पाचोरा- पत्रकारिता ही समाजाच्या आरशासारखी असते, ती सत्य दर्शवते, अन्यायाविरुद्ध आवाज उठवते आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या रूपाने जनतेच्या हितासाठी कार्य करते. मात्र पाचोऱ्यात अलीकडील काळात या पवित्र क्षेत्रात ब्रेकींग टाकून पोलभरू अशा भुरट्या लोकांचा शिरकाव झाला आहे की, त्यांना पाहून खरे पत्रकार सुद्धा लाजेनं मान खाली घालतात. पत्रकार संघटनेच्या नावाखाली कार्यरत असणाऱ्या काही तथाकथित पदाधिकाऱ्यांनी पत्रकारितेचा मुखवटा घालून प्रत्यक्षात ब्लॅकमेलिंग, खंडणी व दहशतीचा बाजार मांडला आहे. पत्रकार संघटनेचा पदाधिकारी असणे म्हणजे पत्रकार असणे नव्हे. एखादा व्यक्ती कोणत्याही पत्रकार संघटनेत पदाधिकारी झाला, याचा अर्थ असा होत नाही की त्याला पत्रकारितेचे नीतीमूल्य, चौकस अभ्यास, सत्यशोधक वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी आहे. पत्रकार होण्यासाठी आवश्यक असतो तो माध्यमाचा अभ्यास, लेखन कौशल्य, सत्यतेवर आधारित विश्लेषण, समजूतदार संवाद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकहितासाठी कार्य करण्याची जबाबदारी. परंतु पाचोऱ्यात अलीकडे असे अनेक प्रसंग समोर येत आहेत की, जेथे पत्रकार हे केवळ एक टॅग बनले आहे, तर प्रत्यक्षात त्यामागे लपलेली असते ती आर्थिक शोषणाची, राजकीय सौदेबाजीची, आणि सामाजिक अराजक माजवण्याची अघोरी वृत्ती.
पाचोऱ्यात काही तथाकथित पत्रकार, ज्यांना ना पत्रकारितेचे शिक्षण आहे ना पत्रकार क्षेत्रातील कसोटी गाठलेली आहे, त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ‘पत्रकार’ या ओळखीचा दुरुपयोग करण्याचा नवा धंदा सुरू केला आहे. पत्रकार परिषदांमध्ये उपस्थित राहणे, राजकीय, प्रशासकीय कार्यक्रमांत शिरकाव करणे आणि नंतर त्यातून फायद्याचे व्यवहार साधणे हेच यांचे प्रमुख उद्दिष्ट असते. एखाद्या सामान्य घटनेला विकृत रूप देऊन त्यावर बनावट,ब्रेकिंग, अतिशयोक्त, अथवा अर्धसत्य बातम्या तयार केल्या जातात. नंतर त्याच बातम्यांवरून संबंधितांवर दबाव आणून, “बातमी थांबवू का?” किंवा “तुमच्यावरील आरोप सौम्य करून देऊ का?” अशा पद्धतीने पैसे उकळले जातात. यामागे कोणतेही पत्रकारितेचे तत्त्व नसून केवळ ब्लॅकमेलिंगचा उद्देश असतो. वास्तविक, पत्रकार परिषद म्हणजे विविध मुद्यांवर माध्यमांसमोर माहिती देण्याचे एक व्यासपीठ. या व्यासपीठावर खरे पत्रकार जेव्हा जाणीवपूर्वक प्रश्न विचारतात, विश्लेषण करतात, तेव्हा जनतेपर्यंत सत्य पोहचते. परंतु पाचोऱ्यात अशा तथाकथित पत्रकारांची संख्या वाढली आहे की, जे ना प्रश्न विचारतात ना माहितीचे महत्त्व समजतात. त्यांच्या उपस्थितीचा उद्देश केवळ फोटो काढणे, नंतर त्याच फोटोवर ‘मी पत्रकार’ असा दर्पाने उल्लेख करणे, आणि त्यातून समाजात एक खोटे वलय निर्माण करणे इतकाच असतो. खरे पत्रकार त्याच परिषदांमध्ये बसताना लाज वाटते की, “या मंडळींच्या शेजारी आपणही आहोत” असे वाटून आत्मग्लानी निर्माण होते. पत्रकार क्षेत्रात असा अपमानास्पद प्रसंग येणे ही एक मोठी शोकांतिका आहे. तथाकथित पत्रकार संघटनांची निर्मिती सुद्धा आता एक स्वतंत्र यंत्रणा बनली आहे. यातील अनेक संघटना निव्वळ स्वतःच्या स्वार्थासाठी, पद मिळवण्यासाठी, किंवा राजकीय-सामाजिक प्रभाव दाखवण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत. या संघटनांमध्ये निवडणुका होत नाहीत, पद् नियुक्तीचे नियम नाहीत, कोणतेही तपशीलवार कार्य नाही. केवळ काही स्वयंघोषीत नावे, पद, बॅनर, आणि प्रेसकार्ड तयार करून एकमेकांचे पाठीशी देत गट निर्माण केले जातात. यातील अनेक संघटनांच्या बैठकीत “प्रसिद्धीसाठी काहीतरी करून दाखवू” असे बिनबुडाचे प्रस्ताव घेतले जातात. हेच तथाकथित संघटित लोक आज प्रशासकीय अधिकारी, व्यापारी, शासकीय कर्मचारी, राजकीय नेते यांच्या मागे लागून त्यांना ब्लॅकमेल करताना दिसतात. त्यांच्याकडे काहीच पुरावे नसतात, पण “तुमच्याबद्दल लिहून टाकू”, आम्हाला वैयक्तिक काहीच नको संघटनेला द्या ,”फेसबुकवर लाइव्ह जाऊ”, “यूट्यूबवर अपलोड करू” अशा धमक्यांनी ते पैसा, सवलती, मदतीसाठी आग्रही होतात.
