पाचोरा – कोणतीही संस्था ही शिक्षणक्षेत्रातील असो, आर्थिक व्यवहारांची असो वा सामाजिक सेवाभावी कार्यात गुंतलेली असो, तिची खरी ओळख ही तिच्या पारदर्शक कारभारातून, जबाबदारीने घेतलेल्या निर्णयांतून आणि सर्वसमावेशक नेतृत्वातून घडते. जर एखादी संस्था प्रगतीपथावर आहे, तिच्या कारभारात पारदर्शकता आहे आणि ती संस्था समाजहिताच्या दिशेने प्रामाणिकपणे कार्यरत आहे, तर अशा संस्थेत फक्त विरोधासाठी विरोध करणे, केवळ राजकीय प्रतिष्ठेच्या मुद्द्यावरून अडथळा निर्माण करणे हे कोणत्याही प्रकारे समाजहिताचे लक्षण नसते. पाचोरा, जामनेर, भडगाव या तालुक्यांतील विविध राजकीय गटांनी याच विचारसरणीला अनुसरून एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला आहे. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘दि पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.’च्या संचालक मंडळाच्या आगामी निवडणुकीत सर्व राजकीय गटांनी, पक्षीय भूमिका बाजूला ठेवून, बँकेच्या हितासाठी एकत्रितपणे कार्यक्षम नेतृत्वाला आपला पाठिंबा देत समाजात सकारात्मक संदेश दिला आहे.
गेल्या पाच वर्षांत या बँकेने उल्लेखनीय अशी वाटचाल केली आहे. बँकेचे चेअरमन अॅड. अतुलभाऊ संघवी, व्हा. चेअरमन प्रशांतभाऊ अग्रवाल आणि संपूर्ण संचालक मंडळाने आपल्या कार्यकुशल नेतृत्वाखाली बँकेचा आर्थिक आलेख उंचावला असून बँकेला आधुनिक व पारदर्शक कार्यपद्धतीचा आदर्श नमुना बनवले आहे. ग्राहकांचा विश्वास, सभासदांचे समाधान आणि शाखा विस्ताराच्या माध्यमातून बँकेची ओळख आता जिल्हा आणि राज्य पातळीवर प्रस्थापित होत आहे.
या निवडणुकीसाठी एकूण १५ जागा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सर्वसाधारण ९, शाखा प्रतिनिधी १, महिला २, ओबीसी १, अनुसूचित जातीसाठी १ आणि अनुसूचित जमाती (NT) साठी १ जागा होती. या १५ जागांसाठी पाचोर्यातील एकूण ३५ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. परंतु यामधील तब्बल २८ उमेदवारांनी एकमताने अॅड. अतुल संघवी यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या पॅनलला आपला पाठिंबा जाहीर करून संस्थेच्या प्रगतीपथावर चालण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या निवडणुकीत विशेष महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या निवडणुकीत अॅड. अतुल संघवी व माजी चेअरमन अशोकशेठ संघवी यांच्यात पॅनल विरुद्ध पॅनल अशी चुरशीची लढत रंगली होती. मात्र यंदा त्या वादाला बाजूला ठेवत स्वतः अशोकशेठ संघवी यांचे सुपुत्र राहुल संघवी यांनी देखील अॅड. अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शविला आहे. राहुल संघवी यांनी आपली उमेदवारी सादर करताना नवव्या क्रमांकावर स्वतःची सही देत, एका सकारात्मक आणि एकसंघ निवडणुकीकडे वाटचाल सुरू केल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या निवडणुकीत संघर्षाची शक्यता लोप पावत असून, सर्व पदांवर बिनविरोध निवड होण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे.