पाचोरा – शहरातील सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या वाघ कुटुंबाच्या जनसेवेच्या परंपरेला आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दि पाचोरा पिपल्स को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळावर अनुसूचित जमाती (NT) प्रवर्गातील एकमेव अर्जदार म्हणून आल्याने विकास वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड म्हणजे त्यांच्या समाजकार्याला, पारदर्शक व प्रामाणिक व्यवस्थापन कौशल्याला मिळालेली साक्ष आहे, तसेच ही निवड त्यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेचा आणि कार्यक्षमतेचा ठोस पुरावा आहे. विकास वाघ हे पाचोरा शहरातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि जनमानसात रुजलेले नाव आहे. त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय तब्बल ७१ वर्षांपासून दुग्धजन्य पदार्थांच्या व्यापाराशी निगडीत आहे. दूध, दही, तूप अशा पारंपरिक व्यापारात सातत्य आणि गुणवत्ता यामुळे या घराण्याने पाचोऱ्यात विश्वासार्हता निर्माण केली आहे. स्व. अण्णासाहेब ज्ञानेश्वर वाघ यांच्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय केवळ आर्थिक उत्पन्नाचे साधन न राहता जनतेशी जुळलेली नाळ बनला.
स्व. अण्णासाहेब वाघ हे पाचोरा नगरपालिकेचे माजी नगर उपाध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या काळात प्रामाणिकपणे प्रशासनात सहभाग घेतला आणि नगर विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत विकास वाघ यांनीही आपले पाऊल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात टाकले आणि त्या वाटचालीत उल्लेखनीय ठसा उमटविला. विकास वाघ यांनी यापूर्वी ॲड अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षे पाचोरा पिपल्स को-ऑप. बँकेच्या संचालक पदावर यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्या काळात अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वात त्यांनी बँकेच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता, ग्राहकाभिमुख धोरणे, आणि योजनांमध्ये गरीब व मध्यमवर्गीय वर्गाला केंद्रस्थानी ठेवले. अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वात बँकेची विकासदरांची चढती कमान, ग्राहकांमध्ये असलेला विश्वास आणि आर्थिक धोरणातील प्रामाणिक दृष्टीकोन यामुळे त्यांना पुन्हा एकदा बिनविरोध निवड मिळवता आली. अनुसूचित जमाती (NT) प्रवर्गातील ही जागा केवळ नाममात्र आरक्षण नसून वंचित समाजातील प्रतिनिधित्वाचे प्रतीक आहे. विकास वाघ यांचा सामाजिक सुसंवाद, सर्वपक्षीय सौहार्द आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे या जागेसाठी कोणीही दुसरा उमेदवार न उभा राहिल्याने ही निवड बिनविरोध झाली. निवडणूक प्रक्रियेतून जनतेने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकला आहे, हे या निवडीमागचे खरे यश मानले जात आहे. विकास वाघ हे केवळ आर्थिक संस्था किंवा बँकेपुरते मर्यादित नाहीत, तर त्यांचा सामाजिक व राजकीय सहभागही अत्यंत व्यापक आहे. त्यांच्या घराण्याचा राजकीय वारसा हेच त्यांच्या नेतृत्वगुणांचे मूळ मानले जाते. त्यांचे भाऊ किरण वाघ यांच्या पत्नी सौ. आशा वाघ व रवींद्र वाघ यांच्या पत्नी सौ. मंगला वाघ या दोघी पाचोरा नगरपालिकेच्या नगरसेविका होत्या. या महिलांनी त्यांच्या कार्यकाळात महिला सबलीकरण, नागरी सुविधा, आणि परिसर विकासावर विशेष भर दिला. या पार्श्वभूमीवर विकास वाघ यांचे राजकीय कार्यही लक्षणीय आहे. त्यांनी पाचोरा शिवसेना शहरप्रमुख पद भूषवले असून, तेव्हा त्यांनी शहराच्या विविध प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली होती. पुढे पाचोरा शेतकरी सहकारी संघाचे व्हा. चेअरमन म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या. तरुणांमध्ये राजकीय जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी NSUI शहरप्रमुख तसेच युवक काँग्रेस प्रदेश सचिव म्हणून कार्य केले.
या सर्व पदांवर कार्य करत असताना त्यांनी कोणत्याही पक्षाच्या काठी टेकून नव्हे, तर स्वबळावर राजकीय जम बसवला. सर्वसामान्य जनतेशी सतत संपर्क ठेवणारा, गरजूंना तत्परतेने मदत करणारा आणि कोणत्याही पदाच्या हव्यासाशिवाय काम करणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा समाजात तयार झाली आहे. विकास वाघ यांचे नेतृत्वगुण हे त्यांच्याकडील वैयक्तिक नम्रता, निर्णयक्षमता आणि संघटनशक्तीवर आधारित आहेत. बँकेच्या प्रशासनात अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वात ज्या प्रकारे नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला, आर्थिक शिस्तीचे पालन केले आणि कर्जवसुलीचे प्रमाण वाढवले, त्यातून त्यांची व्यवस्थापन कौशल्ये अधोरेखित होतात. ते आपल्या सहकाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण संवाद ठेवतात आणि कोणताही निर्णय एकतर्फी न घेता सर्वांच्या सल्ल्याने घेतात, ही त्यांची खासियत आहे. अत्यंत नम्र स्वभाव, हसतमुख चेहरा, पण वेळ आली की कठोर निर्णय घेण्याची धमक असलेले श्री संघवी यांचे नेतृत्व पाचोऱ्याच्या राजकीय आणि आर्थिक क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
विकास वाघ हे सामाजिक कार्यातही अग्रणी आहेत. शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत, आपत्कालीन सहाय्य अशा अनेक गोष्टींसाठी ते नेहमी पुढे असतात. त्यांचा ‘कुठल्याही कार्यक्रमाचा मुख्य पाहुणा नव्हे, तर कार्यकर्ताच’ हा दृष्टिकोन त्यांना जमिनीवरचे नेतृत्व देतो. पाचोरा शहरात विविध धार्मिक उत्सव, सामाजिक उपक्रम आणि आपत्ती काळातील मदत कार्यात त्यांचा हातभार असतो. पाचोरा पिपल्स बँकेच्या पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळात विकास वाघ यांच्याकडून ग्राहकांमध्ये डिजिटल व्यवहाराचा प्रसार, शेतकरी कर्ज वाटपातील पारदर्शकता, महिला बचतगटांना सहकार्य, तसेच ग्रामीण शाखांमध्ये बँकेच्या विस्ताराची अपेक्षा आहे. बँकेची सेवा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहचवण्याची आणि तिचा उपयोग समाजाच्या खऱ्या गरजांसाठी करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. विकास वाघ यांची दि पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड ही केवळ निवडणूक यश नसून, त्यांच्यावरील समाजाच्या विश्वासाची पुनरावृत्ती आहे. त्यांच्या बिनधास्त, पारदर्शक आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे पाचोऱ्यातील आर्थिक आणि सामाजिक क्षेत्राला दिशा मिळते आहे. या निवडीनंतर त्यांच्यावर नव्याने जबाबदाऱ्या आल्या असून, जनतेच्या अपेक्षांना न्याय देत ते अधिक जोमाने कार्य करतील, हीच अपेक्षा.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.