पत्रकारिता ही ‘कोणीही करू शकतो’ असा व्यवसाय नव्हे. ही एक संवेदनशील, अभ्यासपूर्ण आणि मूल्याधारित प्रक्रिया आहे. पत्रकार होण्यासाठी केवळ मोबाईल, मायक्रोफोन, किंवा प्रेसकार्ड पुरेसे नाही. पत्रकाराला विषयाचे अध्ययन, समाजातील चालू घडामोडींचे भान, घटनांचे विश्लेषण, आणि भाषा, शिस्त यांचे भान असणे आवश्यक असते. तेव्हा फक्त पत्रकार संघटनेचा पदाधिकारी असण्यामुळे कोणीही ‘पत्रकार’ होऊ शकत नाही. त्याला त्या पदासाठी पात्र ठरण्यासाठी काही गोष्टी अनिवार्य आहेत – जसे की, माध्यम क्षेत्रात कामाचा अनुभव, कोणत्याही मान्यताप्राप्त माध्यमासाठी केलेले लेखन, संवाद कौशल्य, आणि पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांची निष्ठा.
पाचोरा हे एक ऐतिहासिक, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे. या शहरात खरे पत्रकार मोठ्या मेहनतीने, वर्षानुवर्षे काम करत आले आहेत. त्यांनी पाचोऱ्यातील समस्यांवर अभ्यासपूर्ण लेख लिहिले आहेत, लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला आहे, आणि समाज जागृती घडवून आणली आहे. परंतु अलीकडील काळात फक्त स्वार्थासाठी निर्माण झालेल्या पत्रकार संघटनांनी आणि त्यातील स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांनी हे क्षेत्रच बदनाम करून टाकले आहे. पत्रकारिता क्षेत्राच्या या ऱ्हासाला केवळ माध्यमच नव्हे, तर समाजही जबाबदार आहे. कारण अनेकदा समाज देखील या तथाकथित पत्रकारांना ‘अरे पत्रकार आहेत बरं का’ असे म्हणत त्यांच्या मागे वळवळतो, त्यांना मान देतो, आणि त्यांच्या चुकीच्या कृत्यांना विरोध करण्याऐवजी थांबवण्याऐवजी अधिक सशक्त बनवतो. अशा प्रकारच्या व्यक्तींवर कारवाई करणे, हे स्थानिक प्रशासन आणि पोलिस विभागाचे काम आहे. पत्रकारितेचा मुखवटा घालून खंडणी मागणाऱ्यांविरोधात भारतीय दंड विधानांतर्गत कठोर शिक्षेची तरतूद आहे. पाचोऱ्यातही अलीकडे काही प्रकरणे समोर आली आहेत, जिथे अशा पत्रकार संघटनांतील पदाधिकाऱ्यांवर खंडणीच्या गुन्ह्यांत कारवाई झाली आहे. मात्र ही कारवाई अपवादात्मक असून त्यात सातत्य असणे आवश्यक आहे. यासाठी पत्रकार महासंघ, राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पत्रकार संघटना आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे कार्यवाही करणे गरजेचे आहे. खरे पत्रकार कोण, त्यांच्या संस्था काय आहेत, त्यांना कोणत्या माध्यमाचे प्रतिनिधित्व आहे याबाबत सुस्पष्ट निकष आणि मान्यता पद्धत राबवली पाहिजे.
या साऱ्या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते – पत्रकारिता क्षेत्राने आता स्वतःचा आत्मपरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. जर या क्षेत्रातील व्यक्तीच एकमेकांवर अविश्वास दाखवतील, तर समाज या क्षेत्रावर कसा विश्वास ठेवणार? तरीसुद्धा खरे पत्रकार आजही न थकता, न डगमगता आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. त्यांनी या भुरट्या पत्रकारांपासून स्वतःचा वेगळा आवाज आणि ओळख राखण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर, समाजानेही खऱ्या पत्रकाराचा सन्मान आणि खोट्याची निर्भत्सना करण्याची शिकवण अंगीकारली पाहिजे. पाचोऱ्यात सध्या पत्रकारितेचा गोंधळ उडाला असला, तरी या क्षेत्राची खरी मूल्ये आणि कार्यधारणा अबाधित ठेवण्यासाठी समाज, माध्यम, आणि प्रशासन यांनी मिळून पुढाकार घेतल्यास या ब्लॅकमेलिंगवाल्यांचे दिवस भरत नाही. कारण शेवटी खोटं कितीही गोंडस वाटले, तरी ते टिकत नाही आणि खरे कितीही दबले तरी शेवटी समोर येतेच.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.