या निवडणुकीत अतुल सांगवी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शविणाऱ्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – 1) अविनाश भालेराव, 2) भरत खंडेलवाल, 3) शरद पाटे, 4) संगिता पाटे, 5) प्रकाश पाटील, 6) संध्या पाटील, 7) आदित्य पाटील, 8) देवेंद्र कोटेच्य, 9) राहुल संघवी, 10) अल्पेश संघवी, 11) अनंत पाटील, 12) भागवत महाकपूरे, 13) स्वप्निल पाटील, 14) विकास वाघ, 15) अनिल येवले, 16) विलास जोशी, 17) शांताराम पाटील, 18) पवन अग्रवाल, 19) प्रशांत अग्रवाल, 20) चंद्रकांत लोढाया, 21) नरेंद्र पाटील, 22) सचिन संचेती, 23) प्रदीप पाटील, 24) अविनाश कुडे, 25) सुभाष अग्रवाल, 26) मोहन अग्रवाल, 27) ललिता चौधरी आणि या सर्व उमेदवारांनी बँकेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत, “पाचोरा पिपल्स बँकेची प्रगती हेच आमचे एकमात्र ध्येय आहे” असे ठामपणे जाहीर केले असून, आपापल्या सह्यांसह लेखी सहमती दिली आहे. ही बाब या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाची मानली जात आहे. निवडणुकीत निर्माण झालेला हा सकारात्मक समन्वय राजकीय क्षेत्रासाठी आदर्श ठरावा अशी अपेक्षा अनेक जण व्यक्त करत आहेत. कारण इथे कोणत्याही राजकीय गटाने आपल्या पक्षाचा आग्रह धरला नाही, कोणतीही राजकीय कुरघोडी केली गेली नाही आणि केवळ प्रामाणिक कार्य करणाऱ्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यात आला आहे. हेच खरे नेतृत्वाचे लक्षण असते, जे व्यक्तिगत वा पक्षीय हितापेक्षा संस्थेच्या एकूण प्रगतीला प्राधान्य देते.
यामुळेच ही निवडणूक केवळ बँकेपुरती मर्यादित न राहता, सामाजिक सलोख्याचा, संघटनबळाचा आणि एकात्मतेचा संदेश देणारी ठरली आहे. पाचोरा, जामनेर व भडगाव परिसरातील सर्व राजकीय गट, सामाजिक संस्था व प्रतिष्ठित व्यक्तींनी एकत्र येऊन दिलेला पाठिंबा, बँकेच्या नेतृत्वाने कमावलेला विश्वास आणि प्रगतीची सातत्याने दिसणारी चिन्हे पाहता, ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या दिशेने वेगाने सरकत आहे. अर्थात अद्याप काही उमेदवारांचा अधिकृत माघार अर्ज शिल्लक असला तरीही, या सकारात्मक सहमतीच्या पार्श्वभूमीवर एकोपा व सहकार्याचाच सूर अधिक बुलंद होताना दिसत आहे. या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे अनुसूचित जमाती (NT) कोट्यांतर्गत असलेल्या जागेसाठी माजी संचालक विकास ज्ञानेश्वर वाघ यांची उमेदवारी आधीच निश्चित करण्यात आली असून, त्यांच्याबाबत कोणताही अन्य उमेदवार रिंगणात नाही.संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेकडे बँकेचे सभासद, खातेदार, स्थानिक नागरीक आणि समाजमाध्यमांतील वर्तुळ यांचे लक्ष लागून आहे. बँकेच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत ठेवण्यासाठी, नेतृत्वाला पाठिंबा देणाऱ्या सर्व उमेदवारांची भूमिका प्रशंसनीय असून, त्यांनी घेतलेला निर्णय संपूर्ण सहकार क्षेत्रात प्रेरणादायी ठरेल. या निवडणुकीतून एक स्पष्ट संदेश समाजास मिळतो – राजकारण हे संस्था चालविण्याचे केंद्रबिंदू नसून, संस्था चालवण्यासाठी जबाबदार नेतृत्व आणि सामंजस्यपूर्ण सहयोग आवश्यक असतो. पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीने ही बाब अधोरेखित केली असून, “संस्थेच्या प्रगतीपलीकडे कोणतेही मतभेद नसावेत” हा आदर्श समाजासमोर उभा केला आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.