा या बोगस पत्रकारांच्या गँगला असुरक्षित वाटतं. त्यातूनच ही हल्लेखोर मानसिकता उफाळून येते. या ग्रुपमधील लोकांची एक गंमतीशीर गोष्ट म्हणजे — जेव्हा ते कोणावर हल्ला करतात, तेव्हा त्या व्यक्तीची अनुपस्थितीच त्यांचा मुख्य आधार असतो. म्हणजेच, ते पद्धतशीरपणे खात्री करून घेतात की संबंधित व्यक्ती त्या ग्रुपचा भाग नाही. जेणेकरून ती व्यक्ती उत्तरही देऊ शकणार नाही, त्याची बाजू कोण मांडणार, आणि मग या गँगला वाटते की “आपण विजय मिळवला.” पण खरं सांगायचं तर ही सगळी रणनीती म्हणजे फक्त नालायकपणाची कबुली आहे. कारण जे कोणी समोर न येता, कोणा व्यक्तीच्या अनुपस्थितीत त्याच्या विरोधात शाब्दिक गलिच्छता पसरवत असतील, ते मानसिकदृष्ट्या कमजोर आणि नीतीहीनच म्हणावे लागतील.पाचोरा शहरात अनेक चांगले, शांतपणे जीवन जगणारे, सामाजिक कार्य करणारे आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने विचार करणारे लोक आहेत. परंतु असे काही लोक जेव्हा अशा गटांची पोस्ट वाचतात, तेव्हा ‘मनोरंजन’ म्हणून किंवा ‘गॉसिप’ म्हणून त्यावर हसतात हे आणखी घातक आहे. कारण यामुळे त्या गलिच्छ वृत्तीच्या लोकांना अजून उभारी मिळते. त्यांना वाटते की “आपण काहीतरी लोकांमध्ये चर्चिला जातोय, मजा येतेय.” आणि तेच पुढचे इंधन बनते, या गॅंगच्या गलिच्छ मोहिमांसाठी.
    पण हे विसरू नका की, आज आपण एखाद्याच्या चारित्र्यावर, कुटुंबावर किंवा प्रतिष्ठेवर हसत असाल, पण उद्या आपल्यावरही तेच होऊ शकते. कारण या बोगस गँगला ना कोणाशी बांधिलकी आहे, ना कोणती सीमा. ते फक्त ‘कुणाच्या विरोधात, कधी, कसं भांडायचं’ हे ठरवतात आणि मग त्यांच्या खालच्या पातळीच्या लेखणीचा मारा सुरू होतो. त्यामुळे ‘मनोरंजन’ म्हणून अशा पोस्ट्सकडे पाहणं म्हणजे समाजाच्या नैतिक अधःपतनाला खतपाणी घालणं आहे.
अनेकदा असे लोक जे समाजात चांगली कामं करत असतात, आपले विचार, मतं नेटाने मांडतात, ते या बोगस गँगच्या टार्गेटवर असतात. पण हे लक्षात घ्यायला हवं की, जेव्हा आपण चिखलात दगड मारतो, तेव्हा थोडेफार शिंतोडे आपल्यावरही उडतातच. त्यामुळे अनेक भले लोक या चिखलात उतरणं टाळतात. ‘दृष्टिआड-सृष्टिआड’ म्हणून अशा गँगकडे दुर्लक्ष केलं जातं. परंतु या मानसिकतेतून बाहेर यायला हवं. कारण ‘चांगला सुगंध येण्यासाठी चिखल कोणी तरी साफ केला पाहिजेच.’
   आज पाचोऱ्यासारख्या समृद्ध, विचारशील आणि सांस्कृतिकदृष्ट्या उन्नत गावात जर अशी बोगस पत्रकारांची गँग कार्यरत असेल, तर तो संपूर्ण समाजासाठी धोक्याचा इशारा आहे. कारण यामध्ये ना केवळ सामाजिक समतेचा, मान-सन्मानाचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपमान होतो, तर पिढ्यानपिढ्याच्या मूल्यांचाही र्‍हास होतो. पत्रकारिता म्हणजे सत्य मांडणं, तथ्य मांडणं, जबाबदारीने संवाद साधणं. पण या तथाकथित पत्रकारांची भाषा, शैली आणि पातळी बघितली तर ते ना कोणत्याही पत्रकारी नैतिकतेच्या निकषांवर उतरत नाहीत, ना समाजासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे त्यांच्यावर केवळ उपहास नाही, तर ठोस निषेध आणि कायदेशीर पावलं उचलण्याची गरज आहे.
   यासाठी समाजातील सुज्ञ, सजग आणि सज्जन व्यक्तींनी एकत्र येऊन अशा गँगचं जाहीरपणे विरोध करणं, त्यांच्या ग्रुपमधून बाहेर पडणं, त्यांच्या पोस्ट्सना महत्व न देणं आणि संबंधित यंत्रणांकडे लेखी तक्रारी करणं गरजेचं आहे. तसेच, खऱ्या पत्रकारांनी, माध्यमांनी आणि पोलीस प्रशासनाने एकत्र येऊन अशा बोगस पत्रकारांच्या आड येणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर वावरणाऱ्या अशा टोळ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर डिजिटल गुन्ह्यांखाली कडक कारवाई झाली पाहिजे.
  कारण पत्रकारिता ही एक ‘स्वार्थाचा धंदा’ नसून ‘सत्याची सेवा’ आहे — आणि ही सेवा जर अशा गलिच्छ गँगकडे सोपवली गेली, तर ती सेवा उरतेच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here